मुद्दा : अतिवृष्टीमुळे मुंबईची कोंडी का होते?

116


>> पुरुषोत्तम कृ. आठलेकर

मागील काही वर्षांत मुंबईत पूर्वी इतकाच पाऊस पडतोय तरीसुद्धा अशी दैन्यावस्था का होते? पावसामुळे साठणारे पाणी, रेल्वे व बस प्रवास, होणारी वाहतूककोंडी आणि वाढणारी प्रचंड गर्दी यामुळे सर्वसामान्य नागरिक व प्रवाशांचे जीवन विस्कळीत नव्हे तर यातनादायी झाले आहे. सर्वच यंत्रणा हतबल होत चालल्या आहेत का? या यातनादायी जनजीवनाचे खऱ्या अर्थाने नियोजन करून आवश्यक ती पावले उचलून युद्धपातळीवर कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे. एकमेकांवर दोषारोप करून काहीच साध्य होणार नाही. त्याकरिता भौगोलिक परिसर, आपत्ती व्यवस्थापन या दृष्टिकोनातून विचार-विनिमय होणे आवश्यक आहे. केवळ महापालिका व राज्य शासन यांना जबाबदार धरून चालणार नाही, तर वस्तुस्थितीचा विचार होणे गरजेचे आहे. भौगोलिकदृष्टय़ा विचार करता मुंबई हे एक बेट आहे आणि त्याच्या सभोवताली पाणी आहे. वाढती लोकसंख्या, परप्रांतीयांचे लोंढे, वाढणारी वाहन संख्या या सर्वांपुढे महापालिका, बेस्ट, रेल्वे प्रशासन व राज्य शासन यांच्या यंत्रणा हतबल ठरत चालल्या आहेत. रस्त्याचे नियोजन, नालेसफाई, पडणारे खड्डे, सर्व प्रकारची कामे, व्यवस्थापन आणि कालावधी यांचा विचार करता वाहतूक व्यवस्था व वाहतूक कोंडी हा मोठा अडथळा ठरत आहे. पावसाचे पाणी हे समुद्रात जात असल्यामुळे भरती आली की, तेच पाणी पुन्हा शहरात फेकले जाते. अशा वेळेला पावसाचा जोर वाढला आणि कितीही नालेसफाई केली असली तरी सखल भागात पाणी हे साठणारच. हीच वस्तुस्थिती रेल्वेलाइनलगत असलेल्या अनधिकृत झोपडय़ा व बांधकाम यामुळेच रेल्वे ट्रकवर पाणी साठते. यावरून सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांवर दोषारोप करण्यापेक्षा नियोजन व आपत्ती व्यवस्थापन याअनुषंगाने समन्वय साधला गेला पाहिजे. नित्कृष्ट दर्जाच्या कामावर नक्कीच कारवाई झाली पाहिजे. वाहनांची संख्या व होणारी वाहतूककोंडी लक्षात घेता रस्त्याचे नियोजन, व्यवस्थापन आणि कामाचा कालावधी यासाठी महापालिकेला तारेवरची कसरत करावी लागत असते. रस्त्याचे व्यवस्थापन झाले नाही की, अतिवृष्टीने त्यांना खड्डे पडतात हे नेहमीचेच झाले आहे. म्हणून केवळ महापालिकेला दोष देऊन चालणार नाही, तर वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या, होणारी कोंडी, नियोजन, व्यवस्थापन याला पुरेसा न मिळणारा कालावधी अशी अनेक कारणे आहेत. हीच वस्तुस्थिती रेल्वे प्रशासनाची असल्यामुळे या सर्व यंत्रणा हतबल ठरत चालल्या आहेत. तसेच शहरात मेट्रो, मोनोसारखे अनेक प्रकल्प कार्यान्वित आहेत. त्यामुळे होणारे खोदकामसुद्धा पाणी तुंबण्यास पूरक आहे. मुंबई ही आर्थिक व सांस्कृतिक उपजीविकेचे शहर असल्यामुळे परप्रांतीयांचे लोंढे या शहरावर आदळत आहेत. नुसता दैनंदिन  33 हजार टन सुका व ओला कचरा याचा जरी विचार केला तरी त्याचे वर्गीकरण, विघटन करण्यासाठी महापालिकेचे इन्फ्रास्ट्रक्चर, नियोजन, व्यवस्थापन, मनुष्यबळ यांच्यावर प्रचंड ताण पडत आहे याचाही विचार होणे आवश्यक आहे. आज कचरा व त्याचे विघटन, त्यासाठी लागाणारी डम्पिंग ग्राऊंड हेसुद्धा एक आव्हान आहे. अशी अनेक मोठी आव्हाने महापालिका, रेल्वे प्रशासन आणि राज्य शासन यांच्यासमोर आहेत, पण या सर्व समस्यांच्या मुळाशी आपण गेलो तर एकच उत्तर सापडेल ते म्हणजे वाढती लोकसंख्या, आदळणारे परप्रांतीयांचे लोंढे, वाहनांची वाढती संख्या आणि मुंबईच्या भौगोलिक मर्यादा यामुळेच या सर्व यंत्रणा हतबल झाल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या