समाजभान- क्षमा वीरस्य भूषणम!

>> वर्षा चोपडे

जागतिक स्तरावर क्षमा दिन अर्थात ग्लोबल फॉरगिव्हनेस  डे  साजरा करण्याचा उद्देश जगात शांती आणि प्रत्येकाचे एकमेकांशी चांगले संबंध टिकवणे हा आहे. संघर्ष, गैरसमज आणि अन्यायाने भरलेल्या जगात, क्षमाशीलतेचे खूप महत्त्व आहे. क्षमा म्हणजे सद्गुण, क्षमा म्हणजे त्याग, क्षमा म्हणजे वेद, क्षमा म्हणजे श्रुती. असे म्हणतात चुकून पायाखाली मुंगी मेली तरी पाप घडते, पण त्याला माफी असते. 7 जुलै हा दिवस ‘विश्व क्षमा दिन’ म्हणून ओळखला जातो. त्यानिमित्त…

क्षमा करणे सोपे नसते. कधी कधी क्षमा  करणे हे आपल्याला झालेल्या जखमेपेक्षा जास्त वेदनादायक वाटते आणि उगाच हेतुपुरस्सर गुह्याला माफ करणे म्हणजे महामूर्खपणा असतो. त्यासाठी कायद्यात तरतूद आहे. कारण प्रत्येक अपराधाला क्षमा नाही. बरेचदा समाजातील सलोखा आणि सामाजिक जीवन चांगले राहावे म्हणून कठोर शिक्षा केली जाते. क्षमा करण्यासाठी खूप मजबूत विचारांची आवश्यकता असते. अर्थात ‘क्षमा करा आणि पुढे चला’ असे म्हटले जात असले तरी ज्यांना क्षमा केली त्यांपैकी काही कधीच सुधारत नाहीत हेही तेवढेच खरे.

मनापासून माफी मागून त्या चुका परत न करणे याचे खरे महत्त्व आहे.भारतीय सम्राट पृथ्वीराज चौहान यांनी त्यांचा शत्रू मोहम्मद घोरी  याला क्षमा केली, पण शेवटी मोहम्मद घोरीने त्यांचा पराभव केला आणि त्यांना गुलाम बनवले. पण ज्या वेदना त्याने पृथ्वीराज चौहान यांना दिल्या त्यापेक्षाही त्याला भयंकर मरण आहे. ऐतिहासिक माहितीनुसार, मुहम्मद घोरी याची 1206 मध्ये घोर आणि भारताकडे जात असताना खोखरांनी म्हणजे पूर्व-मध्य आशियातील एक जमातीने निर्घृण हत्या केली. हत्येच्या वेळी तो झेलम नदीच्या काठावर त्याची संध्याकाळची प्रार्थना करत होता. क्षमा करणे हा शूरांचा अलंकार आहे, पण पृथ्वीराज चौहान यांची क्षमा शत्रूला माफ करण्याचा धर्म त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करून गेला, पण घोरीला नियतीने माफ केले नाही हे विशेष.

सुसंस्कृत देवमाणसांना स्वार्थासाठी वापरणे आणि त्यांना मानसिक, शारीरिक प्रताडित करणे याकरिता ईश्वर कधीच क्षमा करीत नाही. अशी अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे क्षमेला मर्यादा असाव्यात. नाहीतर आपलाच घात होतो. सतत चुकीचे वागणाऱया आणि तिरस्कार करणाऱया लोकांना क्षमा करून त्यांच्याशी संबंध न ठेवणे मानसिक आरोग्यासाठी उत्तम औषध आहे. धर्म सांगतो, प्रायश्चित्त अर्थात पश्चात्ताप केल्याने आत्मा पापांपासून मुक्त होतो आणि कोणतेही अपराध करत नाही. प्रत्येक धर्मात क्षमेचे महत्त्व आहे. भगवान बौद्ध यांनी क्षमेचे महत्त्व सांगितले, परंतु त्याच्या मर्यादाही सांगितल्या. जैन संत वारंवार विविध प्राण्यांकडून क्षमा मागतात. ख्रिश्चन धर्मग्रंथ  बायबल सातत्याने यावर जोर देते की, केवळ देवालाच पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे. याचे कारण असे की, पाप हा शेवटी देवाविरुद्धचा गुन्हा आहे आणि फक्त तोच तुटलेला संबंध पुन्हा जोडू शकतो.

पुराणकथेनुसार एकदा असुर राजा बली त्याच्या आजोबांना विचारतो की, ‘तेज, आक्रमकता व क्षमा यात श्रेष्ठ कोण आहे?’

प्रल्हाद उत्तर देतो की, ‘तिन्ही गोष्टी आपल्या ठिकाणी श्रेष्ठ आहेत. शहाण्या माणसाने त्यांचा वापर आवश्यकतेनुसार केला पाहिजे. जर तुम्ही खूप सहजपणे क्षमा केलीत तर लोक तुम्हाला गृहीत धरू लागतील. खूप सहजपणे क्षमा करण्याचे धोके म्हणजे तुमच्या स्वतच्या लोकांकडून, तुमच्या शत्रूंकडून आणि सामान्य लोकांकडून आदर न मिळणे हा आहे. जो नेहमी क्षमा करतो त्याच्याशी लोक सभ्यपणे वागतीलच असे काही नाही. म्हणून शहाण्या माणसाने नेहमीच क्षमाशील राहू नये. म्हणून संतुलित वर्तनाची शिफारस केली जाते. जो व्यक्ती अत्यंत सौम्य ते धोकादायक अशा गरजेनुसार आपले वर्तन बदलू शकतो, तो जगावर राज्य करतो. समोरच्याची लायकी तेवढीच महत्त्वाची असते.’

पुराणातील हा संवाद बरेच काही शिकवून जातो. क्षमा हाच श्रेष्ठ धर्म असला तरी समाजहित श्रेष्ठ असते. क्षमा करा, पण विचार करून, हेच आपल्याला धर्म आणि इतिहास शिकवतो. सामाजिक आरोग्यासाठी छोटय़ा गोष्टींसाठी क्षमा करणे महत्त्वाचे आणि योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे.

n [email protected]

(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल

सायन्सेस, कोची, केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)