लेख – संत नामदेवांची श्रीकृष्णभक्ती

469

>> नामदेव सदावर्ते

महाराष्ट्रातील संतांनी भगवान श्रीकृष्णाच्या जन्मप्रसंगाचे, बाळक्रीडेचे व बाळलिलांचे सुरस वर्णन केलेले आहे. भगवंतांच्या बाळपणातील सर्व घटना, प्रसंगांचे चित्रण करण्यात संतांना अखंड ब्रह्मानंद प्राप्त होतो. संत नामदेव यांनी मथुरेच्या कारागृहातून गोकुळच्या नंदगृही आलेल्या बाळकृष्णाच्या खोडय़ा, गवळणींचे गाऱहाणे, कंसाने पाठविलेल्या महापराक्रमी राक्षसांचे भगवंतांनी केलेले निर्दालन या सर्व कथा आणि श्रीकृष्णभक्ती तन्मयतेने आपल्या अभंगांमधून प्रकट केली आहे. 

भगवान श्रीकृष्णाच्या सर्व लीलांचे आणि त्यांनी केलेल्या विविध पराक्रमांचे वर्णन अनेक संतांनी केले आहे. त्यात महाराष्ट्रातीलही संत आहेत. संत नामदेव यांनी त्यांच्या अभंगांमधून आपली श्रीकृष्णभक्ती व्यक्त केली आहे. त्यात श्रीकृष्णाच्या जन्मकाळापासून आयुष्यातील वेगवेगळय़ा घटनांचा समावेश आहे. श्रीकृष्णाच्या अवताराविषयी संत नामदेव यांनी वर्णन केले आहे. पृथ्वीवर दैत्यांच्या अन्याय अत्याचाराने निरपराध जनता त्रस्त झाली. हे दुःख पृथ्वीमातेने ब्रह्मदेवांना सांगितले. त्यानंतर ब्रह्मदेवांसह इंद्र व भगवान शिवशंकर यांना बरोबर घेऊन पृथ्वीमाता भगवान विष्णूंकडे गेली. भगवंतांनी त्या सर्वांचे ऐकले. अवतार घेऊन दैत्यांना नष्ट करून सर्वांचे रक्षण करीन असे वरदान दिले. त्यानंतर ते धरणीधरा शेषाला म्हणाले,

शेषाप्रति बोले लक्ष्मीचा तो वर ।
चला अवतार घेऊ आता ।।
पृथ्वीवरी दैत्य ते मातले फार ।
गाऱहाणे सुरवर सांगू आले ।।

हे धरणीधरा शेषा, या अवतारी तू देवकीच्या उदरात जाऊन राहा. मी मायेला नंतर पाठविन. ती योगमाया तुला उदरातून काढील व गोकुळी रोहिणीच्या उदरी नेईन.

लक्ष्मीशी सांगे तेव्हा ऋषीकेशी ।
कौंडण्यपुराशी जावे तुम्ही ।।
नामा म्हणे ऐसा करूनी विचार ।
घ्यावया अवतार सिद्ध असे ।।

मथुरेत देवकी-वसुदेव विवाहाप्रसंगी आकाशवाणी झाली. हे कंसा, या देवकीचा आठवा पुत्र तुला ठार मारील. हे ऐकताच कंस खड्ग उपसून देवकीस मारायला धावला. तोच वसुदेवाने त्याचा हात धरला. तो कंसाला म्हणाला, मी माझे सारे पुत्र होताच तुझ्याजवळ देईन. नंतर कंसाने वसुदेव-देवकीस बंदिखान्यात टाकले. कारागृहात देवकी प्रसूत होताच वसुदेवाची सहाही मुले क्रमाक्रमाने कंसाने मारून टाकली.

देवकीचा सातवा गर्भ योगमायेने गोकुळातील रोहिणीचे उदरी स्थापित केला. हे देवाशिवाय कुणालाही कळले नाही. आठव्या गर्भाचे वेळी भगवंत पोटी येणार म्हणून देवकी तेजस्वी दिसू लागली.

देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य । कंसाचे हृदय जळतसे ।।

वाघाला पाहून हरणे जसे थरथर कापतात. तसे कंसाचे शरीर थरथर कापू लागले. कंसाला सर्वत्र देवकीचा आठवा गर्भ कृष्ण दिसू लागला.

