Lata Mangeshkar Birthday – श्रीकृष्णाची बासरी… लता!

>> शिरीष कणेकर

श्रीकृष्ण वैकुंठाला जाताना त्याची बासरी मागे विसरून गेला, तीच लता. आज लता वयाची 92 वर्षे पूर्ण करीत आहे. जुगजुग जियो, दीदी.

लता मंगेशकर आज 92 वर्षांची झाली हे आपलं उगीच म्हणायचं. कारण आवाजाला वय नसतं, जात नसते, धर्म नसतो.

आम्ही लताला आमच्या आयुष्यातून दूर करू इच्छित नाही, शकत नाही. ती आमच्या धमन्यांतून वाहत्येय, काळजात बसल्येय व हृदयाचा ठोका बनून ताल धरत्येय. कुठलीही आठवण तिच्या गाण्याची सोबत घेऊन भेटायला येते. दुःखाच्या क्षणीही ती गात असते – ‘न मिलता गम तो बरबादी के अफसाने कहाँ जाते?’ येतंय ऐकू?

मिलता गम तो बरबादी के अफसाने कहाँ जाते

अगर दुनिया चमन होती तो वीराने कहाँ जाते ।।1।।

चलो अच्छा हुवा अपनो मे कोई गैर तो निकला

अगर होते सभी अपने तो बेगाने कहाँ जाते ।।2।।

दुवाए दो मुहोब्बते हमने मिटकर तुमको सिखलायी

जलती शमा महेफिल मे तो परवाने कहाँ जाते ।।3।।

तुम्हीने गम की दौलत दी बडा एहसान फरमाया

जमाने भर के आगे हाथ फैलाने कहाँ जाते ।।4।।

तोंडावर शक्य नाही, पण एरवी पाठीवर लताच्या नावाचा उल्लेख आम्ही एकेरीतच करतो व कायम करीत राहू. अहो-जाओ करायला ती काय ऑफिसातली साहेब आहे? देवालासुद्धा आपण अरे-तुरे करतो. देवाचा अंश उतरलेल्या आईलाही आपण अगंतुगं करतोच ना? मग लता आपल्या लेखी काय वेगळी आहे? काय गायल्येय लता, असेच उद्गार आपल्या काळजातून उत्स्फूर्तपणे निघतात. लताबाई चांगल्या गायल्यात, असं हात राखून त्रयस्थासारखी दिलेली कोरडी दाद आम्हाला मानवत नाही. लता आमची आहे आणि आम्ही तिचे आहोत.

लता तुझी ‘गॉडमदर’ आहे असं माझा एक मित्र सहज बोलून गेला आणि मी किती मनोमन सुखावलो काय सांगू! ती भावना कळण्यासाठी आई नसावी लागते.

