मुद्दा – प्रथम कारभार सुधारा, मग भाडेवाढ करा

2214

>> मधुकर कुबल

काँग्रेसने भ्रमनिरास केल्यानंतर ‘अच्छे दिना’चे स्वप्न दाखविणाऱ्या नरेंद्र मोदी यांना जनतेने सत्तेवर बसविण्याचे प्रमुख कारण म्हणजे प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होतील, दरवर्षी दोन कोटी तरुणांना नोकऱ्या देण्यात येतील, महागाई आटोक्यात आणण्यात येईल अशी आश्वासने तमाम जनतेला देण्यात आली होती, परंतु सध्या मोदी सरकारची दुसरी टर्म सुरू असूनदेखील त्यांची पूर्तता झालेली नाही. सरकारच्या सर्व घोषणा पोकळ व फसव्या ठरल्या आहेत. महागाई सतत वाढत आहे, बेरोजगारीमुळे तरुणांत नैराश्य पसरले आहे, विकासाचा दर कमी होत चालला आहे. सामान्य जनतेकडे दुर्लक्ष केले जात आहे. अशा परिस्थितीत आगामी अर्थसंकल्पात रेल्वे भाडेवाढ करण्याचा संकेत रेल्वे खात्याकडून देण्यात आला आहे आणि त्याचा बोजा देशातील रेल्वेने प्रवास करणाऱ्या सामान्य जनतेवर पडणार आहे. त्यातही मुंबई आणि उपनगरांतील प्रवाशांना त्याचा फटका अधिक प्रमाणात बसणार आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल हे मुंबईचे असून त्यांना प्रवाशांच्या समस्यांची चांगली जाणीव आहे. त्यात सुधारणा  करण्याची आवश्यकता असतांना तिकडे दुर्लक्ष केले जात आहे. पूर्वी रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर करण्यात येत असे. त्यावर संसदेच्या दोन्ही सभागृहांत साधक बाधक चर्चा होत असे, परंतु मोदी सरकारने त्यात बदल करून त्याचा समावेश मुख्य अर्थसंकल्पात केल्यामुळे त्यावर म्हणावी तशी चर्चा होत नाही. रेल्वे आर्थिक संकटात असली तरी भाडेवाढ करून समस्या सुटणारी नाही. रेल्वेच्या कारभारात प्रथम सुधारणा करण्याची आवश्यकता आहे अन्यथा सरकारला जनतेचा नाहक रोष ओढवून घ्यावा लागेल.

आपली प्रतिक्रिया द्या