कथा एका चवीची- सोडावॉटर…

>> रश्मी वारंग

भर उन्हातल्या थकल्या भागल्या जीवाला ‘अकेला सोडा क्या कर सकता है?’ असं वाटण्याआधीच वेगवेगळ्या स्वादाचा आणि विशेषत लेमन सोडा उन्हाळय़ात गारव्याचा ढग डोक्यावर धरतो. अशा या सोडय़ाची ही कहाणी.

पदार्थांची आपली अशी एक जातकुळी असते. काही पदार्थ स्वतच्या चवीचे वेगळेपण जपणारे, तर काही स्वतला दुसऱयात मिसळून अन्य पदार्थाची चव द्विगुणित करणारे. असे दुसऱयांत मिसळण्यात धन्य मानणारे पेय म्हणजे सोडा! या सोडय़ाची ही कहाणी…

सोडा अर्थात कार्बोनेटेड वॉटरचा प्रवास 1767 मध्ये सुरू झाला. कार्बन डायऑक्साइडसोबत पाणी मिसळण्याची कला जोसेफ प्रिस्टले नामक युरोपियन व्यक्तीने शोधून काढली. कार्बोनेटेड वॉटरला ‘सोडा’ हे नाव का बरे मिळाले असावे? कधी विचार केला आहे का? तर या कार्बोनेटेड पाण्यामध्ये सोडियम क्लोराइड, सोडियम साइट्रेट आणि सोडियम बायकार्बोनेट असते. सोडियमशी असलेल्या या नात्यामुळे कार्बोनेटेड वॉटरला ‘सोडा’ असे म्हटले जाऊ लागले.

हे कार्बोनेटेड वॉटर पचनासाठी अतिशय उत्तम ठरल्याचे जेव्हा लोकांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी चक्क या सोडय़ाला औषधाचा दर्जा दिला. त्यामुळे सुरुवातीच्या काळात हा कार्बोनेटेड सोडा सर्वसामान्य दुकानात नाही तर औषधांच्या दुकानांमध्ये विकला जायचा. अनेक केमिस्ट मंडळी विशिष्ट औषध सोडय़ासोबत घ्या असे चक्क प्रिक्रिप्शनमधून लिहून द्यायची. हे सगळे 1876 पर्यंत सुरू होते. 1892 मध्ये
जॉर्जियातील आटलांटा येथील एका उद्योजकाने स्वतच्या कार्बोनेटेड पेयाच्या रेसिपीचे पेटंट घेतले. यात कोला नट्स आणि कोकेनचा एक चमचा वापर करून पेय बनवले होते. त्यामुळे ऊर्जा मिळते असा त्यांचा दावा होता. त्यांनी त्यांच्या पेयाला कोक असे संक्षिप्त नाव दिले. काही दशकांनंतर कोकेनची जागा कॅफिनने घेतली असली तरी, कोक हे नाव कायम राहिले. हा कोला स्वादाचा सोडा बाजारात आला आणि त्यानंतर औषध या संकल्पनेशी जुळलेले सोडय़ाचे नाते संपले.

आज आपण जी सोडय़ाची बाटली पाहतो त्यापेक्षा सुरुवातीच्या काळातल्या बाटल्या वेगळय़ा होत्या. त्या बाटलीतील कार्बन डाय-ऑक्साइड सहज उडून जायचा आणि त्यामुळे बाटली उघडताच सोडा पटकन पिऊन टाकणे गरजेचे होते. 1896 मध्ये बाल्टिमोर इथल्या विल्यम पेंटर नावाच्या दुकानदाराने घट्ट बुचाची सोडय़ाची बाटली बनवली. त्यामुळे सोडय़ातले बुडबुडे दीर्घकाळ टिकून राहू लागले. 1950 च्या दरम्यान सोडा कॅनच्या माध्यमातून विकला जाऊ लागला.

आज भारतामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी सोडा पब किंवा सोडा फाऊंटन या नावाची दुकाने दिसून येतात. त्यांचे मूळ आहे अमेरिकेतील सोडा फाऊंटन या संकल्पनेमध्ये. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेमध्ये अनेक ठिकाणी सोडा पार्लर, सोडा पब किंवा सोडा फाऊंटन उभारले जायचे. कॅफे हाऊसप्रमाणे लोकांनी एकत्र जमण्यासाठी ते अतिशय गजबजलेले ठिकाण असायचे. या सोडा फाऊंटन्सनी सोडय़ाचे वेगवेगळे स्वाद विकसित केले. फॉस्फेट, आईक्रीम सोडा, कालाखट्टा, ऑरेंज, लिंबू हे स्वाद याच काळात जन्माला आले.

भारतीयांसाठी सोडा खास ठरतो तो सोडा लेमन आणि गोटी सोडा या दोन गोष्टींमुळे. गावोगावी अन्य कोणतेही शीतपेय मिळो अथवा न मिळो, पण सोडा लेमन किंवा गोटी सोडय़ाची गाडी गल्लीबोळातून फिरताना दिसते. विशेष करून गोटी सोडा पीत असताना त्या गोटीचा येणारा ‘टॉक’ आवाज लहानपणी सोडा प्यायची इच्छा नसतानाही सोडा प्यायला लावायचा.

तगमगायला लावणाऱया उन्हामध्ये गारेगार गोटी सोडा किंवा सोडा लेमन म्हणजे वाळवंटातून जाणाऱया माणसाला दिसलेली हिरवळच. उन्हाच्या श्रमाने थकले भागले आहात, एखाद्या मस्त समारंभात जड जेवण झाले आहे, पाण्याने न भागणारी तहान लागली आहे किंवा यापैकी कोणतेही कारण नसले तरीही सोडा प्यायला आपल्याला आवडते. विशिष्ट स्वादाच्या सोडय़ाचे जसे चाहते असतात तसेच कोणताही स्वाद नसणारा प्लेन साधा सोडाही अनेकांना अमृतमय वाटतो.

भर उन्हाची पायपीट झाली असताना थकला भागला जीव आसरा शोधत असतो आणि लिंबाच्या हातात हात घालून एखादा लेमन सोडा समोर येतो. त्या बुडबुडय़ांची नाकाला जाणवणारी फसफस कशी आवरावी या तारांबळीत सोडय़ाचा आस्वाद घेतला जातो. घशापासून ते थेट उदरापर्यंत एक बुडबुडणारा गारवा पसरत जातो. अकेला सोडा क्या कर सकता है? असे वाटणाऱयांसाठी हा थोडा सोडा उन्हाळय़ात गारव्याचा ढग डोक्यावर धरतो.

 (लेखिका आरजे व स्तंभलेखिका आहेत.)