वेब न्यूज – ग्वांतानामो बे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात सर्वत्र तुरुंग आढळतात. मात्र काही तुरुंग हे वेगवेगळ्या कारणांनी प्रसिद्ध आणि कायम चर्चेत राहणारे असतात. ग्वांतानामो बे हा तुरुंग जगातील सर्वात कडक शिस्तीचा, खतरनाक आणि सर्वात महागडा तुरुंग म्हणून प्रसिद्ध आहे. इथे सध्या फक्त 30 कैदी असले तरी तुरुंगाचा एका कैद्यामागे वर्षाचा खर्च 13 दशलक्ष डॉलर्स म्हणजे साधारण 1 अब्ज रुपये इतका अवाढव्य आहे. या तुरुंगातील कैद्यांना कोणत्याही चौकशीशिवाय, कोणत्याही कायदेशीर सुनावणीशिवाय बंदी म्हणून ठेवण्यात येते असा या तुरुंगाबद्दलचा सर्वात मोठा आक्षेप आहे. 1903 मध्ये अमेरिका आणि क्युबामध्ये झालेल्या करारानुसार क्युबाच्या दक्षिण-पूर्व तटावरील हा खाडीचा प्रदेश अमेरिकेला कोळसा स्टेशन आणि नौसेनेचा तळ उभारण्यासाठी भाडय़ाने देण्यात आला. या स्थानाचा वापर मुख्यतः अमेरिकेचा नौसेना तळ म्हणून होत होता. मात्र 2001 मध्ये अमेरिकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या तळाचे रूपांतर अतिधोकादायक दहशतवाद्यांना बंदिवासात ठेवण्यासाठी तुरुंगात करण्यात आले. या तुरुंगाची सुरुवात झाल्यानंतर काही काळातच इथल्या बराकाRचे आणि हातकडी अडकवलेल्या कैद्यांचे काही पह्टो प्रसिद्ध झाले आणि या तुरुंगावर मोठय़ा प्रमाणात टीका होऊ लागली. पुढे अध्यक्ष ओबामा यांनी हा तुरुंग बंद करण्याचा मानस अनेक वेळा बोलून दाखवला. मात्र त्यांच्या स्वतःच्या पक्षातून त्यांना यासाठी मोठा विरोध झाल्याचे बोलले जाते. आजही या कारागृहाबाहेर आणि आत मोठा बंदोबस्त तैनात असतो. या तुरुंगाची रचना, तिथल्या सोयी किंवा असुविधेबद्दल ठोस माहिती कोणाकडे नाही. मात्र इथून सुटका झालेल्या काही माजी कैद्यांनी हा तुरुंग अत्यंत धोकादायक असल्याचे वर्णन वारंवार केलेले आहे.