बाप म्हणाला, ‘पोरी तुझ्या गळय़ात गांधार आहे.’ बापाच्या पश्चात पोरगी हेलावून गायली, ‘कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला.’ सज्जाद तिला म्हणाला, ‘मेरी काली कोयल.’ लता त्याच्याकडे कोकिळेसारखी गायली, ‘वो तो चले गये ऐ दिल.’ अनिल विश्वास म्हणाला, ‘लता या क्षेत्रात आली आणि आम्हाला देवदूत आल्यासारखं वाटलं. लता त्याच्याकडे  देवदूतासारखीच गायली, ‘बदली तेरी नजर तो नजारे बदल गये.’ मदन मोहन म्हणाला, ‘लहानपणी ज्योतिषानं माझं सर्व भविष्य अचूक सांगितलं, पण लता मंगेशकर नावाचा दैवी आवाज तुझ्याकडे गाईल हे नाही सांगितलं. लता, मदन मोहनकडे दैवी आवाजात गायली, ‘प्रीतम मेरी दुनिया मे दो दिन तो रहे होते.’ गुलाम महंमद लताच्या हसण्यानं कातावून म्हणाला, ‘लताजी हंसिये मत, ठीक तरहसे गाइये.’ मग लता त्याच्याकडे न हसता ठीक तरहसे गायली, ‘दिल देके सनम तुम्हे पछताए हम.’ एस. डी. बर्मन तिला बंगाली ढंगात ‘लोटा’ म्हणून बोलायचा आणि मग लता गायची, ‘रोते रोते गुजर गयी रात रे.’ सी. रामचंद्र नशिली ‘लोरी’ बनवायचा आणि लता धुंदफुंद गायची, ‘धीरे से आजा रे अखियन मे.’  जमाल सेन तिला एक अफलातून गाणं द्यायचा आणि मग लता अफलातून गायची, ‘सपना बन साजन आये.’ रोशन खास तिच्यासाठी चाल बांधायचा व मग लता त्याच्यासाठी खास गायची, ‘जिंदगीभर नही भूलेगी वो बरसात की रात.’ शंकर-जयकिशन धमाल करायचे व मग लता या जोडगोळीसाठी धमाल गायची, ‘हवामे उडता जाये मेरा लाल दुपट्टा.’ नौशादनं तिच्यासमोर आव्हान फेकलं आणि मग आव्हान स्वीकारत लता गायली, ‘तीर खाते जायेंगे’. सलील चौधरीनं बंगाली मिठाईसमान चाल बांधली व लता मिठाईसारखीच गायली, ओ सजना बरखा बहार आयी’. वसंत देसाईंनी हिंदी गोतावळय़ात मराठी आनबान दाखवली आणि लता तिला पूर्ण न्याय देत गायली, ‘तेरे सूर और मेरे गीत’, सुधीर फडकेंनी मराठी मान उंचावणारं मधाळ गाणं दिलं आणि मराठमोळी लता मधाळ गायली, ‘बांध प्रीती फुलडोर.’ हुस्नलाल-भगतरामनी सदाजवान चाल दिली आणि लता जवानीचा जोश दाखवत गायली, ‘अभी तो मैं जवान हूँ.’ जयदेवनं भक्ती एकवटलेलं भजन लिहिलं आणि लता तल्लीन होऊन गायली, ‘अल्ला तेरो नाम.’ व्ही. बलसारा नावाच्या अल्पज्ञात संगीतकारानं हृदयाच्या तारा छेडणारं गाणं दिलं व लतानं ते मनापासून गायलं, ‘कब जीत गयी जीवन की सुबह.’ महंमद शफीनं रागदारीतील पारंपरिक बंदीश लतासमोर पेश केली व लता शास्त्र्ााsक्त बैठकीत गावं तशा तयारीनं गायली, ‘बाजूबंद खुल खुल जा! गायक-संगीतकार हेमंतकुमारनं धुंदीत बीन वाजवली व लता त्याच धुंदीत गायली, ‘मन डोले मेरा तन डोले.’ लक्ष्मीकांत-प्यारेलालनी अनोखी चाल दिली व मग लता अनोखी गायली, ‘चलो सजना जहाँ तक घटा चली.’ हुस्नलाल-भगतरामनं आगळीवेगळी चीज दिली व लता आगळीवेगळी गायली, ‘चुप चुप खडे हो, जरूर कोई बात है!’ आर. डी. बर्मन बाप से बेटा सवाई निघाला व मग लता त्याच्याकडे गायली, ‘बीती ना बिताये रैना’…

मोगरा तिच्या गळय़ात फुललाय. कोणा लवंगीकेचं लटपट लटपट चालणं तिच्या अवखळ जिभेने नेमकं टिपलंय. ‘मालवून टाक दीप’ असं आर्जव करणाऱया मीलनोत्सुक रमणीची अधीरता तिच्या आवाजातून जाणवत्येय. ‘साजन की गलियाँ छोड चले’ हा निषाद तिच्या स्वरांतून पाझरलाय. ‘सावरी सूरत मन भाये रे पिया’ हा लाजरा आनंद तिच्या मुखातून ठिबकलाय. ‘तारे वही है, चाँद वही है, हाय मगर वो बात नही है’ ही व्यथा तिच्या तोंडून साकार झालीय. ‘बेचैन करनेवाले तू भी न चैन पाये’ हा भंगलेल्या हृदयाचा तळतळाट व ‘कोई किसी का दीवाना न बने’ ही पोळलेल्या अंतःकरणाची उपरती तिच्या अजोड कंठातून वेदनेसारखी ठणकत आलीय. ‘दिले बेकरार सो जा, अब तो नही किसी को तेरा इंतजार सो जा’ हा रडवा, अश्रूपूर्ण ‘गिला’ तिनं केलाय. ‘बनायी है इतनी बडी जिसने दुनिया उसे टूटे दिल का बनाना न आया’ ही बोचरी विसंगती दुसऱया आवाजात तिनं दाखवून दिल्येय.