नामा म्हणे भये लागलेसें ध्यान । चराचरी कृष्ण दिसतसें ।।

भगवान श्रीकृष्ण आता पृथ्वीवर जन्म घेत आहेत म्हणून समस्त देवदेवता अंतरिक्षातून देवकीगर्भ नारायणाची स्तुती करीत पुष्पवृष्टी करीत होते.

पृथ्वीवरही मयुरादि पक्षी नृत्य करताती ।
नद्या वाहताती दोन्ही थडय़ा ।।

आकाशात सुरवरांची गंधर्वांची सप्तसूरांनी देवाची स्तुती सुरू असताना जमिनीवर केशरकस्तुरीचा सडा घालून लोक आनंद व्यक्त करीत होते.

नामा म्हणे स्वर्गी नगारे वाजती ।
अप्सरा नाचती आनंदाने ।।

कंसाच्या कारागृहात भगवंत प्रकट झाल्यावर दाही दिशांना कोटी सूर्याचा प्रकाश पसरला. वसुदेव-देवकी मनात आश्चर्य करू लागले. भगवंताच्या दर्शनाने त्यांचे डोळे दिपले. संत नामदेव म्हणतात,

दशरथे मारिला तोचि होता मास ।
वर्षाऋतु असे कृष्णपक्ष ।।
वसूनाम तिथी बुधवार असे ।
शुक सांगतसे परिक्षीती ।।
रोहिणी नक्षत्र दोन प्रहर रात्र ।
माया घाली अस्त्र्ा रक्षपाळा ।।
नवग्रह अनुकूल सर्वांचे जे मूळ ।
वसुदेव कपाळ धन्य धन्य ।।
जयाचा हा वंश तयासी आनंद ।
माझ्या कुळी गोविंद अवतरला ।।
अयोनि संभव नोहे काही श्रमी ।
नामयाचा स्वामी प्रगटला ।।

धर्मसंस्थापनेसाठी आलेल्या भगवंताला कंसाच्या दुष्ट नजरेपासून कसे लपवावे याची वसुदेव चिंता करू लागताच देवानी सांगितले. गोकुळी नंदाच्या घरी मला नेऊन ठेवा तेथे माया उपजली आहे. मला तेथे ठेवा व मायेला येथे आणा. तुरूंगाचे रक्षक माझ्या मायेने मी मोहून टाकले आहेत. भगवंताच्या सांगण्यावरून वसुदेवाने भगवंतास उचलताच त्याच्या पायातील बंधने गळून पडली. तुरूंगाचे दरवाजे आपोआप उघडले. बाहेर मंदमंद पाऊस पडत असल्याने शेषाने देवावर छाया धरली. नदीला पूर आला पण भगवंताचा अंगुष्ठस्पर्श होताच पूर ओसरला. गोकुळातही सर्व निद्रिस्त होते. वसुदेवाने देवाला यशोदेच्या शेजारी ठेवले व मायारूप कन्या घेऊन पुन्हा कारागृहात येताच दरवाजे बंद झाले. वसुदेव बंधनात अडकला. माया रडू लागली आणि कंसाचे दूत झोपेतून उठले.

कंसाचे सेवक तातडीने जाऊन कंसाला सांगतात. राजा, वैरी जन्माला आला. त्वरित कारागृहात येऊन त्याला ठार मारा. मायारूप कन्या कंसाच्या हातून निसटली व आकाशात जाऊन म्हणाली –

तुजलागी जो का वधी । उपजला मज आधी ।।

भगवान कृष्णाच्या जन्मामुळे नंदनगरी गोकुळ आनंदात न्हाऊन निघाले. नंदाने पुत्रजन्मानिमित्त दानधर्म केला. अगणित द्रव्य, तीळ-तांदुळाचे पर्वत, वस्त्र्ाs प्रजाजनांना दानधर्म केली. तसेच दोन लाख गायी दान केल्या. सर्वत्र तुतारी वाद्ये वाजू लागली. अप्सरांचे नृत्यगान सुरू झाले.

घरोघरी नंद धाडी शर्करेसी । वस्त्र्ाs सहृदांसी नामा म्हणे ।।
नंदराजाला पुत्र झाला म्हणून गोकुळात आनंदी आनंद झाला. गोकुळवासी स्त्र्ाया बाळलेणे घेऊन नंदगृही येऊन बाळकृष्णाचे सुंदर रूप पाहून आनंदी होत होत्या.

संत नामदेवांसह सर्व संतांचे श्रीकृष्णजन्म आणि भक्तीचे अभंग ऐकताना आपल्याला अपूर्व आनंद अनुभवण्यास मिळतो.

आपली प्रतिक्रिया द्या