प्रासंगिक – समाजप्रवर्तक श्री गुरू नानक

795

>> ठाणसिंघ जीवनसिंघ बुंगई

शीख धर्माचे पहिले गुरू गुरू नानक देवजी यांचा 550 वा प्रकाशोत्सव देशभरात  साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा हा लेख.

जातीविरहित वर्गविहीन समाजाचे प्रवर्तक, शोषित, पीडित, दीनदुबळय़ांचे कैवारी, स्त्र्ााr स्वातंत्र्याचे जनक, हिंदुस्थानी सभ्यता व संस्कृतीचे रक्षक शांतिदाता शीख धर्माचे पहिले श्री गुरू नानक यांचा जन्म झाला त्यावेळी आजुबाजूचे धार्मिक, आर्थिक, सामाजिक व राजकीय वातावरण भयानक व दूषित झाले होते. धर्माच्या नावावर होणारी लुबाडणूक, आर्थिक स्तरावर बलशाली व धनाढय़ लोकांकडून केली जाणारी पिळवणूक, सामाजिक स्तरावर वर्गभेद, जातीभेद, फोफावले होतें, तर परकीय शासनामुळे लोकांची आर्थिक नाकेबंदी व धर्मावर आघात होऊ लागला होता. एकंदरीत सर्वच स्तरांवर होणाऱ्या छळाने जनता हैराण व त्रस्त होती. त्यातच हिंदू व मुसलमान समाजात बेबनाव व विद्वेषाची भावना वाढत होती. गुरू नानक यांनी दोन्ही समाजाला जवळ आणण्यासाठी आपण सर्वप्रथम मानव आहोत. आपल्या सर्वांचा जन्मदाता या सृष्टीचा सृजनकर्ता, पालनपोषणकर्ता एकच परमेश्वर आह़े आपण त्याची संतान असून आपापसातील मतभेद दूर करून प्रेमाने, शांततेने राहावे, असा संदेश दिला. सच्चा हिंदू, सच्चा मुसलमान बना असा संदेश देऊन दोन्ही समाजातील वाढलेले वितुष्ट दूर केले.

गुरू नानक यांनी समाजातील वाईट चालीरीती व उणिवांची दखल घेऊन धार्मिक, आर्थिक, सामाजिक, राजनैतिक स्तरावर कार्ययोजना करण्याचे ठरविले. त्याअनुषंगाने सुदृढ जातीविरहित, वर्गविहीन समाज निर्माण करण्यासाठी योजनाबद्ध पद्धतीने कार्यक्रम बनविला व शांततेच्या मार्गाने अपेक्षित सर्वसमावेशक समाज निर्मितीचा पाया रोवला. यासाठी गुरू साहिबांनी संगत ही नवीन संकल्पना लोकांसमोर मांडली. संगत ही एक प्रकारची प्रयोगशाळा होती, ज्यात गुरू साहिबांच्या आदर्शानुसार मनुष्य व समाज घडविण्याचे कार्य केले जाते. संगतमध्ये वेगवेगळय़ा स्तरांच्या, जाती, वर्ग, धर्माच्या लोकांना एकत्र जोडण्याचा धागा मुख्य सूत्र एक परमेश्वर होता.

गुरू नानक यांनी धर्माला नवीन स्वरूप दिले. हिंदुस्थानी अध्यात्मामध्ये वैयक्तिक उद्धारासाठी आणि मोक्ष मिळविण्यासाठी जो धर्म सांगितला आहे, त्याचा आपल्याशी व समाजाशी काही संबंध नाही अशी भावना सर्वत्र होती. त्यास विरोध करून धर्माला समाजाशी जोडण्याचे काम श्री नानकदेव यांनी केले. मनुष्य हा सामाजिक प्राणी असून समाजावर होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम मनुष्यावर होत असतो. तो समाजाशिवाय वेगळा राहू शकत नाही  असे श्री गुरू नानक देव यांनी सांगितले. समाजात समस्यांचा सामना न करता त्यागाच्या नावाखाली पळून जाण्यापेक्षा समाजात राहून समस्यांशी मुकाबला करीत  जगण्यावर त्यांनी भर दिला. गुरू नानक देव यांनी समाजबांधणीच्या कामासोबत राजकीय स्तरावर सत्ताधाऱ्यांच्या चुकांविरुद्ध जोरदार आवाज उठविला. शासनाच्या सर्वच स्तरांवरील भ्रष्टाचारावर त्यांनी कठोर शब्दांत टीका केली आणि राजकर्त्यांना जनतेचे रक्षण करण्याचा व आपला राजधर्म पाळण्याचा उपदेश केला.

जातीच्या आधारे कामाचे वाटप करण्यास गुरू नानकदेव यांनी नकार दिला. हिंदूंचे धार्मिक ग्रंथ संस्कृतमध्ये आणि मुस्लिमांचे अरबीमध्ये होते. त्यामुळे लोक ज्ञानापासून वंचित राहिले होते. गुरू नानकदेवांनी हे ज्ञान लोकभाषेत आणले आणि लोकांना दैनंदिन उदाहरणे देऊन धर्मासारखा गूढ विषय समजावून सांगितला.

गुरू नानकदेव यांनी देशविदेशातील प्रमुख धार्मिक स्थळांना, संस्कृती, केंद्रांना भेटी दिल्या. त्या ठिकाणी जाऊन साधूसंन्यासी, योगी, मौलवी, पीर-फकीर यांना भेटून शंकांचे निरसन केले. आपल्या जीवनातून त्यांनी समयसूचकता, साधेपण यांचा संदेश दिला. आपल्या प्रवासात एकदा गुरू नानकदेव झोपले असताना एक मौलवी आला व त्याने गुरू नानकांना सांगितले की, तुमचे पाय मक्केच्या दिशेकडे आहेत. त्यावर गुरू नानकदेव त्याला म्हणाले असे कर, ज्या ठिकाणी परमेश्वर नाही त्या ठिकाणी माझे पाय ठेव़ यावर मौलवी गप्प बसला. यातून गुरू नानक देवांनी परमेश्वर सर्वत्र आहे असा संदेश दिला. गुरू नानकदेवांच्या साध्या, सरळ आणि सोप्या भाषेतील प्रबोधनामुळे अनेक जण त्यांचे शिष्य बनले. प्रपंचात राहून परमार्थ कसा करावा याचे उदाहरण गुरू नानकदेव यांनी आपल्या आचरणाने घालून दिले.  सध्या पाकिस्तानात असलेल्या कर्तारपूर येथे शेती करून उदरनिर्वाह केला व शेतीच्या उत्पन्नातून इतरांसाठी लंगरची व्यवस्था केली. ईश्वराचे स्मरण, कीर्तन हा गुरू नानकदेव यांच्या जगण्याचा सिद्धांत होता आणि तोच संदेश त्यांनी जगाला दिला.

आपली प्रतिक्रिया द्या