
>> यादव तरटे पाटील
प्रत्येक वन्य प्राण्यांचे स्थलांतराचे मार्ग ठरलेले असतात, हत्तींचेही तसेच आहे. मात्र अनुकूल अधिवास वाटला तर ते स्थिरावू शकतात. अशा क्षेत्रात मानवी हस्तक्षेप वाढला की, ते बिथरतात. यात पीकहानी व प्रसंगी जीवितहानी होते. अशा वेळी त्यांना हुसकावून लावण्याचे प्रयत्न केले जातात, पण या समस्येचे निराकरण हुसकून लावण्यात नाही, तर त्यांचे नैसर्गिक अधिवास सुरक्षित ठेवण्यात आहे.
निसर्गात होणारे बदल कुणी बघो अथवा न बघो, कुणी त्याचा अनुभव घेवो अथवा न घेवो, ते घडतच असतात. सतत व समवर्ती चालणारी ही प्रक्रिया आहे. एखादा बदल, घटना आपण पाहिली म्हणजे ती प्रथमच घडत आहे असा अर्थ काढणे संयुक्तिक होणार नाही. नव्याने नोंदलेल्या प्रजाती पूर्वीपासून तिथे राहत असाव्यात, विशेष घडलेल्या घटना तिथे घडत असाव्यात, असेही वास्तव असू शकते. केवळ शास्त्राrय नोंदी नाहीत म्हणून आपण काही घटना नाकारू शकत नाही. महाराष्ट्रात आलेले हत्तीसुद्धा प्रथमच आले असे म्हणणेसुद्धा तितकेच गैर आहे.
तब्बल दोन हजार किमीचा प्रवास करून हत्ती विदर्भात दाखल झालेत. 20 वर्षांपासून त्यांची ये-जा सुरू आहे. म्हणून त्यांचे आगमन आताच झाले असे नाही. भंडारा जिह्यात 200 वर्षांपूर्वी काही हत्तींचा कळप होता अशा नोंदी आहेत. सन 1829 मध्ये नवेगाव नागझिरा जंगलात हत्तींचा वावर असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. जरी महाराष्ट्र, छत्तीसगड, गोवा व मध्य प्रदेश हे हत्तीचे पारंपरिक भूक्षेत्र नसल्याचा नोंदी नसल्या तरीही आज महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांत गेल्या दोन दशकांपासून त्यांचा कमी अधिक प्रमाणात वावर आहे. म्हणजेच पारंपरिक अधिवास असलेल्या पश्चिम बंगाल, ओडिशा व कर्नाटकातील हत्तींनीही आता नवीन भूप्रदेशाकडे मोर्चा वळविला आहे. दक्षिण भारतातील जंगलामध्ये घाणेरी, रानमोडीसारख्या वनस्पतीच्या बेलगाम वाढीमुळे व अधिवासातील मानवी हस्तक्षेपामुळे हत्ती तसेच इतर तृणभक्षी प्राण्यांचे नैसर्गिक अन्न कमी झाले. वायनाड, नागरहोले, मुदुमलाई, बंदीपूर इत्यादी वनक्षेत्रामधून हत्ती मानवी वस्तीकडे आलेत. कोकणच्या सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि आता विदर्भातील गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिह्यांपर्यंत त्यांचा वावर आढळतो आहे. प्राणवायू, पाणी व अन्न हेच वन्य प्राण्यांच्या मुख्य मूलभूत गरजा आहेत. मुबलक पाणी व अन्नासाठी नवनवीन वनक्षेत्र शोधणे हा हत्तीचा स्वभाव गुणधर्म आहे. सन 2002 मध्ये हत्तींचे दोडामार्गमार्गे सिंधुदुर्ग जिह्यात पहिल्यांदा आगमन झाले, तर सन 2003 मध्ये चंदगड तालुक्यात ते आलेत.
प्रत्येक वन्य प्राण्यांचे स्थलांतराचे मार्ग ठरलेले असतात, हत्तींचेही तसेच आहे. मात्र अनुकूल अधिवास वाटला तर ते स्थिरावू शकतात. अशा क्षेत्रात मानवी हस्तक्षेप वाढला की, ते बिथरतात. यात पीकहानी व प्रसंगी जीवितहानी होते. पण या समस्येचे निराकरण हुसकून लावण्यात नाही, तर त्यांचे नैसर्गिक अधिवास सुरक्षित ठेवण्यात आहे. मुळात हत्तीव्याप्त क्षेत्राला मर्यादा नसतात. हत्ती एका वनक्षेत्रात स्थिर राहू शकत नाही. सबब, विशिष्ट वन प्रदेशात त्यांचा बंदोबस्त करणे म्हणजे तात्पुरती मलमपट्टी आहे. काही दिवसांपूर्वी गोंदिया व चंद्रपूर जिह्यांत त्यांचा वावर असल्याचे स्पष्ट झाले. ते आता पूर्वीपेक्षा अधिक आक्रमक झाले आहेत. एकूण 22 ते 23 हत्तींचा कळप तिथे सध्या अधूनमधून दिसत असतो. गडचिरोली, भंडारा व गोंदिया परिसरात तब्बल एक वर्षापासून त्यांचे वास्तव्य आहे. हे हत्ती दिवसा जंगलात राहतात व रात्री गावालगत येतात असे भंडारा जिह्याचे उपसंरक्षक राहुल गवई म्हणाले. काही दिवसांपूर्वी तर चक्क गडचिरोली शहरात रात्रीचा फेरफटका मारताना हत्तींच्या चित्रफिती समाज माध्यमांतून प्रचंड फिरत होत्या.
