ठसा – दिलीप गोटखिंडीकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लहानपणापासून अवघड वाटणाऱया गणित विषयाची भीती अनेकांच्या मनात कायम राहते. मात्र नाशिक येथील आदर्श शिक्षक, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गणितज्ञ दिलीप कृष्णाजी गोटखिंडीकर यांनी हा विषय सोप्या भाषेत समजावून देत हजारो मुलांची गणिताशी मैत्री घडवून आणली. 73हून अधिक गणित विषयांशी संबंधित पुस्तके त्यांनी लिहिली. 37हून अधिक देशांत गणितविषयक व्याख्याने देत नाशिकसह हिंदुस्थानच्या नावलौकिकात भर घातली. विद्यार्थिप्रिय शिक्षक गोटखिंडीकर यांचे वयाच्या 70व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्राचा आधार असलेला गणितज्ञ हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. मूळ नाशिकचे रहिवासी असलेले दिलीप गोटखिंडीकर हे बी.एस्सी.बी.एडपर्यंत शिक्षण घेऊन नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या पेठे विद्यालयात शिक्षक म्हणून रुजू झाले. गणित या विषयाचे सुरुवातीपासून त्यांना आकर्षण होते. गणितज्ञ दत्तात्रय कापरेकर हे गुरू त्यांना लाभले. कापरेकर यांचा वारसा त्यांनी पुढे चालवत जगभर नावलौकिक मिळविला. विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताची भीती दूर करीत सोप्या आणि रंजकपद्धतीने ते हा विषय शिकवत. त्यामुळे साहजिकच मुलांमध्ये गणिताची गोडी निर्माण होत गेली. त्यांनी तब्बल 37 देशांमध्ये गणितविषयक व्याख्याने दिली. गणिताची कोडी तयार करण्यात ते कायम रमून जात. अनेक आंतरराष्ट्रीय गणित परिषदांमध्ये त्यांनी हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले. आपले शोधनिबंध सादर केले. नाशिक एज्युकेशन सोसायटीचे सचिव आणि सोसायटीच्या शिक्षक मंडळाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. या काळात संस्थेच्या प्रगतीत मोठी भर घालत नव्या पिढीतील शिक्षकांना कायम मार्गदर्शन केले. अनेक मानाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.

आकाशवाणी नाशिक केंद्रासाठी सफरनामा गणिताचा ही मालिका त्यांनी तयार केली. तसेच आकाशवाणीच्याच विज्ञान कट्टा कार्यक्रमासाठी 40 व्याख्यानांच्या माध्यमातून मोलाचे मार्गदर्शन केले. महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या वैदिक गणित पदविका अभ्यासक्रमासाठी अध्यापन केले. राष्ट्रीय पातळीवरील 18 संमेलनांमध्ये प्रमुख सहभाग नोंदविला. मराठी विश्वकोश निर्मिती मंडळात भौतिकशास्त्र्ा आणि गणितविषयक काम पाहिले. पुणे येथील एकता मासिकातून त्यांची गणिताची वाटचाल ही लेखमाला प्रसिद्ध झाली. ते गणित ः छंद-आनंद या नियतकालिकाचे संपादक होते. सन 2005मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेतले. महाराष्ट्रभर एकल विद्यालयाचे मोठे काम उभे केले. वनवासी क्षेत्रातील मुलांच्या शिक्षणावर लक्ष देत तेथील शिक्षकांनाही मार्गदर्शन करून शिक्षणाचा प्रचार व प्रसार केला. या भागातील मुलांमध्येही गणिताची गोडी निर्माण केली. महान गणितज्ञ भास्कराचार्य यांच्या चाळीसगावजवळील पाटणादेवी या जन्मगावी राज्य शासनाने भास्कराचार्य गणितनगरी उभारणीचा प्रकल्प हाती घेतला आहे. गेल्या तीन वर्षांपासून ते येथील कामाची जबाबदारी सांभाळत होते. येथे अगदी सोप्यापद्धतीने विविध प्रतिकृती, खेळ यांचा वापर करून गणित विषय मांडला जाणार आहे. गणितही मुलांचा आवडीचा विषय व्हावा, यासाठी त्यांनी राबवलेले उपक्रम पुढील अनेक पिढय़ांसाठी मार्गदर्शक ठरणारे आहेत.

– प्रज्ञा सदावर्ते