
>> जयंत भाभे
ज्या विद्यार्थ्यांची घरची परिस्थिती बेताची आहे, ज्या विद्यार्थ्यांना तातडीने स्वतःच्या पायावर उभे राहणे आवश्यक आहे, ज्या विद्यार्थ्यांची स्वतःची ओळख तयार करण्याची जिद्द आहे, अशा विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाची निवड जरूर करावी. त्याअंतर्गत उपलब्ध असलेल्या कोर्सेसपैकी एखादा कोर्स विद्यार्थ्यांची आवड आणि क्षमतेनुसार निवडावा. महाराष्ट्रातील युवा पिढीने लवकरात लवकर आवश्यक व्यवसाय शिक्षण पूर्ण करणे क्रमप्राप्त ठरते.
दहावीनंतर पुढे काय? हा प्रश्न अनेकांना दरवर्षी पडतो. त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने करीत असतो. मात्र दहावीनंतर शिक्षणाच्या ज्या अनेक संधी उपलब्ध आहेत त्यापैकी एकाचीच आपल्याला निवड करायची असते. हे खूप महत्त्वाचे आणि तसे कठीण वाटणारे काम असते. पण नीट विचार करून निर्णय घेतला तर खूप काही साध्य होऊ शकते. त्यासाठी सभोवताली असलेल्या शैक्षणिक संधींकडे डोळस नजरेने मात्र पाहायला हवे. आपण अशाच एका शैक्षणिक संधीबाबत माहिती घेऊ. ही संधी आहे कमी शुल्क, कमी खर्च, कमी वेळेत प्रभावी व्यवसाय शिक्षण देणारी. उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम योजना असे या अभ्यासक्रमाचे नाव आहे.
महाराष्ट्रातील औद्योगिक, व्यावसायिक आणि अन्य सर्वच क्षेत्रांतील तंत्रज्ञ, कामगार, मजूर तसेच स्वयंरोजगार करणारे अनेक परप्रांतीय बांधव त्यांच्या राज्यात परतले आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्रीयन युवकांना रोजगार अथवा स्वयंरोजगार मिळवता येतील असे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या राज्यात मनुष्यबळाची मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. ही पोकळी भरून काढण्याची हीच वेळ आहे. जर आपण ती साधली तर कोरोना ही आपत्ती न ठरता इष्टापत्ती ठरेल. त्यासाठी महाराष्ट्रातील युवा पिढीने लवकरात लवकर आवश्यक व्यवसाय शिक्षण पूर्ण करणे क्रमप्राप्त ठरते.
या पार्श्वभूमीवर उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम योजना हा एक चांगला पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. त्यालाच एचएससी व्होकेशनल असेही संबोधले जाते. पूर्वी या अभ्यासक्रमाला किमान कौशल्यावर आधारित व्यवसाय अभ्यासक्रम योजना किंवा एमसीव्हीसी म्हणून ओळखले जात होते.
महाराष्ट्र शासनाच्या दोन विभागांच्या म्हणजे कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या अधिपत्याखाली असलेले व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय आणि शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग यांच्या अधिपत्याखाली असलेले महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ या महत्त्वाच्या यंत्रणांमार्फत आणि त्यांच्या समन्वयातून या अभ्यासक्रमाचे संचलन, नियंत्रण, व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचे मूल्यमापन करण्यात येते. महाराष्ट्रात उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम योजना 924 अशासकीय अनुदानित आणि 540 विनाअनुदानित अशा एकूण 1517 संस्थांत उपलब्ध आहे.
