
>> रामदास कामत
कारगील युद्धादरम्यान ‘टायगर हिल’च्या महत्त्वाच्या ‘घातक’ कमांडो प्लाटूनचा एक भाग असणारे सुभेदार योगेंद्रसिंह यादव. ज्यांनी एकाकी लढत शत्रू सैन्याला माघारी परतवले आणि टायगर हिल ताब्यात घेतली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सर्वात उल्लेखनीय धैर्य, अदम्य शौर्य दाखवल्याबद्दल त्यांना सर्वोच्च लष्करी पुरस्कार परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले.
क्रिकेटमध्ये फलंदाजाला जीवदान मिळाल्यावर त्याने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजीच्या ठिकऱया उडवत दणदणीत द्विशतक ठोकावे आणि ‘मॅन ऑफ द मॅच’ किताब मिळवावा तशीच कहाणी आहे. या योद्धय़ाची. पाच रुपयांच्या काही नाण्यांनी या वीराचे कारगील युद्धात प्राण वाचवले. हाच ईश्वरी संकेत मानून त्याचे सार्थक करत त्याने एकाकी झुंज देत शत्रूला धूळ चारली आणि वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी ते परमवीर चक्र या सर्वोच्च सन्मानाचे मानकरी ठरले. ही कहाणी आहे भारतीय सैन्यातील सुभेदार योगेंद्रसिंह यादव यांची.
सुभेदार योगेंद्रसिंह यादव यांचा जन्म 10 मे 1980 रोजी उत्तर प्रदेशातील बुलंद शहर जिह्यातील औरंगाबाद अहीर गावात झाला. त्यांचे वडील करणसिंह यादव यांनी 1965 आणि 1971 च्या भारत-पाक युद्धात भाग घेतला होता. त्यांचे मोठे भाऊ जितेंद्र सिंग यादवही भारतीय सैन्यात होते. त्यामुळे सैनिकी वारसा होताच. सहावीला असताना परमवीर अब्दुल हमीद यांच्या शौर्यकथेने प्रभावित होऊन त्यांनी सैनिक होण्याचे ध्येय मनाशी बाळगले. 1998 मध्ये ते भारतीय सैन्याच्या ‘18 ग्रेनेडियर्स रेजिमेंट’मध्ये सामील झाले.
कारगील युद्धादरम्यान ‘टायगर हिल’च्या महत्त्वाच्या ‘घातक’ कमांडो प्लाटूनचा ते एक भाग होते. टायगर हिलवरील उभ्या, खडकाळ, बर्फाच्छादित, एक हजार फूट उंच कडय़ावरील वरच्या बाजूला असलेल्या तीन मोक्याच्या बंकर्स काबीज करण्याचे काम त्यांना देण्यात आले. 4 जुलै 1999 रोजी यादव आणि त्यांच्या सहा सहकाऱयांनी ‘टायगर हिल’वरील 90 अंशांची कठीण चढाई सुरू केली. त्यांना सर्व बाजूंनी मृत्यूने वेढले होते. पाकिस्तानी सैनिकांनी स्वयंचलित ग्रेनेड, रॉकेट आणि तोफखान्याचा जोरदार गोळीबार केला ज्यामध्ये कमांडर आणि त्यांचे दोन सहकारी ठार झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शत्रूच्या स्थानावर रांगत चढताना त्यांना अनेक दुखापती झाल्या. आपल्या दुखापतींकडे दुर्लक्ष करून आणि शत्रूच्या गोळ्यांच्या वर्षावाला चुकवत ते चढत राहिले. ग्रेनेड फेकत आणि सतत गोळीबार करत त्यांनी शत्रूच्या चार सैनिकांना ठार मारले. यादव यांच्या शरीरावर 17 गोळ्या लागल्या. स्वतला कसेतरी वाचवण्याचा प्रयत्न करतानाच शत्रूने त्यांच्यावर पुन्हा गोळी झाडली, पण त्यांच्या खिशात पाच रुपयांची काही नाणी होती. गोळी त्यावर लागली आणि यादव कसेबसे वाचले. शेजारी त्यांच्या सहकाऱयांचे देह छिन्नविच्छिन्न अवस्थेत पडले होते. पाकिस्तानी सेना त्या देहांना बुटाने लाथाडणे, थुंकणे, दगडाने ठेचणे अशी अमानवीय कृत्ये करीत होती. जखमी होऊन यादव खाली पडले तेव्हा शत्रूंना वाटले की, तेही ठार झाले आहेत. त्यांची कृत्ये पाहून चीड येत होती. तरीही संयम राखत यादव निश्चल पडून राहिले. जेव्हा शत्रूची दुसरी टीम आली तेव्हा यादव यांनी एक ग्रेनेड उचलला आणि त्यांच्या एका सैनिकावर फेकला. त्यानंतर रायफल उचलून शत्रूच्या पाच सैनिकांना ठार मारले.
शरीर रक्तबंबाळ झाले होते, चालण्याचे त्राण नव्हते. तरीही त्या ठिकाणी एकाकी लढत शत्रू सैन्याला माघारी परतवले. सुमारे 25-30 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारले आणि टायगर हिल ताब्यात घेतली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सर्वात उल्लेखनीय धैर्य, अदम्य शौर्य दाखवल्याबद्दल त्यांना सर्वोच्च लष्करी पुरस्कार परमवीर चक्र जाहीर झाला.
यादव यांना ‘मरणोत्तर’ परमवीर चक्र देण्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. कारण त्यांच्याच युनिटमध्ये त्याच नावाचा एक सैनिक टायगर हिलच्या विजयादरम्यान हुतात्मा झाला होता, पण लवकरच कळले की, परमवीर चक्र प्राप्तकर्ता योगेंद्र सिंह यादव जिवंत असून एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यानंतर तत्कालीन लष्करप्रमुख जनरल वेद प्रकाश मलिक तिथे पोहोचले आणि देशातील सर्वोच्च लष्करी पुरस्काराबद्दल माहिती देऊन त्यांचे अभिनंदन केले. वयाच्या 19 व्या वर्षी परमवीर चक्र मिळवणारे ते सर्वात तरुण योद्धे आहेत.
2015 मध्ये त्यांच्या सेवेसाठी त्यांना उत्तर प्रदेश सरकारने राज्याचा सर्वोच्च पुरस्कार ‘यश भारती’ प्रदान केला. 2020 मध्ये अमिताभ बच्चन यांच्या विशेष निमंत्रणावरून परमवीर चक्र विजेते सुभेदार संजय कुमार यांच्यासह ते ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये सहभागी झाले. जिंकलेली 25 लाख रुपयांची संपूर्ण रक्कम त्यांनी आर्मी वेल्फेअर फंडला दान केली. एलओसी ‘कारगील’ या चित्रपटात यादव यांची भूमिका मनोज वाजपेयी यांनी केली होती. 2021 च्या स्वातंत्र्यदिनी भारताच्या राष्ट्रपतींनी यादव यांना कॅप्टनचा मानद दर्जा प्रदान केला. 31 डिसेंबर 2021 रोजी पारंपरिक निरोपाने मानद कॅप्टन पदावर सैन्यातून ते निवृत्त झाले.