
<<द्वारकानाथ संझगिरी>>
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत झालेल्या पराभवाचा वचपा हिंदुस्थानने दुसऱया कसोटीत 317 धावांनी जिंकून काढला.पहिल्या कसोटीत इंग्लंडच्या उधळलेल्या बैलाची शिंग फार वर्मी लागली होती. बैलाला काबूत आणायला हिंदुस्थानी संघाने चाबकाऐवजी बंदूक वापरली. खेळपट्टी ही ती बंदूक होती.
या कसोटीची चर्चा खेळपट्टीशिवाय सुरूच होणार नाही. पहिल्या कसोटीची खेळपट्टी तयार करणाऱया क्युरेटरला नारळ दिला गेला. मग खेळपट्टी इतकी सुकी (dry) ठेवली गेली की गावाच्या रस्त्यावर गाडी गेली की धूळ उडते. तशी दुसऱया दिवसानंतर चेंडू विशिष्ट जागी पडला की माती उडायची आणि विशिष्ट जागा अनेक होत्या. चेंडू भ्रमिष्ट झाल्यासारखा वागायचा. कधी खाली राहायचा, कधी भसकन वळायचा, कधी उसळ्या मारायचा. ही कसोटीसाठी आदर्श खेळपट्टी नव्हती.
एवढं करायची गरज होती का?
पहिल्या कसोटीमध्ये जाणवलं होत की इंग्लंडच्या कसोटीत एकटा रूट वीरश्रीचा पोवाडा म्हणतो. इतर जी जी जी म्हणतात. फार तर अपवाद स्टोक्स असू शकेल. त्यांची फिरकी गोलंदाजी कचकडय़ाची आहे. नोबॉल टाकतात, फुलटॉस देतात. पहिली कसोटी आपण हरलो. कारण टॉस हरलो आणि रूटच्या द्विशतकावर स्वार होत त्यांनी 500 धावा केल्या. आपण टॉस जिंकलो असतो तर वेगळं घडू शकलं असतं. पण आता प्रश्न विचारला जाईल की खेळपट्टी इतकी खराब होती, तर रोहित, अजिंक्य, विराट, अश्विनने कशा धावा केल्या. प्रश्न बरोबर आहे, पण उत्तर देताना काही गोष्टींचा ऊहापोह करायला हवा.
आपलं नशीब की आपण टॉस जिंकला आणि रोहित शर्मा मॅच विनिंग खेळी करून गेला. विजयाबरोबर प्रेम, साखरपुडा त्याने करून दिला. लग्न अश्विनने लावलं. रहाणे, विराट, पंत, अक्षर पटेल वगैरेंनी मंगलाष्टकं म्हटली. रोहितचं प्रदीर्घ शतक पाहून ‘नयनरम्य’ शब्दाला ही त्या खेळीच वर्णन करायला कमतरता जाणवली असेल. तो काँक्रीटच्या खेळपट्टीवर खेळतोय असं वाटतं होत. खेळपट्टीचं भय त्याच्या बॅटला वाटलंच नाही. त्याची रहाणेबरोबरची भागीदारी सोनेरी ठरली. ना तो कोशात गेला ना त्याने फटाक्यांना रोखलं. त्या खेळपट्टीवरची 195 धावांची आघाडी हा ‘यशवंत व्हा’ हा आशीर्वाद होता.
इंग्लंडचे फलंदाज खेळपट्टी पाहून घाबरले होते. त्यात रूट स्विपवर बाद झाला. अश्विनला या खेळपट्टीवर बळी घेणं, फलंदाजाला जेरीस आणणं हे 27 चा पाढा पाठ म्हणण्यापेक्षा सोपं होतं. त्या खेळपट्टीचा दुधावर तो वाढलाय. त्याच्या, वेगाच्या, टप्प्याच्या आणि विविध चेंडूच्या विविधतेला इंग्लिश फलंदाजाकडे उत्तर नव्हतं.दुसऱया डावात हिंदुस्थानी फलंदाजीवर दबाव नव्हता. कारण खेळपट्टी अधिकाधिक भेसूर होत होती. विराटने फिरणाऱया खेळपट्टीवरच तंत्र किती चांगलं आहे हे दाखवलं. अश्विनने हल्ला चढवला.
रूटने मॅच सोडल्यासारखी वाटली. दोन सामान्य फिरकी गोलंदाज अश्विनच्या आक्रमणाखाली बावचळले. रूटने त्याच्या वेगवान गोलंदाजांचा रिव्हर्स स्विंग वापरला नाही. खेळपट्टी दाखवत असलेल्या औदर्यावर तो विकेटसाठी अवलंबून राहिला. दुसऱया डावात 85 पैकी 70 षटक फिरकी गोलंदाजांनी टाकली. मॉण्टी पानेसर किंवा स्वान इंग्लिश संघात असते तर अशी खेळपट्टी आपण बनवली नसती. अगदी अश्विन, अक्षरने आपल्या फलंदाजांना गोलंदाजी टाकली असती तर आपल्याला कठीण गेलं असतं अश्विन स्वतःची गोलंदाजी या खेळपट्टीवर त्याच्या दुसऱया डावात या दिमाखात खेळू शकला नसता.
इंग्लंडचा दुसरा डाव हा ‘क्रियाकर्माचा भाग होता’, ‘अक्षर – अश्विन या दोघांनी ते पूर्ण केले. अक्षर नशीबवान, पहिल्या कसोटीत अशी खेळपट्टी मिळाली. पाच बळी घेऊन गेला. विराटचा जीव भांडय़ात पडला असेल. अखेर जिंकला.
त्यासाठी केला होता अट्टहास.




























































