Global कोकण

1737

कोकणकला, संस्कृती आणि खाद्य परंपरेचा खजिना… दशावतार, तारपा नृत्य या पारंपरिक लोककला… वारली कला…लोकनृत्य… सेंद्रिय शेतीचा बाजार… मालवणी, कोकणी, सीकेपी तसेच पुरणपोळी, मोदक,   सोलकढी भात असे शाकाहारी-मांसाहारी खाद्यसंस्कृतीतील वैविध्याचा आस्वाद घेण्यासाठी कोकण भूमी प्रतिष्ठानतर्फे उद्यापासून 6 जानेवारीपर्यंत गोरेगावच्या मुंबई एक्झिबिशन सेंटर 8 व्या ग्लोबल कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवाचे वैशिष्टय़ असे की, यावेळी तारपा, जाखडी, नमन, कोळी  लोकनृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यामध्ये 200 कलाकारांचा सहभाग आहे. तसेच दशावतार, पुराणकथांवर आधारित नाटकं, गाणी, नृत्य, संगीत अशी कलासफरही रसिकांना घडेल. विशेष म्हणजे कोकणातला प्रसिद्ध लोकनाटय़प्रकार म्हणजे ‘दशावतार’.  हा कलाप्रकारही यावेळी पाहण्याची संधी मिळेल. महाराष्ट्रातील नामवंत कवींचे संमेलन यावेळी होणार आहे.  कोकणातील कलाप्रकार, सौंदर्य, व्यवसाय, खाद्यपदार्थ आणि संस्कृती जतन करणे आवश्यक आहे. यासाठी या महोत्सवाच्या निमित्ताने कलाकारांना जागतिक पातळीवर व्यासपीठ मिऴेल, असे या महोत्सवाचे मुख्य संयोजक संजय यादवराव सांगतात.

खाद्यपदार्थ आणि सेंद्रिय शेती

कोकणातील खाद्यपदार्थ आणि सेंद्रिय शेती हा तेथील अतिशय महत्त्वाचा भाग. याअंतर्गत माशांच्या विविध पाककृती, रुचकर सोलकढी ते पारंपरिक गोड पदार्थांची चव चाखायला मिळेल. विविध प्रकारच्या 15 मिसळ, शाकाहारी, मांसाहारी मिसळींचा आस्वाद घेता येईल. तसेच सेंद्रिय शेतकऱयांकडून उत्पादनेही विकत घेता येतील.

आर्ट वर्क आणि प्रात्यक्षिके

कुंभारकाम, ब्लॉक पेंटिंग, सिरॅमिक एनॅमलिंग, वारली चित्रकला, गोंड कला, गंजिफा, धातूच्या तारांपासून दागिने, व्यक्तिचित्रे आणि पेंटिंग्जची प्रात्यक्षिके हा रसिकांच्या भाग या महोत्सवात पाहायला मिळेल.

वारली कला

प्रख्यात कलाकार सुमित पाटील आदिवासींच्या जीवनशैलीवर आधारित ‘वारली कला एक आर्ट इन्स्टॉलेशन’ या नावाचं प्रदर्शन होणार आहे. यात कोकणाच्या प्रगतीचे अनेक पैलू महोत्सवप्रेमींना उलगडतील.

शैक्षणिक कार्यशाळा

मत्स्यशेती, आधुनिक शेती, फळबागायत, इको टुरिझम पार्क्स उभारणी, उद्याने अशा प्रकारच्या अनेक कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या