Hi tech अग्निशमन दल

>> नमिता वारणकर

आपले अग्निशमन दल आता तांत्रिकदृष्टय़ा अत्यंत विकसित होत आहे व यात महिलांचा सहभाग मोठा आहे.!

वाढते शहरीकरण…गगनचुंबी टॉवर…वाढती लोकसंख्या… गल्ल्यागल्ल्यांमधली घरं… वाढतं शहरीकरण…त्याअंतर्गत येणाऱ्या अत्याधुनिक सुविधा साऱयांनाच हव्याहव्याशा असल्या तरी यामुळे काही दुर्घटनाही घडू शकतात. सध्या वारंवार घडणारी घटना म्हणजे आग लागणे…मात्र आता अग्निशमन दल हायटेक होणार  आहे. आधुनिक तंत्राद्वारे आग रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. याकरिता आग विझवण्याकरिता रोबोटचाही वापर केला जाणार आहे. यामुळे आग लागण्याच्या घटनांवर नियंत्रण येईल.

सध्या ठिकठिकाणी इमारतींचं बांधकाम मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे. गगनचुंबी इमारतींना आग लागल्यास त्यावर नियंत्रण मिळवणं अग्निशमन दलासाठी अडचणीचं ठरतं. शिवाय पूरस्थिती, लिफ्ट कोसळण्याच्या घटना, नाल्यात पडून होणारे मृत्यू, झाड कोसळणे अशा घटनांमुळे ताण आणि आव्हानही  वाढतच चालले आहे. त्यामुळे अग्निशमन दलाने हायटेक होण्याचा निर्णय घेतला आहे.

अग्निशमन दल हे वेगळं म्हणजेच आव्हानात्मक क्षेत्र आहे. या क्षेत्रात जायचं असेल तर धाडस हवंच पण त्याचबरोबर कठोर मेहनत घेण्याची अचानक उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्याची तयारी हवी. लोकांची सेवा करण्याची संधी मिळते. शरीराला अंगमेहनतीची सवय लागते. याकरिता आधीपासूनच खो खो, कबड्डी, लंगडी अशा मैदानी खेळांची आवड असेल तर प्रशिक्षण सोपे जाऊ शकते. पूर्वी फक्त या क्षेत्रात पुरुषांनाच प्राधान्य असे, आता मात्र तसे नाही. स्त्रीयाही आपले कर्तृत्व येथे सिद्ध करू शकतात, याकरिता त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात या क्षेत्रात यायला हवं, अशी प्रतिक्रिया प्रशिक्षण घेणाऱ्या महिला व्यक्त करतात.

 तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अद्ययावतीकरण

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अद्ययावतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यात इंटिग्रेटेड कमांड व कंट्रोल सिस्टीम, जीआयए आणि जीपीएस आधारित स्वयंचलित वाहन मागोवा प्रणाली व डिस्ट्रेस कॉल रिस्पॉन्स मॅनेजमेंट सिस्टीम-डायल 101 ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. डिजिटल मोबाइल रेडिओ प्रणालीच्या वापरास देखील सुरुवात करण्यात आली आहे. अग्निशमन दलाची संपूर्ण बिनतारी यंत्रणा डिजिटल रेडिओ प्रणालीमध्ये बदलण्यात येत असून ती लवकरच कार्यान्वित होणार आहे. अग्निशमन दलाच्या ताफ्यात फायर रोबोट दाखल झाला असून रासायनिक, जैविक तसेच आण्विक यांसारखी परिस्थिती हातळण्यासाठी हॅजमॅट या 55 मीटर उंचीच्या वॉटर वाहनासाठी याचा वापर होईल.

हायटेक होणार म्हणजे ?

  • आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आग रोखण्यासाठी केल्यास आगीच्या घटना रोखण्यात मदत होणार असल्यामुळे मुंबईतील 24 विभागांवर स्वतंत्र अग्नी सुरक्षा पालन कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.
  • आधीपासूनच अग्निशमन दलाच्या मुख्यालयात इंटीग्रेटेड कमांड आणि कंट्रोल सिस्टम कार्यरत आहे. तसेच जीपीएस प्रणालीवर आधारित स्वयंचलित मागोवा प्रणालीही कार्यरत आहे. अग्निशमन दलात आता डिजिटल मोबाईल रेडिओ प्रणाली लागू करण्यात येणार आहे.
  • अग्निशमन दलात आग विझवण्यासाठी रोबोटही तैनात केला जाणार आहे. त्याशिवाय 64 मीटरहून अधिक उंचीचा टर्न लँडर किंवा हायड्रोलिक प्लॅटफॉर्म, 50 मीटर उंचीचा हायड्रोलिक प्लॅटफॉर्म, ड्रोन आणि क्विक रिस्पॉन्स वाहनाचा समावेशही अग्निशमन दलात करण्यात येणार आहे.

हायटेकसाठी नवीन प्रकल्प

  • 64 मीटर व त्यापेक्षाही अधिक उंचीच्या टर्न टेबल लॅडर किंवा हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म उभारणार.
  • 50 मीटर उंचीचे हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म, ड्रोन्स, जलद प्रतिसाद वाहने, उपकरणांच्या खरेदीचा समावेश.
  • अग्निशमन जवानांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी अद्ययावत ‘ड्रिल टॉवर कम मल्टी युटिलिटी ट्रेनिंग सिम्युलेटर्स’ची बांधणी करणार.
आपली प्रतिक्रिया द्या