विदर्भातील हे हत्ती गटात विभागले गेले नसल्याचे दिसून येत आहे. मात्र कोकणातील हत्ती गटागटाने विभागून फिरतात. हत्ती हा कळपाने राहणारा प्राणी कुटुंबवत्सल व संवेदनशील असतो. पिलांच्या सुरक्षेबाबत ते प्रचंड सजग असतात. थोडे जरी त्यांना असुरक्षित वाटले तरी ते बेभान होऊन हल्ला करतात, तर मीलन काळात त्यांच्या खासगी जीवनात व्यत्यय असल्यास ते प्रचंड आक्रमक होतात. हत्तीच्या कुटुंबाला सलग वनक्षेत्र हवे असते. किमान 600 चौकिमीचे अखंड क्षेत्र हवे. मात्र आज असे अखंड क्षेत्र उपलब्ध नसल्याने त्यांच्या संचार क्षेत्राला मर्यादा निर्माण होत आहे. यातूनच हल्ला केल्याच्या घटनांची दिवसेंदिवस वाढ होताना आपल्याला दिसत आहे.
सन 1980च्या दशकात सुमारे 93 लाख हत्ती आशियात होते, तर सध्या ही संख्या फक्त पन्नास हजारांवर आली आहे. दुसरीकडे आशियातील मानवी लोकसंख्या शेकडो कोटींनी वाढलेली आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर (IUCN) या संघटनेच्या लाल यादीमध्ये (Red List) म्हणजेच धोक्यात असलेल्या प्रजातींमध्ये हत्तीचा समावेश करण्यात आला आहे. या तुलनेत आज हत्तींची संख्या प्रचंड कमी झालेली असतानाही संघर्षाची धार मात्र अधिक तीव्र होताना दिसत आहे.
मानव-हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी दीर्घकालीन उपायांची गरज आहे. धोरण ठरवणाऱयांनी व लोकप्रतिनिधींमध्ये योग्य समन्वय आवश्यक आहे. वन्य जीव व वन विभागाकडून तत्काळ पंचनामा, तातडीने नुकसान भरपाई व प्रभावी व वास्तववादी उपाययोजना होणे अधिक महत्त्वाचे आहे. स्थानिक जंगलाची पुरेपूर माहिती असलेल्या माहीतगारांचे विशेष दल उभारण्याची आवश्यकता आहे. अन्नामलाई पर्वतरांगांमध्ये वन विभाग व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने इन्फॉर्मेशन नेटवर्क उभारण्यात आले आहे. हत्तींच्या स्थलांतराचा शास्त्राrय पद्धतीने अभ्यास करून त्याची माहिती स्थानिक टीव्ही चॅनल्स व सोशल नेटवर्कच्या माध्यमातून लोकांना सतर्क केले जाते. लाल रंगाच्या सर्च लाईट टाकून लोकांना जागरूक करण्यासाठी अनेक सर्च लाईट टॉवर हत्तीव्याप्त क्षेत्रात अभारण्यात आले आहेत. कर्नाटकातील बंदीपूर नॅशनल पार्कमध्ये खंदक, सौर कुंपणे उभी करून व हत्तींच्या सवयीचा आणि हालचालीचा अभ्यास करून स्थानिक लोकांच्या व स्वयंसेवी संस्थाच्या सहकार्याने संघर्ष कमी केला गेला आहे.
गडचिरोलीमधील नागरिकांनी, विशेषत वडसा वनक्षेत्रामध्ये हत्तींचे अस्तित्व स्थानिकांनी मान्य केले आहे. भंडारा, गोंदिया जिह्यांत मात्र अजूनही अस्तित्व मान्य केलेले नाही. ते करणे क्रमप्राप्त आहे. मात्र आपण किती बंदोबस्त करणार? हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे या संघर्षावर उपाययोजना शोधायच्या असतील तर आधी हत्तींचे अस्तित्व आपण मान्य केले पाहिजे. हत्तींसोबत जुळवून घेण्यास, सोबत सहजीवन साधण्यास आपण आपली तयारी दर्शविली तरच जीवितहानी कमी करता येणे शक्य आहे.
www.yadavtartepatil.com
(लेखक महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य आहेत.)