विज्ञानाचा विचार

>> दिलीप जोशी

गेल्या महिन्याच्या अखेरीस राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा झाला आणि त्याच्याच पुढेमागे काही दिवस ‘नासा’च्या पर्सिव्हरन्स ऊर्फ ‘पर्सी’ने मंगळावतरण केले. त्यावरचे ‘इन्जेन्युइटी’ (चातुर्य) नावाचे हेलिकाॅप्टर तिथे भिरभिरू लागले की, तो विज्ञानातला एक विक्रमच ठरणार आहे. याच सुमारास आपल्या ‘इस्रो’ या अवकाश अभ्यास संस्थेने 2021 मधील पहिली मोहीम 19 उपग्रह अंतराळात सोडून यशस्वी केली. यामधले काही उपग्रह देशातल्या विविध विज्ञान संस्थांमधल्या विद्यार्थ्यांनी तयार केले आहेत. नव्या पिढीमध्ये विज्ञान विचार रुजविण्यासाठी असं यश प्रेरणादायी ठरते. वैज्ञानिक संशोधनात मन गुंतले की, बऱयाच रूढीवादी आणि कालविसंगत संकल्पना हळूहळू गळून पडतात.

हे एकदम घडते असे नाही, पण चिकाटीने आणि सातत्याने प्रयत्न केल्यास, एखाद्या गोष्टीच्या कार्यकारणभावाविषयी अभ्यासपूर्ण चर्चा केल्यास नव्या पिढीला आपण विचारप्रवृत्त करू शकतो. आमच्या खगोल संस्थेत असा विचार तरुण वर्गाने करावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. त्यामुळे अनाठायी रूढीवादाची कुटं सर्वांच्याच मनातून लगेच नष्ट होतात असे नाही; परंतु त्यादृष्टीने विचारांची सुरुवात होणे हेसुद्धा महत्त्वाचे ठरते.

विज्ञान आणि वैज्ञानिक संशोधनाचे फायदे सर्वांना उलब्ध असतात आणि हवेच असतात. मात्र त्यामागचे संशोधनाचे प्रयत्न किंवा त्यामागचे तंत्रज्ञान ठाऊक असण्याची शक्यता नसते आणि ते साहजिकच घडते. कारण विज्ञानाचा वापर करणाऱयांच्या हातात ती वस्तू ‘युजर फ्रेण्डली’ होऊन येते. बटन सुरू करताच रेडिओ, टीव्ही लावता येणे, टच फोनमुळे मोबाईल (सेल फोन) सहज हाताळता येणे तसेच घरगुती वापराची अनेक यंत्रे सुलभतेने वापरली जाणे या गोष्टी नव्या नाहीत. टीव्ही, फ्रीज, एसी, काॅम्प्युटर, वॉशिंग मशीन, मिक्सर, मोबाईल अशा कितीतरी गोष्टी जगातल्या कोटय़वधी लोकांच्या जीवनाचा भाग झाल्या आहेत.

संशोधनाच्या दृष्टीने पाहिले तर वेगवान वाहनांपासून ते स्पेसमध्ये जाणाऱया यानांपर्यंतच ‘उडत्या’ वाहनांच्या गतीचा आणि प्रगतीचा प्रवास गेल्या फक्त 120 वर्षांतला आहे. त्यापूर्वी ‘असे काही होते’ असे म्हणायचे तर त्याची वैज्ञानिक शिस्तीतली स्पष्ट नोंद आणि किमान अवशेषजन्य पुरावे मिळायला हवेत. या सर्व आधुनिक संशोधनांपूर्वी प्राचीन काळापासून माणसाचा मेंदू अनेक गोष्टींवर विचार करतच आला आहे. बाराव्या शतकात आपल्या महाराष्ट्रात होऊन गेलेल्या भास्कराचार्यांनी पृथ्वीचा परीघ मोजण्यापासून ते हा आपला ग्रह अंतराळात अधांतरी फिरतो आणि ग्रहण हा सूर्य-पृथ्वी, चंद्र यांच्या आकार, अंतर आणि भ्रमण कक्षांवर अवलंबून असलेल्या गोष्टी असल्याचे म्हटले होते.

जगातल्या अनेक संस्पृतींमधले संशोधक वृत्तीचे लोक सभोवती घडणाऱया घटनांचा विचार करीत राहिले, त्यामागील सत्य शोधण्यासाठी अथक प्रयत्न करत राहिले, म्हणूनच आजच्या आधुनिकतेचे फायदे आपल्याला मिळत आहेत. एखाद्या छोटय़ा यंत्रनिर्मितीपासून ते विश्वाच्या उत्पत्तीपर्यंत आणि जीवसृष्टीचा मूलस्रोत शोधण्यापर्यंत प्रत्येक विषय विज्ञानाच्या संशोधनात येतो. विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान. आसपास घडणाऱया घटना सर्वांनाच जाणवत असतात. त्यातून विशिष्ट मनोधारणाही तयार होतात पिंवा केल्या जातात, परंतु त्यामागचे खरे कारण संशोधनांती समजते. साधा पाणी (किंवा पूर्वी रॉकेल) खेचण्याच्या धातूची झडप असलेला कंप ज्यांना आठवत असते त्यांना छोटय़ा छोटय़ा ‘शोधां’चे महत्त्व लक्षात यायला हरकत नाही. विज्ञानाचे सर्वसामान्य वापरकर्ते त्यांचे काैतुक जरूर करतात, पण हे यंत्र कसे बनले असेल याचा विचार करत नाहीत. ‘आपल्याला काय त्यातले कळते?’ अशी एक सहज भावना असतेच, परंतु त्यातले अगदी सूक्ष्म बारकावे समजले नाहीत तरी निदान त्याची किमान माहिती करून घेणे शक्य असते. त्यातूनच वैज्ञानिक दृष्टिकोन मनात रुजायला लागतो.

अशी जाणीव त्यातल्या नव्या पिढीत झाली आणि विज्ञानाचा वापर विनाशाऐवजी विधायकतेकडे करण्याची मानसिकता रुजली तरच उद्याचे जग सुखी होईल. विज्ञानाने दिलेले ‘सुख’ही संयमानेच वापरावे लागेल अन्यथा आज जो ‘ग्लोबल वॉर्मिंग’चा चटका बसतोय तो वाढत जाईल. केवळ आपणच नव्हे, तर 80 लाख इतर प्रजातींचा विचारही आपल्यालाच करायचा आहे. त्यासाठी मानसिक पर्यावरण स्वच्छ व्हायला हवे. ‘इस्रो’ने नुकत्याच सोडलेल्या 19 उपग्रहांपैकी ब्राझिलचा उपग्रह आहे ‘अॅमेझॉनिया’ नावाचा. त्याचा उद्देश अॅमेझोनमध्ये विराट अरण्याच्या होत असणाऱया विनाशाचा अभ्यास करण्याचा आहे. भयानक अग्निप्रलयात जगातली मोठमोठी जंगले भस्मसात होऊ लागली तर मंगळावर ‘पृथ्वी’ निर्माण करण्याचे स्वप्न पाहता पाहता आपला निळा ग्रह उजाड होईल. पुढच्या पिढय़ा विधायक विज्ञान विचार करत असतील तर ती स्वागतार्ह गोष्ट म्हणायला हवी.

आपली प्रतिक्रिया द्या