
>> अस्मिता प्रदीप येंडे
डॉ. संजय गायकवाड लिखित ‘राजमाता जिजाऊ’ हे पुस्तक मराठी वाचकांसाठी केवळ एक चरित्र ग्रंथ नाही, तर स्त्राrशक्तीच्या अद्वितीय सामर्थ्याचे आणि राष्ट्रनिर्मितीतील मातृत्वाच्या भूमिकेचे सजीव चित्रण आहे. इतिहासाच्या प्रवाहात अनेक महान पुरुषांचे कार्य उजळून निघते; परंतु त्या कार्यामागे उभ्या असलेल्या मातृशक्तीचा शोध घेणारे लेखन क्वचितच दिसते. या पार्श्वभूमीवर जिजाऊंच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्याचा अभ्यास करणारा हा ग्रंथ अत्यंत मौलिक आणि प्रेरणादायी ठरतो.
मध्ययुगीन भारत हा अराजकता, परकीय आाढमणे, सामाजिक विसंगती आणि स्त्रियांवरील होणाऱया भयंकर अन्यायाने ग्रासलेला होता. अशा अस्थिर आणि संघर्षमय परिस्थितीत जिजाऊंचा जन्म झाला. पुस्तकात लेखकाने त्या काळाचे सामाजिक आणि राजकीय चित्रण अत्यंत प्रभावीपणे केले आहे. त्यामुळे वाचकाला जिजाऊंच्या संघर्षाची पार्श्वभूमी समजते. पुस्तकातील सर्वात प्रभावी भाग म्हणजे जिजाऊंचा आई ते राजमाता हा प्रवास! आई म्हणून त्यांनी शिवबांच्या बालमनात स्वराज्याची बीजे रोवली. रामायण, महाभारत आणि बळीराजाच्या कथा सांगून त्यांना धर्म व कर्मनिष्ठा शिकवली. शौर्यकथा सांगून परामाची प्रेरणा दिली आणि प्रशासनाची दिशा दाखवून एक सक्षम नेतृत्व घडवले. राजमाता म्हणून त्यांनी आपले कर्तव्य अधिक व्यापक केले. लोकमता म्हणून त्यांनी केलेले लोकोत्तर लोककार्य लेखकाने या ग्रंथात ठळकपणे मांडले आहे. साधी, सरळ, सुटसुटीत आणि मन खिळवून ठेवणारी लेखन शैली हे पुस्तकाचे महत्त्वपूर्ण वैशिष्टय़ आहे. ऐतिहासिक संदर्भ, भावनिक आविष्कार आणि साहित्यिक शैली यांचा सुंदर, सुरेख आणि सुरेल मेळ साधला आहे. या पुस्तकात वाचकाला वास्तविक इतिहासाची माहिती दिली जातेच, पण त्यासोबतच प्रेरणेचे स्फुल्लिंगही चेतविले जाते हे विशेष! घटनांचे नाटय़मय वर्णन, भाषेतील ओघवती लय आणि चित्रांचा प्रभावी वापर यामुळे हे पुस्तक अधिक वाचनीय झाले आहे.
हे पुस्तक केवळ इतिहास सांगत नाही, तर समाजाला दिशा देणारा संदेशही देते. स्त्राrशक्तीचे सामर्थ्य, संस्कारांचे महत्त्व, राष्ट्रप्रेम आणि लोकहिताची जाणीव या सर्व मूल्यांचा संगम या ग्रंथातून प्रकट होतो. जिजाऊंचे जीवन हे मराठी मातृशक्तीचे तेजस्वी रूप असून त्यांचा आदर्श प्रत्येक पिढीला मार्गदर्शक आहे.
राजमाता जिजाऊ
लेखक : डॉ. संजय गायकवाड
प्रकाशन : साकेत प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर
पृष्ठे : 144 मूल्य : 200 रु.