पोटभर पोहे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रश्मी वारंग

काही पदार्थ निगुतीने बनवायचे असतात, तर काही पदार्थ तुम्ही कितीही वेळा बनवले तरी आपली लोकप्रियता कायम राखतात. पोहे हा असाच पदार्थ आहे. रोज रोज बनवूनही अतिपरिचयात अवज्ञा न झालेले पोहे म्हणजे मराठी घरातील नाश्त्याचा हुकमी एक्का. 7 जूनला ‘पोहे दिवस’ आपण साजरा केला. या पोटभरीच्या पोह्यांची ही कहाणी…

पोहे तयार करण्यासाठी तांदूळ दोन-तीन दिवस पाण्यात भिजत ठेवतात. नंतर काही मिनिटे पाण्यात शिजवतात. थंड झाल्यावर तांदूळ काढून मातीच्या किंवा लोखंडाच्या तव्यात टरफल निघेपर्यंत गरम केला जातो. मग उखळात लाकडी मुसळाने बडवून भात चपटा करतात आणि टरफले वेगळी करतात. यांत्रिक पद्धतीत रुळांचा वापर करून त्यावर योग्य दाब देऊन पातळ पोहे तयार करतात. पूर्वापार चालत आलेल्या या पद्धतीने तयार केलेल्या पोह्यांत उकडय़ा तांदळाप्रमाणेच जीवनसत्त्वे असतात. खराब न होता पोहे कित्येक महिने साठवून ठेवता येतात.

ही प्रक्रिया आताची नाही. ‘सुदामाचे पोहे’ या गोष्टीचा विचार करता पोहे प्राचीन काळापासून हिंदुस्थानी आहाराचा भाग आहेत. तांदळाला दाबून चपट करण्याच्या प्रक्रियेमुळे पोह्यांना इंग्रजीत फ्लॅटण्ड राइस असे म्हणतात. आपल्याकडील अन्य भाषांमध्ये पोह्यांना वेगवेगळय़ा प्रकारे संबोधले जाते. दक्षिणेकडे ते ‘अवलक्की’ किंवा ‘अवल’ आहेत, कंबोडियात ‘अंबोक’, म्यानमारमध्ये ‘मोंटान’, फिलिपिन्समध्ये ‘पिनिपिग’, तर थायलंडमध्ये ‘खाओमाओ’. नावे वेगवेगळी असली तरी काम मात्र एक…पोट भरणे.

कांदेपोहे, दडपे पोहे, वांगी पोहे ही महाराष्ट्राची खासीयत म्हणता येईल. त्या जोडीने गुळपोहेही आवडीने खाल्ले जातात. या गुळपोह्यांची पाककृती थेट वैदिक काळापर्यंत मागे जाते. उपनिषद काळात पिकं तयार झाल्यावर करायच्या ‘पाकयज्ञ’ नामक संकल्पनेचा उल्लेख आढळतो. नव्या धान्याची खीर, नव्या भाताचे पोहे, पोह्यांचाच गोड पदार्थ या यज्ञासाठी बनवला जाई. आजही कोकणात दिवाळीच्या पहिल्या दिवशी, ‘चावदिवसाला’ घरोघरी गुळपोहे असतात. छत्तीसगडमध्येही कच्चे पोहे आणि गूळ चावून खातात. तामीळनाडूत शुभप्रसंगी होणारी ‘अवल पायसम’ म्हणजे पोह्यांची खास पाककृती. हे पोहे नेपाळमध्ये ‘दही चुरा’ म्हणून खाल्ले जातात. पोह्यांमध्ये पिकलेलं केळं, दही साखर घालून हा दही चुरा बनतो. आपल्याकडच्या शिखरणासारखी तिथली ही झटपट तयार होणारी डिश आहे, पण अधिकतर शेतकरी वर्गात ती लोकप्रिय आहे.

महाराष्ट्रातील कांदेपोह्याचे जुळे भावंड म्हणजे इंदुरी पोहे. मराठा राज्यकर्ते आपल्या राज्यकारभारासह पदार्थही अन्य प्रांतात घेऊन गेले. त्यामुळे महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात पोहे खाणं ही संस्कृती आहे. भल्यामोठय़ा परातीत तयार कांदेपोह्यांचा ढीग घेऊन फिरणारे गाडीवाले असतात. द्रोणातून हे कांदेपोहे देताना वर फरसाण, चिवडा, कच्चा कांदा, चाट मसाला पसरतात. महाराष्ट्रातील पोह्यांचं हे इंदुरी रूप.

अशा या लोकमान्य पदार्थाच्या सन्मानार्थ 7 जून हा दिवस का निवडण्यात आला, याचा पत्ता लागत नाही. कांदेपोहे म्हणजे साधेपणातील सौंदर्य आहे. फार नट्टापट्टा न करताही मनाला भावणारी माणसं असतात. तसंच या पोह्यांचं आहे. साधे, फारसे नखरे न करता झटपट तयार होणारे तरीही सात्त्विक आणि पोटभरीचे.

पसंत आहे मुलगी…

महाराष्ट्रातील प्रांतोप्रांती कांदेपोहे खाणं हा एक नित्यनेम आहे. अनेकांच्या घरी रविवार आणि पोहे हे समीकरण असतं. या पोह्यांत कधी कधी बटाटा, शेंगदाणा विराजमान होतात, पण कोणताही तामझाम न करता साधेसुधे पोहे पोटभरीचे ठरू शकतात. विशेष म्हणजे हे पोहे गरीबापासून श्रीमंतापर्यंत सर्वसंचारी आहेत. केव्हाही, कधीही, कुठेही अशा उपलब्धतेमुळे या पोह्यांचं नातं ‘मुलगी पाहणे’ कार्यक्रमाशी जोडलं गेलं असावं. स्थळ पाहणे कार्यक्रमाला ‘कांदेपोह्यांचा कार्यक्रम’ असं नाव मिळण्यापर्यंत हे नातं घट्ट होतं. या कांदेपोह्यांनी किती लग्नं जुळवली याची गणती नाही. म्हणूनच कोण्या कवीला आयुष्याला उपमा देताना म्हणावंसं वाटतं, ‘आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे.’