
गौराई आली सोन्याच्या पावलांनी, माणिक मोत्याच्या पावलांनी… असे म्हणत माहेरवाशीण गौरी शनिवारी थाटामाटात घरी येणार आहे. गणपतीपाठोपाठ गौरीच्या आगमनाने सारं मंगलमय होणार आहे.
गौराईचा हा सण म्हणजे माहेरवाशिणींचा उत्सव. गौरीपूजनाला महालक्ष्मीपूजन असेही म्हटले जाते. गौरी fिंकवा महालक्ष्मीचे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते. म्हणून यांना ज्येष्ठा गौरी असेही म्हटले जाते. माहेरवाशीण गौराईचे स्वागत पारंपरिक पद्धतीने, भक्तिभावाने केले जाते. दारात रांगोळी काढून, लक्ष्मीची पावले काढून, ताट-चमचा वाजवत गौरीचे मुखवटे घरात आणले जातात. गौरीला नवीकोरी साडी, छान दागिने आणि वेणी-फुलांनी सजवले जाते. गौरीची पूजा करून तिला महानैवेद्य दाखवले जाते. यामध्ये 16 भाज्या आणि पंचपक्वान्न असा बेत असतो.
महाराष्ट्रात प्रांतानुसार गौरीपूजनच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. काही ठिकाणी गौरींचे नुसते मुखवटे असतात. काही कुटुंबांमध्ये नदी, पाणवठय़ावर जाऊन पाच, सात किंवा अकरा खडे आणून त्यांची पूजा केली जाते. त्याला खडय़ाच्या गौरी म्हणतात. काही ठिकाणी तेरडय़ाची गौर असते. सध्याच्या काळात गौरीपूजनाच्या आणि मांडणीच्या पद्धतीत व गौरीच्या रूपातही आधुनिकता दिसून येते.
शनिवार 3 सप्टेंबर रोजी रात्री 10-56 वाजेपर्यंत अनुराधा नक्षत्र असल्याने दिवसभर कधीही गौरी आणण्यास हरकत नाही. रविवार 4 सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी पूजन आहे. ज्येष्ठा गौरींचे विसर्जन चंद्र मूळ नक्षत्रात असल्याने सोमवार 5 सप्टेंबर रोजी रात्री 8-05 पर्यंत करावे.






























































