प्रासंगिक – गुरु साक्षात परब्रह्म….

गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू

गुरुर्देवो महेश्वरः

गुरु साक्षात् परब्रम्ह

तस्मै श्री गुरवे नमः

या ओळीतूनच आपण गुरूबद्दल आदर व्यक्त करत असतो. पण अजूनही आपण या गुरू शब्दाची व्युत्पत्ती जाणलीच नाही.

गिरति अज्ञानम् इति – अज्ञान दूर करतो तो

गुणात्वी धर्मन इति – धर्माचा आदेश करतो तो

गिर्यते इति – ज्याचे स्तवन केले जाते तो.

निर्जीव वस्तू फेकण्यासाठी तिला सुद्धा सजीवाची गरज असते. त्याचप्रमाणे कोणतेही ज्ञान मिळवायचे असेल तर ते ज्ञान देणारा गुरू (मार्गदर्शक) हा असावाच लागतो. अगदी उदाहरणच घ्यायचे झालं तर आज फक्त संगणकाचेच नाही, तर ऑनलाइन शिक्षणाचे लोण फक्त हिंदुस्थानातच नव्हे, तर संपूर्ण जगात जरी आले असले तरी या पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला गुरू हा हवाच.

असे हे गुरू आपल्याला जीवनाच्या मार्गावर पदोपदी भेटतच असतात. म्हणूनच आपण गुरूंचा आदर, गुरूंबद्दल श्रद्धा, भक्तिभाव दाखवण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी करतो. हा दिवस म्हणजे आषाढ शुद्ध पौर्णिमा! हा दिवस गुरू महर्षी व्यासमुनींचा जन्मदिवस म्हणूनच या दिवसाला ‘व्यास पौर्णिमा’ असेही म्हणतात.

‘गुरुपूजन म्हणजे ध्येय पूजन,

गुरुपूजन म्हणजे सत्याचे पूजन,

गुरुपूजन म्हणजे ज्ञानाचे पूजन,

गुरुपूजन म्हणजे अनुभवाचे पूजन.

ज्ञानाचा सूर्य, प्रेमाचा महासागर, आणि शांतीचा हिमालय असे गुण गुरूच्या ठायी असतात. हिंदुस्थानी शिक्षण पद्धतीत गुरूला असाधारण महत्त्व आहे. अशा प्रकारे शतकानुशतके चालत आलेली ही गुरू-शिष्याची परंपरा आहे.

पण आज मानव अंधश्रद्धा आणि अज्ञान यांच्या अंधारात आदळत, आपटत आहे. अशा या अंधारात भरकटत असणाऱ्या समाजाला, ज्ञानाचा, संस्कृती आणि परंपरेचा मार्ग दाखवण्याच्या महान कार्याची मुहूर्तमेढ श्रमिक विद्यालयाचे संचालक-शिक्षणमहर्षी, गुरुवर्य यशवंतराव चव्हाण सर यांनी रोवली.

आपल्याला ‘गुरुत्वाकर्षणाचा नियम’ माहीतच आहे. पण तुम्हाला माहीत हे आहे का, यामागे जरी वैज्ञानिक दृष्टिकोन असला तरी ‘गुरुत्वाकर्षण’ या शब्दातच ‘गुरुत्व’ आणि ‘आकर्षण’ हे दोन शब्द दडलेले आहेत.‘गुरुत्व’अर्थात गुरूचे महत्त्व आणि ज्याने हे गुरूचे महत्त्व जाणले, तो गुरूकडून ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आकर्षित होतोच! सरांचे व्यक्तित्व आणि त्यांचे कृतित्वदेखील असेच आहे. त्यांच्यातील याच गुरुत्वाचा प्रभाव माझ्यासहित शाळेतील सर्वच शिक्षकांवरदेखील झालेला पाहायला मिळतो आहे.

आणि म्हणूनच विद्यार्थ्यांना संस्काराचे महत्त्व पटावे, त्यांच्या मनात गुरूविषयी प्रेम, वर्तमानात गुरूंविषयी कमी होत चाललेला आदरभाव पुन्हा निर्माण व्हावा, गुरू-शिष्याचे दुरावत चाललेले नाते अधिक वृद्धिंगत व्हावे यासाठीच हा ‘गुरुपौर्णिमा’ उत्सव मागील 36 वर्षांपासून आजतागायत अविरतपणे सुरू आहे. पहाटेच्या मंगलमय वातावरणात सनईच्या मंजुळ स्वरात नि धूप-अगरबत्तीच्या सुगंधात श्री सत्यनारायणाच्या महापूजेपासून या उत्सवाला सुरुवात होते. शाळेला एका धार्मिक आध्यात्मिक आश्रमाचे स्वरूप प्राप्त होते. संपूर्ण वातावरण गुरू-शिष्यमय होऊन जाते. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना महाप्रसाद म्हणून बालभोजन दिले जाते. शाळेच्या प्रांगणात शिष्य गुरूंच्या चरणी लीन होऊन जातात. इतकेच नव्हे तर, या दिवशी समाजातील, विविध क्षेत्रांत नावाजलेल्या, समाजकार्य केलेल्या तसेच शैक्षणिक कार्य केलेल्या थोर व्यक्तींना आमच्या संस्थेतर्फे आदर-सत्कार करून सन्मानित केले जाते.

आज काळ बदलत चाललेला आहे; पण आपण जसजसे आधुनिकतेकडे वळू लागलो तसतसे गुरूंचे स्मरण होण्याऐवजी गुरूंचे विस्मरण होत चालले आहे, आणि ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. पण म्हणतात ना, सर्वत्र काळाकुट्ट अंधार पसरलेला असला तरी कोठूनही का असेना, प्रकाशाचा एक छोटा कवडसा आपल्याला दिसतो की, जो या अंधारातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतो, आणि याच उद्देशाने संपूर्ण समाजामध्ये गुरू-शिष्याचे दुरावत चाललेले हे नाते दृढ व्हावे, त्याचे महत्त्व सर्वांनाच कळावे आणि गुरू-शिष्याच्या नात्यातील सन्मानाची, त्या नात्यातील पावित्र्याची जाणीव सर्वांनाच व्हावी यासाठीच यापुढेदेखील गुरुभक्ती दर्शविणारा गुरुपौर्णिमेचा आमचा हा महायज्ञ असाच अखंड सुरू राहावा यासाठीच कोरोना काळात शासनाने निर्गमित केलेल्या नियमांचे पालन करून गुरुपौर्णिमेचा हा सोहळा आम्ही या वर्षीही साजरा करणार आहोत.

स्मिता चव्हाण

(लेखिका श्रमिक विद्यालयाच्या संचालिका  आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या