
गेल्या काही वर्षांची आकडेवारी बघितली तर वाघ संपण्याची भीती निर्माण झाली आहे. कारण वाघ संपला, नाहिसा झाला तर त्याची निर्मिती मानवाच्या हाती नाही. जागतिक व्याघ्रदिन साजरा करण्याचा उद्देश हाच की वाघांच्या नैसर्गिक अधिवासाचे संवर्धन करून जनजागृती करणे. हे करताना वाघांचे जंगलातले अस्तित्व टिकून रहावे, जंगलात वाघाची डरकाळी सतत ऐकू यावी ही अपेक्षा करूया! वाघ हा जंगलाचा राजा, जंगलाचा श्वास आहे. ज्याला बघण्यासाठी लाखो पर्यटक, आभयारण्याला भेटी देत असतात. कुठल्याही अभयारण्यात पर्यटक भेट देतात तेव्हा वाघाचे दर्शन व्हावे ही अपेक्षा ठेवून असतात.
हजारो पर्यटक अभयारण्यात भेटी देत असतात. निरनिराळे, प्राणी, पशू, पक्षी ते बघतात. पण त्यांचे खास आकर्षण असते ते व्याघ्रदर्शन. दरवर्षी 29 जुलै रोजी जागतिक ‘व्याघ्रदिन’ साजरा केला जातो. 29 जुलै 2010 रोजी रशियातील सेंटपिटर्सबर्गला भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिवस जागतिक व्याघ्रदिन म्हणून घोषित करण्यात आला.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जगभरात जवळजवळ एक लाख वाघ होते असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त केला जातो. तर काहींच्या मते ही संख्या चाळीस हजारांचे जवळपास सांगितली जाते. आता तर ही संख्या चार हजारांवर इतकी खाली आली आहे. वाघांची शिकार झाल्याने व नैसर्गिक मृत्यू आल्याने आता 4000च्या जवळजवळ वाघ शिल्लक आहेत. यापैकी 2200/2300 वाघ एकटय़ा हिंदुस्थानात आहेत. वाघाचे सरासरी आयुष्य साधारणपणे 14 ते 16-17 वर्षांचेच असते. काही वाघ 20/22व्या वर्षी मृत्यू झाल्याची नोंद आहे. हिंदुस्थानातल्या वाघांची लांबी साधारणपणे साडेआठ ते 11 फूट असल्याचे आणि वजन दीड ते पावणेदोन क्विंटल असल्याचे सांगितले जाते. वाघ ताशी 65 ते 70 कि.मि.वेगाने पळू शकतो. हत्ती सोडून इतर प्राण्यांची शिकार तो करतो. हिंदुस्थानात असलेला वाघ हा रॉयल बेंगाल टायगर म्हणून ओळखला जातो. आपला देश हा जगातील सर्वाधिक वाघ असलेला देश आहे. आणि म्हणूनच हिंदुस्थानसाठी या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. वाघांची संख्या जास्त असल्याने हिंदुस्थान ही शेवटची आशा आहे असे म्हणतात. हिंदुस्थानात वाघाला वाचवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. कोटय़वधी रुपये खर्च केले जात आहेत.
देशात 39 व्याघ्र प्रकल्प आहेत. महाराष्ट्रात नागपूर विभागातील व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या अधिक आहे, असा पाहणी निष्कर्ष असल्यामुळे, नागपूर ही जागतिक दृष्टीने वाघांची राजधानी संबोधण्यात येते.
चोरटय़ा शिकारी आणि नैसर्गिक अधिवास नष्ट होणे, याच कारणांमुळे वाघांची संख्या झपाटय़ाने कमी झाली आहे. त्यामुळेच ही वाघाची डरकाळी लुप्त होते की काय? अशी भीती निर्माण झाली आहे. वाघाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अन्नासाठी जवळच्या वस्त्यांवर वाघ हल्ले करू लागले. अशा परिस्थिती वाघ आणि माणसाचे संबंध बिघडल्याचे जाणवते. वाढते शहरीकरण आणि व्याघ्र क्षेत्राचा समतोल साधला जाण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना आणि आवासाची आखणी होणे आवश्यक आहे. नाही तर हा संघर्ष सुरूच रहाणार आहे. परिस्थिती चिघळण्याआधीच शासकीय स्तरावर नैसर्गिक आपत्ती म्हणून दखल घेणे आवश्यक वाटते. स्वयंसेवी संस्था, जनजागृतीसाठी कार्यक्रम करत असतातच.
