ठसा – हरीश अड्याळकर

>> महेश उपदेव

डॉ. राममनोहर लोहिया यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून आयुष्यभर वाटचाल करणारे ज्येष्ठ समाजवादी नेते हरीश अड्याळकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने लोहियांच्या विचारांचा सच्चा पाईक, समाजवादाचा पुरस्कर्ता काळाच्या पडद्याआड गेला असून नागपुरातील विविध लोकचळवळींनी आधारवड गमावला आहे. दुर्दैव असे की, त्यांचा मुलगा नितीन त्यांचेदेखील त्यांच्यापाठोपाठ कोरोनाने निधन झाले आणि अडय़ाळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. हरीश अडय़ाळकर यांची ओळख विदर्भात माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे जवळचे सहकारी म्हणून होती.

विदर्भाच्या जनजीवनात डॉ. राममनोहर लोहिया यांचा विचार रुजवून तो सतत जिवंत राखण्याचे काम हरीशजींनी लोहिया अध्ययन केंद्राच्या माध्यमातून केले. डॉ. राममनोहर लोहिया यांची नागपुरातील गोळीबार चौकात सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी अडय़ाळकर अवघ्या सोळा वर्षांचे होते. उत्सुकता म्हणून या सभेला गेले होते. लोहियांचे विचार ऐकून अडय़ाळकर यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. तेव्हापासून त्यांनी लोहिया यांच्या विचाराला वाहून घेतले. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी या विचारांची साथ सोडली नाही. लोहिया यांच्यासोबतच महात्मा गांधी यांच्याही विचारांचा त्यांच्यावर पगडा होता.

अडय़ाळकर यांचे कुटुंब मूळचे मध्य प्रदेशातील. ते रेल्वेत तिकीट तपासणीस होते. रेल्वेत असतानाच त्यांनी कामगारांची चळवळ उभी केली. कामगारांच्या न्याय व हक्कांसाठी लोकलढा उभारला. राममनोहर लोहिया यांच्या विचारांवर निष्ठा असणाऱया अडय़ाळकर यांनी त्यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी 45 वर्षांपूर्वी लोहिया अध्ययन केंद्राची स्थापना केली होती. या केंद्राच्या माध्यमातून अनेक चर्चासत्रं, व्याखानांचे त्यांनी आयोजन केले. ‘सामान्य जन’ नावाचे त्रैमासिकही ते चालवीत होते. 1974 साली तत्कालीन रेल्वे कामगारांचे नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्वात देशव्यापी संप झाला. त्यात ते सहभागी झाले होते. पोलिसांचा गोळीबार आणि लाठीमारामुळे संप चांगलाच चिघळला होता. विदर्भातील संपाची धुरा अडय़ाळकर यांच्या खांद्यावर होती. पोलिसांनी अटक करण्यासाठी त्यांची शोधाशोध केली. सुमारे दीड वर्षे ते भूमिगत होते.
नागपूर रेल्वे स्थानकावर त्यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना रेल्वेने निलंबितही केले होते. त्यानंतरचे संपूर्ण आयुष्य त्यांनी लोहिया विचारांच्या प्रचार व प्रसारासाठी व्यतीत केले.

कालांतराने जॉर्ज फर्नांडिस रेल्वे खात्याचे मंत्री झाले. हरीश अडय़ाळकर यांना पुन्हा नोकरी बहाल करण्यात आली. निवृत्तीनंतर अडय़ाळकर यांनी आपले उर्वरित सर्व आयुष्य गांधी आणि लोहिया यांचे विचार पेरण्यासाठी लोहिया अध्ययन केंद्रातच व्यतीत केले. जॉर्ज फर्नांडिस यांच्याशी त्यांचे फारच सख्य होते. हिंद मजदूर किसान पंचायत या संघटनेतही त्यांनी बराच काळ काम केले. अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला आहे. हरीश अडय़ाळकर यांनी त्यांचे मोठे बंधू कवी अनिल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अनिलकुमार स्मृती पुरस्कार सुरू केला. पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्तम काम करणाऱयांना हा पुरस्कार दिला जातो. त्यांच्या एकसष्ठाr आणि पंच्याहत्तरीनिमित्त मित्रपरिवारातर्फे भव्य सत्कार सोहळ्याचेही नागपुरात आयोजन करण्यात आले होते. यातल्या पहिल्या कार्यक्रमाला स्वतः जार्ज फर्नांडिस उपस्थित होते. रेल्वेत नोकरी करताना आपले वेतन ते सामाजिक कार्यात खर्च करीत असत. बराच काळ ते भाडय़ाच्या घरात राहिले. सुरेश अग्रवाल यांच्या पुढाकारातून त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यावेळी काही निधी गोळा करण्यात आला. या निधीतून अडय़ाळकर यांच्यासाठी घर खरेदी करण्यात आले. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा व मोठा आप्तपरिवार आहे. हरीश अडय़ाळकर यांचे निधन ही सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक चळवळीची अतिशय मोठी हानी आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या