
>> विजय पांढरीपांडे
एरवी सहकार्याने प्रगती करणारी मानव जात युद्ध, हिंसा, दहशतवाद यासाठी प्रवृत्त का होते? आपण युद्धाच्या अनिश्चिततेच्या सावटाखाली का असतो नेहमी? शासनातील सत्तांध आपणच निवडून दिलेली मंडळी आपल्याच विरोधात निर्णय का घेतात? आपणच निवडून दिलेल्या शासनकर्त्यांच्या विरोधात आपल्याला सहकार झुगारून मोर्चे का काढावे लागतात? शेजारी गुण्यागोविंदाने राहायचे सोडून क्षुल्लक जमिनीच्या तुकडय़ासाठी, भाषिक व धार्मिक वादासाठी दोन राष्ट्रे एकमेकांविरोधात शस्त्रे घेऊन का लढतात?
सध्या अवती-भवती जे काही चालले आहे ते भयंकर आहे. त्यातून अनेक न सुटणारे प्रश्न निर्माण होत आहेत. अमानुष हिंसाचार, युद्धे, धार्मिक तेढ, द्वेष, राजकारणातील गुंडगिरी, समाजातील भ्रष्टाचार, अत्याचार… हे सगळे बघितल्यावर मनात प्रश्न निर्माण होतात, अस्वस्थ करणारे प्रश्न. जी मानवजात समृद्धीसाठी, प्रगतीसाठी एकत्र आली, ज्या मानव समूहाने सहकारातून विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग निर्माण केले, तीच मानवजात आज एकमेकांचा जीव घ्यायला उतावीळ झाली आहे. एक जीवघेणी स्पर्धा, द्वेष, मत्सराचे, तिरस्काराचे राजकारण राष्ट्रीय नव्हे जागतिक पातळीवर चालले आहे. हा विरोधाभास पॅरॉडॉक्स पचनी पडायला खरेच कठीण आहे.
इतिहास, मानव वंशशास्त्र, बदलती संस्कृती याचा सखोल अभ्यास करणारे, ‘सेपीयन’ ते ‘नकसस’ अशा बेस्ट सेलर पुस्तकांचे लेखक प्रा. नोवाल हरारी यांनाही हाच प्रश्न पडला आहे. एक तत्त्वचिंतकाच्या भूमिकेतून आपल्या लेखनातून, मुलाखतीतून प्रा. हरारी या प्रश्नाचा, समस्येचा शोध घेण्याचा व उकल करण्याचा प्रयत्न करताहेत.
मुळात माणूस हा स्टोरी टेलिंगवर विश्वास ठेवणारा श्रद्धाळू प्राणी आहे. आपले सगळे व्यवहार, वागणे, बोलणे हे कुणीतरी सांगितलेल्या पिढय़ान्पिढय़ापासून विश्वास ठेवीत आलेल्या कथानकावर बेतलेले असते. या कथा काळानुसार बदलत जातात. मुद्दाम बदलल्या जातात. आपला आर्थिक व्यवहार, व्यापार, देवघेव हे सगळे कुणीतरी तयार केलेल्या अन् मग सर्वमान्य झालेल्या स्टोरीवर, कथानकावर अवलंबून असते. धर्म ही संकल्पना याच कथानकाचे सर्वव्यापी, अत्यंत प्रभावी उदाहरण. कुठलाही धर्म घ्या. त्यातले आचरणाचे, वागण्या व बोलण्याचे, संस्काराचे नीतिनियम हे वेगवेगळ्या प्राचीन ग्रंथ, पुराणांतून सांगितले गेलेत. त्यामध्ये काळानुसार कथा सांगणाऱ्या धर्मगुरूंनी सोयीनुसार बदल केले. इथे सत्य नेमके काय, रंजक कथानक काय यात फरक करणे दिवसेंदिवस कठीण होत गेले. टथ अन् फिक्शन यांची सरमिसळ झाली. त्यामुळे आपल्या श्रद्धादेखील बदलत गेल्या काळानुसारच नव्हे तर प्रांतानुसार, जाती वर्गानुसार. इथे विश्वासार्हता महत्त्वाची ठरते. किंबहुना एकमेकांवर कुठे न कुठे ठेवलेला विश्वास, एकमेकांवर असलेले जगण्यासाठीचे परावलंबित्व यामुळेच मानवजात हातात हात घालून पुढे चालत गेली.
