अनवट काही- बौद्धधर्माचा सर्वांगीण परिचय

>> अशोक बेंडखळे

बौद्ध धर्माचा जन्म भारतात झाला, मात्र या मानवतावादी धर्माचा प्रसार इतर देशांत अधिक झाला, एवढे आपल्याला माहीत असते. डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर तो आपल्याकडे चर्चेत आला. त्यादृष्टीने ‘बुद्ध धर्म आणि संघ’ (1910) हे विद्वान प्रा. धर्मानंद कोसंबी यांचे छोटेखानी पुस्तक संदर्भासहित चांगली माहिती देणारे आहे. कलाप्रेमी सयाजीराव गायकवाड यांनी आयोजित केलेल्या तीन व्याख्यानांचे संकलन म्हणजे हे पुस्तक असून ते मनोरंजक ग्रंथप्रसारक मंडळी गिरगाव मुंबई यांनी प्रकाशित केले आहे.

या पुस्तकाचे तीन भाग आहेत. बोधिसत्व म्हणजे बुद्ध, त्याचा बौद्ध धर्म आणि बुद्धाला मिळालेला अनुयायी शिष्यगण म्हणजे संघ होत. बोधिसत्वाचे थोडक्यात चरित्र असे – कपिलवस्तू शहरात इ.स. 600 वर्षांपूर्वी शाक्य राजाचे राज्य होते. शुद्धोधन नावाच्या राजाला दोन राण्या, मायादेवी व महाप्रजापती. मायादेवी माहेरी जात असता लुंबिनी नावाच्या वनात ती प्रसूत होऊन तिला मुलगा झाला तो म्हणजे बोधिसत्व, जो पुढे बुद्ध नावाने प्रसिद्धीस आला. त्याच्या जन्माच्या वेळी अद्भुत चमत्कार घडल्याला काही आधार नाही. बोधिसत्वाच्या विवाहाचा त्रिपिटक ग्रंथात उल्लेख नाही. तथापि 29 व्या वर्षी त्याने गृहत्याग करून अरण्यवास पत्करला.

बोधिसत्वाच्या गृहत्यागाविषयी त्रिपिटकात आधार सापडतो. बोधिसत्वाला राहण्यासाठी तीन प्रासाद होते तरी त्याला कोंडले नव्हते. सर्व प्रकारची साधन सुखे असूनही त्याचे समाधान झाले नाही. जराव्याधी मरणाच्या उग्र स्वरूपांची कल्पना त्याच्या मनात दृढ होत गेली आणि त्याचा तारुण्य, आरोग्य व जीवित यांचा मद नाहीसा झाला. बोधिसत्व गृहत्याग करून राजगृहनगरास आला. पुढे त्याचे माराशी भांडण होते व त्याचा पराभव करून धर्ममार्ग शोधून काढल्यावर बोधिसत्व बुद्ध झाला. सात दिवस आसनावर बसून त्याला धर्मज्ञान प्राप्त झाले. ब्रह्मदेवाने त्याला धर्मेपदेश करण्यास सांगितले. (ब्रह्मदेव म्हणजे मैत्री, करुणा अशा चार श्रेष्ठ मनोवृत्ती होत) बुद्धाला पहिला शिष्य मिळाला तो कौंडिल्य. पुढे त्याला आणखी चार भिक्षु शिष्य मिळाले. असे बुद्धाला अनेक शिष्य मिळाले आणि वयाच्या 80 व्या वर्षी कुसिनारा इथे त्याचे परिनिर्वाण झाले.

धर्म या दुसऱया भागात बौद्ध धर्म म्हणजे काय, त्याचे विवेचन आहे. बुद्धाने गृहस्थ व गृहिणी यांच्यासाठी करण्यास सांगितलेल्या गोष्टी विहितशीलमध्ये येतात तर निषिद्धशीलमध्ये वर्ज्य गोष्टी येतात, त्या अशा-ः माणसाला चांगल्या रीतीने वागवणे, गुरूजनांची सेवा करणे, प्राणी हिंसेविषयी संयम करणे व दानधर्म करणे. निषिद्धशील म्हणजे प्राणघात, चोरी न करणे, खोटे न बोलणे, दारू आदी मादक पदार्थांचे सेवन न करणे या गोष्टी बौद्ध म्हणवणाऱयाने वर्ज्य कराव्यात. तसेच कायावाचामने दहा पापांचा त्याग करणे ही मुख्य गोष्ट आहे, ती म्हणजे प्राणदान, अन्नदान व व्यभिचार (तीन कायिक पापे) असत्य भाषण, चहाडी, कठोर भाषण व व्यर्थ बडबड (चार वाचिक पापे) परद्रव्यासक्ती, क्रोध व नास्तिकता (तीन मानसिक पापे) ज्याला आपले शील पूर्णत्वाला न्यायचे असेल आणि त्याने या दहा पापांचा त्याग अवश्य केला पाहिजे असे बौद्ध धर्म म्हणतो.

संघ या तिसऱया भागात धर्मासाठी भ्रमण करणारे भिक्षुगण वा संन्यासी याविषयी विवेचन आहे. प्रारंभी बुद्धाला पाच भिक्षू मिळाले. बुद्ध भगवंताच्या उपदेशाने पुढे साठ भिक्षू आले आणि बुद्धाने त्यांना स्वत दीक्षा दिली. भिक्षू संघाचा बहुमान होऊ लागला. अनेकजण लाभासाठी सामील होऊ लागले म्हणून बुद्धाने नियम केले. त्यात भिक्षान्नावर अवलंबून राहणे, झाडाखाली राहणे. गोमूत्राच्या औषधावर निर्वाह करणे, मिथुन व्यवहार करू नये, चोरी करू नये. प्राणघात न करणे (त्यात किडा, मुंगीही येतात) अशा बाबी येतात.

बुद्ध धर्म वेगळा ठरतो तो पुढील काही बाबींसाठी. तिथे जातीभेद प्रारंभापासून नव्हता. कुणी जातीमुळे नाही तर कर्माने चांगला वा वाईट होतो हे तत्त्व बुद्धाने भिक्षुसंघास लागू केले होते. स्त्रियांसाठी भिक्षुणी संघ स्थापन करून त्यांना सर्व धर्मग्रंथ (त्रिपिटक इ.) वाचण्याची मोकळीक दिली.

बौद्ध धर्म बहुजन हिताय बहुजन सुखाय आहे आणि तो सर्वांनी स्वीकारायला हवा असे डॉ. आंबडेकर म्हणतात तेव्हा ते पटते. कारण हा वास्तववादी धर्म आहे. मानवाला अनुभवता येत नाही वा अस्तित्व सिद्ध करता येत नाही. अशा कोणत्याही गोष्टीवर बुद्ध भगवंताचा विश्वास नव्हता. ही जाणीव देण्यास हे छोटे, पण महत्त्वाचे पुस्तक नक्की यशस्वी ठरते.

[email protected]