लेख – सर्वेः सन्तु निरामयः

676

>> दिलीप जोशी 

आपल्यासारखी म्हणजे ‘विचारशील’ (सेपियन) किंवा सूज्ञ माणसं पृथ्वीवर अधिराज्य गाजवायला लागली त्याला सुमारे दोन लाख वर्षं झाली. इतर प्राण्यांच्या तुलनेत अधिक विकसित झालेला मेंदू तसंच अनेक कामं यांत्रिक पद्धतीनेही करण्यासाठी पूरक अशी शरीररचना या गोष्टींच्या जोरावर पृथ्वीवरच्या समस्त प्राण्यांचं स्वामित्व माणसाने स्वतःकडे घेतलं. दक्षिण आफ्रिकेत जोहॅनिसबर्गजवळच्या एका गावात ‘आपल्यासारखा’ माणूस प्रथम जन्माला आला. त्यामुळे त्याला ‘ह्युमन क्रॅडल’ किंवा मानव जन्माचा ‘पाळणा’ असं म्हटलं जातं.

सभोवतालच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यानुसार आपलं जीवन जगण्यासाठी नैसर्गिक उर्मी मुंग्या, मधमाशांपासून ते वाघ, सिंहापर्यंत अनेक प्राण्यांना होती. डायनॉसॉरसारख्या महाकाय प्राण्यांचा तर सबंध पृथ्वीवर अनिर्बंध संचार होता. हिंदुस्थानी उपखंडातही त्यांचं वास्तव्य असण्याचे पुरावे सापडले आहेत. अशा या अजस्र प्राण्याचा नाश प्रचंड उल्कापाताने झाला. एक महापाषाण पृथ्वीवर आदळला आणि डायनॉसॉरना नामशेष करून गेला. त्यानंतर ते ‘अवतरले’ ते ‘ज्युरॅसिक पार्क’च्या पडद्यावरच!

मात्र या महाप्राण्याच्या अस्तानंतर इतर प्राण्यांचा विकास होऊ लागला. हत्तीसारखे प्रचंड आणि घोडय़ासारखे चपळ प्राणी तयार झाले. शिकवून ‘तयार’ करता येणाऱ्या प्राण्यांत त्यांची गणना होऊ लागली आणि श्वानवंशाने तर माणसाचा मदतनीस होण्याची कामगिरी पार पाडायला सुरुवात केली. अर्थात या सर्वांना ‘सृष्टी’शी जुळवून घेण्याची समज होती, परंतु आपल्या भोवतीची परिस्थितीच आपल्याला हवी तशी बदलण्याची उक्रांती त्यांच्यात झाली नाही. मुंग्यांची वारूळं आणि मधमाशांचे पोळे विस्मयकारी नक्कीच, पण त्यात ‘बदल’ झाला नाही. लाखो वर्षं ती तशीच आहेत. हीच नैसर्गिक उर्मी किंवा नॅचरल इन्स्टिंक्ट.

माणसाने स्वतःमध्ये कालसुसंगत बदल घडवले. निसर्गाशी जुळवून घेताना नैसर्गिक गोष्टींमधून स्वतः निर्माण केलेल्या ‘कृत्रिम’ गोष्टींची संख्या वाढू लागली आणि त्यात वारंवार बदल घडू लागले. कधी काळी दुमजली घर हेसुद्धा अप्रूप असेल. आता शंभर-दीडशे मजल्यांच्या गगनस्पर्शी इमारती पृथ्वीवर ठायी ठायी उभारलेल्या दिसतील.

आधुनिक यंत्रयुगाच्या आरंभाने तर माणसाच्या जीवनाची ‘गती’ कमालीची वाढली. ती अजूनही वाढतेच आहे. घोडय़ावरून प्रवास करणारा माणूस स्पेसमध्ये गेलाय. संपर्कसाधनांनी तर विलक्षण क्रांती केलीय. संपर्कसाधनं गतिमान झाली तेव्हा आधी बोटी आणि मग विमानाद्वारे जगातली माणसं पृथ्वीभर हिंडू लागली. यातून परस्पर सांस्कृतिक आदानप्रदान झालं.

याबरोबरच जगाच्या विविध भागांतले विकारही जगभर पसरले. सातव्या-आठव्या शतकात देशाबाहेरून आलेल्या ‘प्लेग’ने आपल्याकडे भयंकर धुमाकूळ घातला. एकटय़ा एकोणिसाव्या शतकात देशात प्लेगने पाच-सात लाखांचा बळी गेला. याशिवाय मलेरियासारख्या मौसमी ताप होताच. ‘काळा ताप’सुद्धा आफ्रिकेतून आल्याचं म्हटलं जातं. यावर औषधंही निघाली. 1954 मध्ये अलेक्झॅन्डर फ्लेमिंग यांनी ‘पेनिसिलीन’चा शोध लावून क्रांती केली. अनेक विकार या प्रतिजैविकाने आटोक्यात आणले. आता ते जाऊन त्यापुढची औषधं आली आहेत.

तरीसुद्धा कॅन्सरसारखा फसवा विकार माणसाला सतावतोच. त्यातच 70-80 च्या दशकात भर पडली ती ‘एड्स’ नावाच्या रोगाची. त्यावेळी ‘अशुभ दारी आले’ असं त्यावर लिहिल्याचं आठवतं. 2005 मध्ये असुरक्षित कामजीवनातून होणाऱ्या या रोगाने जगात लाखो बळी घेतले. 1988 पासून जागतिक आरोग्य संघटनेने एड्सविरोधी दिवस पाळण्याचं ठरवलं. 1 डिसेंबर ही तारीख ठरली. दरवर्षी विविध ‘बोधवाक्य’ (थीम) घेऊन जगभर या भयानक रोगाविरुद्ध प्रचार सुरू झाला. त्याचं फलित म्हणजे 2016 पर्यंत एड्स रुग्णांची संख्या कमी झाली. तो पूर्ण नष्ट करायचा तर औषधाबरोबरच सदाचाराची दीक्षा घ्यायला हवी. माणसाला भेडसावणाऱ्या अनेक समस्या माणसानेच निर्माण केल्या आहेत. त्याचं निराकरण तोच करू शकतो. जिद्द आणि प्रयत्न मात्र हवेत, तरच जग तन-मनाने ‘निरामय’ म्हणजे निरोगी होईल. ‘सर्वेः सन्तु निरामयः’ किंवा सर्वजण निरोगी होवोत ही प्रार्थना फळाला येईल.

 [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या