याचे दुसरे उत्तम उदाहरण म्हणजे मनी, पैसा, अर्थकारण. व्यापार देवघेव सुरू झाली तेव्हा आधी बार्टर सिस्टिम होती, पण त्याला मर्यादा होत्या म्हणून पैसा ही संकल्पना आली. बँकिंग सिस्टिम आली. तसे पाहिले तर रुपये, डॉलर्स हे मुळात कागदाचे कपटे. त्याचे मूल्य आपण म्हणजे कुणीतरी ठरवले. त्यावर सगळे विश्वास ठेवत गेले. तुम्ही एखाद्या जंगलात असाल अन् तुमच्या जवळ लाखो व करोडो रुपये, डॉलर्सच्या नोटा असल्या तरी त्या कागदांचे मूल्य शून्यच. तुम्ही बाजारपेठेत गेलात, काही खरेदी केलीत तर त्याचा भाव, त्याला मूल्य. आजकाल तर आपण प्रत्यक्षात या नोटांची देवाणघेवाणदेखील करत नाही. केवळ संगणकात बेरजा, वजाबाक्या होतात. मनी ट्रान्सफर करताना आपण प्रत्यक्षात नोटा देत व घेत नाही. सगळे काही विश्वासावर जग चालते. कारची किंमत साठ लाख सांगितली जाते. घेणारा त्यावर विश्वास ठेवतो. एकूणच सगळा मानवजातीचा व्यवहार संगनमताने, सहकार्याने, विश्वासाच्या भरवशावर चाललेला आहे. प्राणी व पक्षी यांच्यात थोडेफार सहकार्य असते, पण मानवजाती इतके खचितच नाही. एखाद्या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी हजारो वैज्ञानिक एखाद्या संस्थेत काम करतात मिळून मिसळून. एखादा उद्योग हजारो कर्मचारी, अधिकारी एकत्र मिळून परस्पर सहकार्याने व सामंजस्याने उभारतात. वानर, वाघ, सिंह यांच्यात एवढी एकी दिसत नाही तरी ती निसर्गाच्या कुशीत राहणारी मंडळी गुण्यागोविंदाने नांदतात. एकमेकांचा द्वेष करीत नाहीत. बलात्कार व अत्याचार करीत नाहीत. जाती व धर्माचे गलिच्छ राजकारण करीत नाहीत हेही लक्षात घेतले पाहिजे.
पुन्हा आपण मूळ प्रश्नाकडे येऊ. एरवी सहकार्याने प्रगती करणारी मानव जात युद्ध, हिंसा, दहशतवाद यासाठी प्रवृत्त का होते? आपण युद्धाच्या अनिश्चिततेच्या सावटाखाली का असतो नेहमी? शासनातील सत्तांध आपणच निवडून दिलेली मंडळी आपल्याच विरोधात निर्णय का घेतात? आपणच निवडून दिलेल्या शासनकर्त्यांच्या विरोधात आपल्याला सहकार झुगारून मोर्चे का काढावे लागतात? शेजारी गुण्यागोविंदाने राहायचे सोडून क्षुल्लक जमिनीच्या तुकडय़ासाठी, भाषिक व धार्मिक वादासाठी दोन राष्ट्रे एकमेकांविरोधात शस्त्रे घेऊन का लढतात?
स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी व माझा धर्म, माझी विचारधारा, माझे तत्त्वज्ञान तुमच्यापेक्षा वरचढ हे दमदाटीने सांगण्यासाठी.थोडक्यात मुळात अस्तित्वात नसलेल्या, पण आपणच निर्माण केलेल्या स्पर्धेत स्वतःच्या वर्चस्वाचा डंका वाजवण्यासाठी. माणसाचा अहंकार त्याला स्वस्थ बसू देत नाही. मग ती कुटुंबातील नवरा-बायकोची, बाप-लेकाची, सासू-सुनेची घरगुती भांडणे असोत, समाजातील दोन वर्गांचा संघर्ष असो, की दोन राष्ट्रांतील धार्मिक तेढ असो. सगळीकडे एकच घोषणा, ‘मी, आम्ही मोठे. तू, तुम्ही तुच्छ.’ सगळा वणवा पेटतो तो या अहंकाराच्या आगीमुळेच.
इथे माघार कुणी घ्यायची, समजूत कुणी घालायची, समजून कुणी घ्यायचे आणि कितपत पुढे जायचे, किती माघार घ्यायची हे सारे तात्त्विक, व्यवहारिक, सामाजिक, राजकीय प्रश्न झालेत. त्यांची उत्तरेदेखील अर्थातच गुंतागुंतीची. प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतेच, किंबहुना एकापेक्षा अधिक उत्तरे असतात हे आमच्या इंजिनीअरिंगचे पुस्तकी नॉलेज झाले. प्रत्यक्षात वेगळी प्रमेये समीकरणे सोडवावी लागतात. कधी ती सुटतात, कधी ती सुटत नाहीत. श्रीकृष्ण, गौतम बुद्ध, गांधी, मंडेला, मदर तेरेसा अशी विविध काळातील थोर थोर मंडळी या तडजोडीच्या व्यवहारात थोडय़ाफार प्रमाणात यशस्वी होतात, पण तेवढय़ापुरतीच. कारण यापैकी कुणाच्याच प्रभावाने युद्ध टळले नाही, राजकारणी द्वेष कमी झाला नाही, हिंसाचार थांबला नाही. अहिंसा, सत्यमेव जयते, सर्वधर्मसमभाव वगैरे तत्त्वज्ञान पुस्तकातच राहिले, भिंतीवर खुंटीला टांगले गेले. आता तर या सगळ्यांना गिळून, पिळून, उगाळून टाकणारा महागुरू येतो आहे एआय नावाचा. आता धर्म, लोकशाही, सेवा, समाज, स्वातंत्र्य, कुटुंब सत्ता यासारख्या संकल्पनांच्या व्याख्या नव्याने लिहाव्या लागतील. नवी विटी, नवे राज्य येऊ घातले आहे एआय, एमएल (कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग) या स्वरूपात. त्यामुळे यापुढे खरेच काय होईल हे सांगणे अवघड आहे.