या योजनेची ठळक वैशिष्टय़े पुढीलप्रमाणे –
1) गेल्या 32 वर्षांपासून हा अभ्यासक्रम यशस्वीपणे आणि अखंडितपणे राज्यात अनुभवी आणि तज्ञ शिक्षकांच्या सहकार्याने सुरू आहे. 2) अकरावी आणि बारावी या दोन वर्षांत हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. 3) कुठल्याही विद्यार्थ्याला कमी वयामध्ये रोजगारक्षम किंवा स्वयंरोजगारक्षम करून त्याला स्वतःच्या पायावर उभे करण्याइतकी क्षमता या अभ्याक्रमात आहे. 4) औद्योगिक आणि व्यावसायिक जगताच्या अपेक्षा विचारात घेऊन अभ्याक्रमात चांगले बदल करण्यात आले आहेत. सहा वेगवेगळय़ा गटांत किंवा सेक्टरमध्ये तो उपलब्ध आहे. 5) महाराष्ट्रातील सुमारे 1517 संस्थांत या अभ्यासक्रमाचे अध्यापन सुरू आहे. 6) शैक्षणिक वर्ष 2016-17 पासून त्यात आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. 7) हा अभ्यासक्रम घेऊन इयत्ता बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना पुढे शिकायचे आहे ते उच्च शिक्षण घेऊ शकतात. ते पीएचडी किंवा पीएचडीनंतरही शिकू शकतात. 8) शिकाऊ उमेदवारी योजनेत उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाचा समावेश आहे.9) ऑन द जॉब ट्रेनिंग आणि औद्योगिक, व्यावसायिक तसेच वित्तीय संस्थांच्या भेटींचे आयोजन करण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांना या विश्वाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. 10) सगळय़ात महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणजे, अभ्यासक्रमाचे स्वरूप सोपे आहे. तसेच तो शिकत असताना भरपूर प्रात्यक्षिकांचा सराव मिळत असल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि जिद्द वाढते. 11) अभ्यासक्रमासाठी येणारा खर्च कमी आहे. दोन्ही वर्षांची फी अल्प आहे. अन्य शिक्षणाच्या योजनांचा विचार करता नगण्य शुल्कामध्ये उत्तम आणि प्रभावी शिक्षण या अभ्यासक्रमामार्फत विद्यार्थ्यांना घेता येते. 12)विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित असल्यामुळे शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्यासाठी भरपूर वेळ देता येतो आणि त्यामुळे उच्च दर्जाचे शिक्षण त्यांना मिळत असते. 13) गणित, विज्ञान अथवा क्लिष्ट विषय या अभ्यासक्रमात नाहीत. म्हणून विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा ताणतणाव नसतो. 14) इयत्ता 10वीत 1 किंवा 2 विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही वर्ष वाया जाऊ नये म्हणून काही अटी व शर्तीसह या अभ्यासक्रमासाठी इयत्ता 11 वीला प्रवेश मिळतो.
इंजीनियरिंग सेक्टरमधील इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी आणि मेकॅनिकल टेक्नॉलॉजी या सहा रूपात हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. पॅरामेडिकल सेक्टरमध्ये रेडिओलॉजी टेक्निशियन, मेडिकल लॅब टेक्निशियन, ऑफ्थॅल्मिक टेक्निशियन, चाइल्ड, ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्व्हिसेस असे चार कोर्सेस आहेत. कॉमर्स अँड ट्रेड या विभागामध्ये लॉजिस्टिक अँड सप्लाय मॅनेजमेंट, अकाउंटिंग-फायनान्शिअल ऑफिस असिस्टंट, बँकिंग-फायनान्शिअल सर्व्हिसेस- इन्शुरन्स आणि मार्केटिंग रिटेल मॅनेजमेंट असे कोर्स आहेत. हॉस्पिटॅलिटी विभागात टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट आणि फूड प्रॉडक्शन या दोन कोर्सचा समावेश होतो. ऑग्रिकल्चर विभागात हॉर्टिकल्चर, क्रॉप सायन्स आणि ऑनिमल हजबंडरी, डेअरी टेक्नॉलॉजी हे तीन तर फिशरी सेक्टरमध्ये फिशरी टेक्नॉलॉजी हा कोर्स आहे. दोन वर्षांच्या कालखंडात म्हणजे अकरावी आणि बारावीला एकूण आठ विषय असतात. त्यात पहिला इंग्रजी, दुसरा मराठी-हिंदी किंवा अन्य भाषांचा आहे. जनरल फाऊंडेशन कोर्स म्हणजे पायाभूत अभ्यासक्रम हा तिसरा विषय. यात रोजगार कौशल्य विकास अकरावीला तर उद्योजकता विकास बारावीला शिकवला जातो. अनिवार्य असलेले विषय आहेत पर्यावरण शिक्षण आणि आरोग्य व शारीरिक शिक्षण हे दोन विषयही विद्यार्थ्यांना शिकावे लागतात. या विषयांचे मूल्यमापन हे श्रेणीनुसार करण्यात येते. हे पाचही विषय सर्व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमांच्या इयत्ता अकरावी आणि बारावीकरिता कॉमन आहेत. यानंतर कोर्सनुसार तीन वैकल्पिक विषय अकरावीला आणि तीन विषय बारावीला शिकावे लागतात ज्या विद्यार्थ्यांची घरची परिस्थिती बेताची आहे. ज्या विद्यार्थ्यांना तातडीने स्वतःच्या पायावर उभे राहणे आवश्यक आहे अशा विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाची निवड जरूर करावी. त्याअंतर्गत उपलब्ध असलेल्या कोर्सेसपैकी एखादा कोर्स विद्यार्थ्यांची आवड आणि क्षमतेनुसार निवडावा. या अभ्यासक्रमाचा तपशील जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय अथवा http://www.dvet.gov.in यावर मिळू शकेल.



























