परवा बोलता बोलता महान संगीतकार श्यामसुंदरचा विषय निघाला. त्या काळच्या आठवणीत लता रमून गेली. ‘मी एकदा नेहमीप्रमाणे पांढरी साडी नेसून व माझी छोटी पर्स घेऊन श्यामसुंदरच्या रेकॉर्डिंगला गेले. लता हरखून म्हणाली, ‘मला पाहून तो म्हणाला, ‘लता, तू शिकवणीला आलेल्या लहान मुलीसारखी दिसतेस.’

‘मग तुम्ही ‘बजार’मधलं ‘साजन की गलियाँ’ गायलंत का?’ मी माझी जाणकारी दाखवण्याची संधी सोडली नाही.’

‘नाही, ‘बहार आयी खिली कलिया.’ ‘अलिफ लैला’ मधलं.’

मी यावर काही बोलणार तोच लतानं फोनमधून ‘बहार आयी खिली कलिया’ गायला सुरुवात केली. मी भिजल्यासारखा झालो. साक्षात लता वय आणि आजारपण झुगारून देऊन गात होती आणि मी एकटा ऐकत होतो. त्या आर्त अफलातून गाण्यात तिनं एक मुरकी घेतली आणि टचकन माझ्या डोळय़ात पाणी आलं.

‘दीदी, मी भरल्या गळय़ानं म्हणालो, काल मी नौशादचं ‘उडन खटोला’मधलं तुमचं ‘मोरे सैंयाजी उतरेंगे पार रे’ कितव्यांदा तरी ऐकत होतो आणि काय झालं कळत नाही, मला एकाएकी रडू कोसळलं. असं का होतंय अलीकडे?’

‘काहीतरीच तुमचं!’ लता संकोचून म्हणाली.

बोलतानाही पाणावलेले माझे डोळे पुसून मी म्हणालो, ‘नौशाद मला एकदा तुमच्या त्याच्याकडे गायलेल्या गाण्यांविषयी सांगत होता. त्या वर्णनात धृपदासारखं एक वाक्य येत होतं – ‘लता गा रही थी. कादरबक्ष रो रहा.’

शेवटी न राहवून मी नौशादला विचारलं, ‘नौशादसाहब, कादरबक्ष तुमच्याकडे सारंगी वाजवायला होता की लताच्या गाण्यावर रडायला?’

नौशाद रागावला. नौशादच्या रागाचं व कादरबक्षच्या रडण्याचं कारण कळायला मला पंचाहत्तरी ओलांडावी लागली होती. गाण्याचं रेकॉर्डिंग करतानाच लताच्या आवाजातून झिरपलेले दर्द कादरबक्षला कळलं होतं. मला कळायला एवढा काळ लागणारच. शेवटी कळलं हेही नसे थोडके!

मुद्दा काय, लता आज गात नाही, कारण ती गाऊ शकत नाही हे मला सांगू नका. मी या कानांनी तिला ‘बहार आयी खिली कलिया’ गाताना ऐकलंय. तात्पुरता देव माझ्या कानात येऊन राहिला होता.

