
>> महेश शिपेकर
एकविसावे शतक हे तंत्रज्ञानाचे शतक आहे. अगदी 10-15 वर्षांपूर्वीपर्यंत अकल्पित, स्वप्नवत वाटणाऱ्या गोष्टी आज प्रत्यक्षात अवतरत आहेत. फ्लाइंग कार किंवा हवेत उडणाऱ्या चारचाकी हा आविष्कार यापैकीच एक. आजवर पॅराशूट, विमाने, हेलिकॉप्टर, ड्रोन हवेत उडताना पाहिले आहेत, पण 2026 पर्यंत जगभरातील अनेक कंपन्या इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेकऑफ अँड लॅण्डिंग (व्हीटीओएल) श्रेणीतील मोटार तयार करतील असा अंदाज आहे.
मानवाच्या कल्पनाशक्तीने विज्ञानाला नेहमीच दिशा दिली आहे. शतकानुशतकं माणूस जमिनीवरून आकाशाकडे पाहत राहिला आणि त्या आकाशात झेप घेण्याचं स्वप्न पाहत राहिला. हेच स्वप्न प्रथम विमानांच्या रूपाने साकारले आणि आता त्याच स्वप्नाचा पुढचा टप्पा म्हणजे ‘उडणारी कार’ किंवा ‘फ्लाइंग कार’. विज्ञान कथांमध्ये, चित्रपटांत आणि कल्पनारम्य कथांमध्ये आपण अशा कार पाहिल्या होत्या; पण आता त्या कल्पना प्रत्यक्ष वास्तवात उतरू लागल्या आहेत. आगामी काळात आपल्या शहरांवरून फ्लाइंग कार उडताना दिसल्यास आश्चर्य वाटू नये. अनेक परकीय कंपन्यांकडून फ्लाइंग मोटारीबाबत चाचपणी केली जात आहे. आपल्याकडेदेखील यासंदर्भात जोरात तयारी सुरू आहे. भविष्यात फ्लाइंग कारचा प्रयोग यशस्वी ठरला तर प्रवाशांचा नवा प्रवास अनोखा आणि वैशिष्टय़पूर्ण असणार आहे यात तिळमात्र शंका नाही.
उडणारी कार म्हणजे काय? हा प्रश्न सामान्यतः सर्वप्रथम मनात येतो. साध्या भाषेत सांगायचे झाले तर ही अशी कार आहे, जी जमिनीवर चालू शकते आणि आवश्यकतेनुसार आकाशात उड्डाण करू शकते. म्हणजे ती एकाच वेळी विमान आणि कार या दोन्हीचे गुणधर्म बाळगणारी यंत्रणा आहे. तिला ‘व्हर्टिकल टेकऑफ अँड लॅण्डिंग’ (व्हीटीओएल) क्षमता असते. म्हणजे ती धावपट्टीशिवाय थेट वर उड्डाण करू शकते आणि थेट जमिनीवर उतरू शकते. अर्थात त्याचा वापर अजून सुरू झालेला नाही. या मोटारी सध्या प्रायोगिक तत्त्वावर, चाचणीच्या पातळीवर आणि नियामक संस्थेची मंजुरी, टेस्ट फ्लाईटच्या टप्प्यातून जात आहेत. मात्र आगामी काळात चीन, जपान, अमेरिका आणि युरोपातील देशांच्या आकाशात या मोटारींची भाऊगर्दी झालेली दिसेल.
अनेक पातळीवर तयारी
2026 पर्यंत जगभरातील अनेक कंपन्या इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेकऑफ अँड लॅडिंग (व्हीटीओएल) श्रेणीतील मोटार तयार करतील असा अंदाज आहे. कारण या कंपन्यांच्या फ्लाइंग मोटारींची प्रगती महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. काही देश आणि कंपन्यांनी नव्या श्रेणीतील मोटारींची यादी सोशल मीडियावर जारी केली आहे. सध्या जगभरातील वेगवेगळ्या देशांतील सुमारे अडीचशे कंपन्या फ्लाइंग टॅक्सी किंवा व्हीटीओएल प्रकल्पावर काम करत आहेत. काही प्रायोगिक तत्त्वावरच्या मोटारी हवेत उड्डाण करत आहेत, तर काही मानवी पायलटसह किंवा काही ठिकाणी अनमॅन्ड तंत्रावर उड्डाणे करत आहेत. उदा. तुर्कियेत सिजेरी याची प्रायोगिक मोटार आणि जपानमध्ये स्काय डाव्हइच्या प्रायोगिक मोटारीने हवेत उड्डाण केल्याची नोंद झाली आहे. अनेक कंपन्यांनी एअर टॅक्सी सुरू करण्याची व्यावहारिक योजना आखली आहे, तर काही देशांनी सर्टिफिकेशनची प्रक्रियादेखील सुरू केली आहे. सांगण्याचा अर्थ जमीन, हवा या दोन्ही ठिकाणी दिसणाऱ्या मोटारी सध्या सर्वसामान्यांच्या गॅरेजमध्ये नसल्या तरी संपूर्ण जगभरात त्यावर प्रचंड काम केले जात असून त्याचीच चर्चा सुरू आहे. या श्रेणीतील मोटारींचे उज्ज्वल भवितव्य पाहता जगभरातील मोठे उद्योगपती या श्रेणीतील वाहनांत गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत.
