
>> शुभांगी बागडे
शिक्षणाचा कसलाही गंध नसलेल्या झिलिंगसेरेंग गावात मालती मुर्मू या महिलेने शाळेची उभारणी करीत केवळ बोलून चांगल्या गोष्टी घडत नाहीत, तर त्यासाठी आपण एक पाऊल पुढे टाकले पाहिजे याचे आदर्श उदाहरणच जगासमोर उभे केले आहे.
समाजासाठी काहीतरी करायचे हे मनात ठेवून अगदी साध्या गोष्टीतून झालेली सुरुवात आज एका पिढीला समृद्ध, सुजाण करीत आहे. हे घडले आहे पश्चिम बंगालच्या पुरुलियामधील झिलिंगसेरेंग या आदिवासी गावात. शिक्षणाचा कसलाही गंध नसलेल्या गावात मालती मुर्मू या महिलेने शाळेची उभारणी करीत केवळ बोलून चांगल्या गोष्टी घडत नाहीत, तर त्यासाठी आपण एक पाऊल पुढे टाकले पाहिजे याचे आदर्श उदाहरणच जगासमोर उभे केले आहे.
बहुतांश आदिवासी भाग आजही शिक्षणापासून वंचित आहे. कधी जागरूकता नसल्या कारणाने किंवा त्यांच्यापर्यंत शैक्षणिक सोयीसुविधा पोहोचत नसल्याच्या कारणाने शिक्षण त्यांच्यापासून काही अंतर दूरच आहे. या स्थितीबाबत काही राज्ये अपवाद असतीलही, परंतु पश्चिम बंगालमध्ये ही दरी जाणवते. मालती लग्नानंतर अशा गावात आल्यानंतर त्यांना या परिस्थितीचे वैषम्य वाटले. त्यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. इंग्रजीसोबत त्यांना इतर भाषाही अवगत आहेत. याचा फायदा आसपासच्या मुलांना शिक्षित करण्यासाठी झाला पाहिजे हा चंग त्यांनी बांधला आणि शाळेचे मॉडेल विकसित झाले.
खरे तर झिलिंगसेरेंगपासून जवळच असलेल्या गावात सरकारी शाळा आहे. मात्र आदिवासी समाजात शिक्षणाविषयी आपुलकी नसल्याचे, तसेच ही शाळा शैक्षणिक सुविधा देण्यात अपुरी पडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मुलांना आणि त्यांच्या पालकांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी मालती स्वतच शिक्षकाच्या भूमिकेत शिरल्या. तसं पाहिलं तर सध्याचा शैक्षणिक आलेख पाहता मालतीही जेमतेमच शिकलेल्या, परंतु त्यांना उपजतच शिक्षणाची गोडी होती, महत्त्व होते. त्यामुळे ही गोडी मुलांनाही लागावी यासाठी आपल्याला नेमके काय करायचे आहे हे त्यांच्या लक्षात आले.
आपल्या मातीच्या घरातूनच मालती यांनी शिकवणीचे वर्ग सुरू केले. सुरुवातीला केवळ सात-आठ अशी असणारी पटसंख्या पुढे वाढत गेली. आता तर मुलांचे आई-वडीलही शिक्षणात रस घेत वर्गाला उपस्थित आहेत. जुजबी का होईना, पण लिहिता-वाचता यावे यासाठी प्रयत्न करीत आहेत. मालती यांना संथाली भाषा अवगत होती. त्याच याच समुदायातील आहेत. त्यामुळे त्यांनी सुरुवात मातृभाषेतून शिकवत केली. पुढे बंगाली आणि इंग्रजी भाषाही त्या शिकवू लागल्या, परंतु हे सर्व इतकं सोपं नव्हतं. केवळ पाठय़पुस्तकी शिक्षणातून या मुलांना समजेल, ते प्रगती करतील अशी अपेक्षा करणं चूक आहे हे त्यांच्या लक्षात आले. मुलांना सहजसोप्या पद्धतीने निसर्ग, खेळ, त्यांचा दिनक्रम या माध्यमातून त्यांनी शिकवायला सुरुवात केली. त्यामुळे लवकरच ही मुलं गोष्ट, कविता, अंक लिहू व वाचू लागली. या शाळेची पटसंख्या वाढत जाऊन आता 40 पर्यंत पोहोचली आहे.
घरातून सुरू केलेल्या या शिकवणी वर्गांना सतत अडचणी भेडसावत होत्या. माती, तट्टय़ांच्या भिंती असलेली ही शाळा निसर्गापुढे हतबल ठरत होती. त्यामुळे नियमित वर्ग घेण्यात अडचणी येत होत्या. एव्हाना मुलांच्या पालकांनाही शाळेचे महत्त्व समजू लागले होते. म्हणूनच गावातील लोकांनी पुढाकार घेत बांबू, गवताच्या सहाय्याने भक्कम बांधकाम करीत शाळेसाठी खोल्या बांधून दिल्या. तिथे मुलांसाठी जुन्या चादरी, कपडे यांचा वापर करीत त्यांच्यासाठी आसन व्यवस्था करून दिली. मालती मुर्मू यांची शिकवण्यातील कळकळ समाजातील इतर स्तरांपर्यंत पोहोचली आणि आजूबाजूच्या मुख्य प्रवाहातील लोक ही शाळा बघण्यासाठी येऊ लागले. सोशल मीडियावर याबाबत माहिती पोहोचताच काही शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेत मालतीताईंच्या शाळेला शिकवण्यासाठी फळा, वह्या, पुस्तके, स्कूल बॅग, बसण्यासाठी बाके असे साहित्य पुरवले. आता मालती यांच्या शाळेला मदतीचा ओघ वाढला आहे. त्यामुळे भविष्यात इथल्या मुलांसाठी सर्व शैक्षणिक सुविधांनी युक्त अशी भक्कम संस्था उभारली गेल्यास नवल वाटणार नाही.
समाजाच्या आणि स्वतच्या विकासासाठी, आर्थिक प्रगतीसाठी शिक्षण हा मुख्य स्रोत आहे. मालती शिक्षित असल्याने त्यांनी याचे महत्त्व जाणले, पण ते केवळ स्वतपुरते मर्यादित ठेवले नाही. शिक्षणाचा गंध नसलेल्या झिलिंगसेरेंगसारख्या आदिवासी भागातील मुलांना शिक्षणाची गोडी लावत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे मालती मुर्मू यांचे हे कार्य अत्यंत मोलाचे आहे. आदिवासी मुलांसाठी शिक्षणाची अवघड वाट सुकर करण्याचे महत्त्वाचे काम त्या करीत आहेत. त्यांच्या या कामात त्यांच्या पतीची मोलाची साथ त्यांना लाभत आहे. त्यांनी रचलेला हा शिक्षणाचा पाया भविष्यात शिक्षित पिढीच्या गुणवत्तेच्या झळाळीने कायम चमकत राहील.