वाघ हा हिंदुस्थानचा राष्ट्रीय प्राणी आहे. जंगलात वाघ असणे म्हणजे समृद्ध जंगलाचे प्रतीक आहे. महाराष्ट्रात ही संख्या 2019 अखेर 312 च्या जवळपास आहे.
व्याघ्रदिन साजरा करत असताना या वाघाचे अस्तित्व कायम राहावे, वाघाची डरकाळी जंगलात ऐकू यावी यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत.
केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रलयाच्या माहिती अनुसार 2012 ते 2017 याकाळात 45 टक्के वाघांचा मृत्यू अनैसर्गिकरीत्या झाला. यात शिकार केलेल्या वाघांची संख्या 22 टक्के होती.
2014 च्या गणनेनुसार देशात वाघांची संख्या 2226 होती. तर जगभरात 3890 वाघांची संख्या नोंद आहे. 2018 साली ती…..महाराष्ट्रात 303 च्या जवळपास असल्याचे आकडेवारीत दिसते.
महाराष्ट्रातील व्याघ्रप्रकल्प- मेळघाट अमरावती-42 ,ताडोबा-अंधारी चंद्रपूर व असंरक्षित क्षेत्र -108 , पेंच नागपूर -32 , सह्याद्री-3,नवेगाव-नागझिरा गोंदिया जिल्हा-7 , बोर-वर्धा जिल्हा 4, टिपेश्वर पांढरकवडा अभयारण्य -6 अशी वाघांची संख्या आहे. विदर्भातच ही संख्या जास्त आहे. महाराष्ट्रात 312 च्या जवळपास वाघांची नोंद वनविभागाकडे असल्याची माहिती वन मंत्र्यांनी विधान परिषदेत दिली होती. त्यातीत 212 वाघ असून, 100 बछडे असल्याची माहिती आहे. देशात चौथ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. वाघाची संख्या मागील तुलनेत वाढली आहे.
वाघाचे मृत्यूचे कारण बघितले तर शिकारी, विद्युत प्रवाहा धक्का, दोन वाघातला अधिवास संघर्ष यात वाघ मृत्यू पावले आहेत.
2016 सालात 100 वाघांचा मृत्यू झाला. 2017 सालात 98 वाघांचा मृत्यू झाला. तर 2018 सालात 100 वाघांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या सात/आठ वर्षांत मानव व वन्यप्राणी संघर्षात जवळपास पाचशेचे पेक्षा अधिक बळी गेले आहेत. विदर्भात याचा फटका जास्त बसला आहे. वाघाची संख्या वाढत असली तरी अशा कारणांमुळे वाघ आणि माणसातला संघर्ष वाढला आहे…तरीही वाघांशिवाय जंगल नाही.
वाघ हा जंगलाचा राजा, जंगलाचा श्वास आहे. ज्याला बघण्यासाठी लाखो पर्यटक, आभयारण्याला भेटी देत असतात. कुठल्याही अभयारण्यात पर्यटक भेट देतात तेव्हा वाघाचे दर्शन व्हावे ही अपेक्षा ठेवून असतात. अनेक जंगलीप्राणी दिसतात. पण वाघ दिसत नाही तोपर्यंत त्याची ट्रिप-पर्यटन पूर्ण होत नाही. त्याच कारणांमुळे पर्यटक आपला मुक्काम वाढवतात. गेल्या काही वर्षांची आकडेवारी बघितली तर वाघ संपण्याची भीती निर्माण झाली आहे. कारण वाघ संपला, नाहिसा झाला तर त्याची निर्मिती मानवाच्या हाती नाही. जागतिक व्याघ्रदिन साजरा करण्याचा उद्देश हाच की वाघांच्या नैसर्गिक अधिवासाचे संवर्धन करून जनजागृती करणे. हे करताना वाघांचे जंगलातले अस्तित्व टिकून रहावे, जंगलात वाघाची डरकाळी सतत ऐकू यावी ही अपेक्षा करूया!




























































