
>> सरिता भावे
भागवत पुराणात श्रीकृष्ण आणि कदंब यांचे अद्वैत ठायी ठायी निदर्शनास येते. ‘बाळकृष्णा’च्या गोकुळातील सर्व लीलांचा कदंब साक्षीदार आहे. कालियामर्दनाच्या वेळी याच झाडावरून ‘देवकीनंदना’ने डोहात उडी घेतली, याच्याच फांद्यांमध्ये दडून गोपिकांची वस्त्रे पळवली आणि याच झाडावर लपवून ठेवली.
पावसाळ्यात नारिंगी रंगाचे बुंदीचे लाडू (चेंडू म्हणा हवं तर!) लटकलेले आहेत असे वाटावे असा फुलोरा असणारे झाड तुम्ही पाहिले आहे का हो? काय म्हणालात? पाहिले आहे, पण नाव नाही माहीत?! हात्तीच्या…..अहो, हेच ते कदंबाचे झाड…..
कदंब सदाहरित, मध्यम उंचीचा, समद्विभूज त्रिकोणासारखा सुबक वृक्ष आहे. फांद्यांच्या समांतर, रेखीव मांडणीमुळे छत्रीसारखा वाटतो. पाने सुरेख, मस्त पोपटी रंगाची, लांबसर, विस्तीर्ण, वरून चकचकीत आणि खालून लवदार असतात. पर्णशिरा तर एखाद्या चित्रकाराने टोकदार ब्रशने पेंट केल्यासारख्या कोरीव असतात. आकर्षक, गर्द, गेंदेदार, सुगंधी फुलोरा लोकरीच्या अनेक नाजूक धाग्यांसारख्या फुलांनी बनलेला ‘पुष्पसमुदाय’च असतो. फुलांपासून पिवळा रंग आणि अत्तर तयार केले जाते. डोळे, दात, पोट, मूत्रसंबंधित विकारांवरील उपचारांसाठी हे झाड उपयुक्त आहे. याची प्रियक, नीप (संस्कृत), कळंब (मराठी), कदम (हिंदी), कदावली, कडुवे (कानडी), कदंबमू (तेलुगू), वेल्लाकदंब (तामीळ), कटंपू (मल्याळम), कदंबा (गुजराती), कलंब (बंगाली), कॉमन बर-फ्लॉवर ट्री (इंग्रजी) अशी नावे असून वनस्पती शास्त्रात Neolamarckia cadamba या भारदस्त नावाने त्याला संबोधतात. कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड जिह्यातील ‘बनवासी’ येथील ‘कदंब’ या पुरातन राजघराण्याचे ‘कदंब वृक्ष’ राजचिन्ह होते.
भागवत पुराणात श्रीकृष्ण आणि कदंब यांचे अद्वैत ठायी ठायी निदर्शनास येते. ‘बाळकृष्णा’च्या गोकुळातील सर्व लीलांचा कदंब साक्षीदार आहे. कालियामर्दनाच्या वेळी याच झाडावरून ‘देवकीनंदना’ने डोहात उडी घेतली, याच्याच फांद्यांमध्ये दडून गोपिकांची वस्त्र्ाs पळवली आणि याच झाडावर लपवून ठेवली. कर्णफुले म्हणून उपयोग करतानाच याची चेंडूसारखी कठीण फुले गोपाळांबरोबर खेळण्यासाठीही वापरली. कधी कधी वाटते, नदीकाठी, कुरणात, गाईगुरे-पक्षी-डोंगर-झाडांमध्ये रममाण होऊन बासरीसारखे लाकडापासून तयार केलेले साधेच (जैव विघटनासाठी सोपे?) वाद्य उपयोगात आणून ‘वनमाळी’ला आपल्याला ‘निसर्गाकडे वळा, त्याचे संवर्धन करा’ हा संदेश तर द्यायचा नसेल ना?
या कृष्णप्रिय वृक्षाने मथुरा-वृंदावन प्रांतातील संत, कवी, लेखकांना पूर्वीपासूनच अतिशय मोहित केले आहे. कृष्णभक्तीत रममाण झालेले रसखान (16-17 वे शतक; मूळ नाव सय्यद इब्राहीम खान) आपल्या आराध्य दैवताला ‘‘वृंदावनातच मला निरंतर जन्म मिळत राहो’’ अशी विनंती करताना ‘‘खास निवास मिले जु पै तो वही कालिन्दी कूल कदम्ब की डारन’’ (निवासासाठी विशेष स्थान द्यायचे झाले तर हे प्रभू, यमुनातीरी कदंबाच्या डहाळीव्यतिरिक्त अजून चांगली जागा असूच शकत नाही) असे साकडे घालतात. सुभद्रा कुमारी चौहान या कवयित्रीने ‘यह कदंब का पेड अगर माँ होता यमुना तीरे, मैं भी उस पर बैठ कन्हैया बनता धीरे धीरे’ ही कविता लिहून यमुना, कदंब आणि कान्हा-यशोदेच्या लडिवाळ संबंधांनाच नव्हे, तर समस्त विश्वातील मायलेकराच्या वेल्हाळ नात्यालाच मानवंदना दिली आहे. ‘मुरलीधरा’चा उल्लेख, तर मग गवळणी तरी कशा मागे राहतील! एका गीतात मीलनोत्सुक राधिका तिच्या सयांना ‘सखी चलो री कदंब तरे छोडी काम-धाम…….’ अशी आतुर घाई करताना दिसते! रासलीलेतील ‘राधा-माधवा’चे कदंबाच्या हिंदोळ्यावर एकमेकांबरोबर झोके खेळण्याशी असलेले साधर्म्य भवानी शंकर पंडित यांनी ‘कदंब-तरूला बांधुनी दोला, उंच-खालती झोले, परस्परांनी दिले-घेतले, गेले! ते दिन गेले’ या गाण्यांतून दर्शविले आहे.
‘गोविंदा’चा परिसस्पर्श झालेल्या या कदंबाच्या मनोहारी रूपाचा तुम्हासही दृष्टिलाभ होवो हीच या जन्माष्टमीची सर्वांना शुभेच्छा!


























