फ्लाइंग मोटार चर्चेत
काही दिवसांपूर्वी हवेत उडणाऱ्या दोन मोटारींची धडक झाली आणि त्यात मोठी दुर्घटना झाली. सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेने फ्लाइंग मोटारीची चर्चा सुरू झाली. तसेच चीनच्या जिलीन येथे 16 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी चांगचुन एअर शोदरम्यान एसपेन एरोहॉटच्या दोन ‘व्हीटीओएल’ एकमेकांना धडकल्या. या धडकेत एक प्रवासी जखमी झाला. मात्र या अपघातामुळे व्हीटीओएल मोटारींच्या होणाऱ्या घटनांची चर्चा सुरू झाली, पण प्रारंभिक टप्पा असल्याने अशा प्रकारच्या घटना होण्याची शक्यता अधिक असते. कालांतराने त्या अधिक सुरक्षित होतीलच. त्यामुळे हवेत उडणाऱ्या मोटारी आता कॉमिक बुक किंवा हॉलीवूडपटापुरत्याच मर्यादित राहिलेल्या नसून आगामी काळात मानवी जीवनाचा भाग बनणार आहेत. या अनुषंगाने आपत्कालीन सेवा, पर्यटनासारख्या क्षेत्रात या वाहनांचे प्रस्थ वाढू शकते.
सुरक्षेचा प्रश्न
हवेत उडणाऱ्या मोटारींचे दोन अपघात पाहिले तर त्यांच्या सुरक्षाविषयक बाबींवर गांभीर्याने प्रश्न उपस्थित राहत आहेत. अर्थात अपघाताच्या घटनेमुळेच या मोटारीची चर्चा होत आहे असे नाही, तर आणखी काही घटकांमुळे चर्चेला हवा मिळत आहे. म्हणजे आता नवीन मॉडेल नवीन जीवनशैलीला पूरक ठरवताना नव्या शहरांची गरज म्हणूनही पाहिले जात आहे. कारण भविष्यात वाहतूक कोंडीत अडकून पडायला लोकांकडे वेळ नसेल. त्यामुळे फ्लाइंग मोटार काही मिनिटांतच इच्छित स्थळी नेण्याचे काम करणार आहे आणि त्यामुळे वेळ आणि पैसा वाचेल, पण या मोटारीबाबत केवळ सुरक्षाच नाही, तर उड्डाण आणि लॅण्डिंगची परवानगी हादेखील कळीचा मुद्दा राहणार आहे. यावर सध्या नियोजनबद्धरीत्या योजना आखली जात आहे. वाहतूक नियम, वैमानिकाला प्रशिक्षण, बॅटरी रिलायबिलिटी यांसारख्या समस्या वेळीच मार्गी काढल्या तरच उड्डाण घेणाऱ्या मोटारींत अडथळे येणार नाहीत, अन्यथा त्या पुस्तकातच राहतील. तूर्त 2030 पर्यंत जगभरातील मोठय़ा शहरांतील आकाश हे मोटारींनी व्यापलेले असेल हे निश्चित.
भारतातदेखील एअर टॅक्सी
केवळ परदेशातच नाही, तर भारतातदेखील ईव्हीटॉल विकसित करण्यासाठी काही कंपन्या सक्रिय आहेत. ‘डीजीसीए’ने पंजाबच्या एका कंपनीला एअर टॅक्सी मॉडेलच्या रचनेला परवानगीदेखील दिली. टेकऑफ आणि लॅण्डिंगसाठी व्हर्टिपोर्ट तयार करण्याच्या योजनेवरदेखील काम केले जात आहे. बंगळुरूच्या एका कंपनीमध्ये यादृष्टीने काम केले जात आहे. सर्व काही ठरल्याप्रमाणे झाले तर 2028 पर्यंत दिल्ल्ली एनसीआरमध्ये एअर टॅक्सीची सेवा सुरू होऊ शकते. त्यानंतर कोलकाता, मुंबईसारख्या मेट्रो शहरात एअर टॅक्सी सुरू होण्याची शक्यता आहे.
(लेखक वाहन उद्योगाचे अभ्यासक आहेत.)































