मागे मी एकदा लताला तिच्याच घरात म्हणालो होतो, ‘दीदी, तुम्ही करण दिवाण, त्रिलोक कपूरसारख्या न गाणाऱया (व अभिनय न जमणाऱया) लोकांबरोबर द्वंद्वगीतं गायलायत; मग मीच काय पाप केलंय? आपण द्वंद्वगीत गाऊया की. ‘अब सुनिये, लता मंगेशकर और शिरीष कणेकर को-’ ही अनाऊन्समेंट किती छान वाटेल…’

‘प्रश्नच नाही.’ लता म्हणाली, ‘अवश्य आपण द्वंद्वगीत गाऊया. सुरात कसं गातात हे तरी तुमच्यामुळे लोकांना कळेल.’

लताचा टोमणा इतका गोड होता की, त्यावर मी हसलो होतो. आपण लताशी इतक्या सलगीनं बोललो होतो हे पुढे बरेच दिवस मला खरं वाटत नव्हतं; पण त्याचबरोबर गानसम्राज्ञीबरोबर तोंड वर करून आगाऊपणे बोलण्याची ही मुहूर्तमेढ आहे याचीही मनाविरुद्ध मी मनाशी खूणगाठ बांधली होती.

ती माणूस पारखून घेते. तऱहेतऱहेने आजमावते. त्यातून तो तावून सुलाखून निघाला की मग ती डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवते. मी याच चरकातून गेलो असावा. विश्वासाचं मला माहीत नाही. परवा ती सांगत होती, ‘शिरीष, मी आयुष्यात एकाच माणसाच्या मुस्काटीत मारल्येय.’

कोणाच्या व का, हा प्रश्न विचारण्याचे मी कटाक्षानं टाळले. तिनं कदाचित सांगितलंही असतं, पण उरी दडवून ठेवावी अशी अमूल्य माहिती मला माझ्यापाशी नकोच होती. अनवधानानं ती माझ्याकडून लेखी किंवा तोंडी झिरपली असती तर ती लताशी दगाबाजी ठरली असती. ती बिचारी या स्टेजला काहीतरी आत्मीयतेनं बोलत्येय व मी त्याचं भांडवल करून माणसांना घडीभर रिझवू? त्यापेक्षा मला माहीतच नसलेलं चांगलं नाही का?

‘हॅलो।़ मी लता’ नावाचा लेख मी लिहिला होता. तो प्रसिद्ध झाल्यावर मी तिला विचारलं, ‘काही खटकलं?’

‘काय?’ ती माझ्याकडूनच खटकण्यासारखं काही लिहिलंय का हे काढून घेऊ पाहत होती.

‘काय असं नाही, एकूणच.’ मी सावधपणे म्हणालो.

‘लिहा हो तुम्ही दडपून; तुम्हाला कोण विचारणार आहे?’ लता प्रसन्न हसत म्हणाली.

‘अहो दीदी, हा काय कॉम्प्लिमेंट झाला?’ मी कृतकोपानं विचारलं.

लता आणखीच हसत सुटली. ती मनापासून गाते, तशीच मनापासून हसते. आतबाहेर काही नाही. चोरटेपणा नाही.

‘तुम्हाला के. दत्ता (दत्ता कोरगावकर) आठवतायत का?’ मी म्हणालो.

‘म्हणजे काय? चांगली गाणी द्यायचे. ‘गाये लता, गाये लता’ हे गाणं ‘दामन’मध्ये त्यांनी मला दिलं होतं. त्यांचं काय?’

त्यांनी एकदा जेरीला येऊन सज्जादला विचारले, ‘नौशाद तुझी नेहमी तारीफ करीत असतो. तू मात्र त्याला सतत शिव्या घालतोस. काय वैर आहे तुझं त्याच्याशी?’

‘काहीच नाही.’ सज्जाद शांतपणे म्हणाला, ‘उसको म्युझिक देना नही आता, इतनाही.’

पुन्हा एकदा लता खळखळून हसली. ती सज्जादच्या मताशी सहमत होती असं नाही व नव्हती असंही नाही. तिच्या आवडत्या संगीतकारांत नौशाद व सज्जाद दोघंही आहेत. त्यांच्याव्यतिरिक्त अनिल विश्वास, रोशन, मदनमोहन व शंकर-जयकिशन हेही येतात. (म्हणजे केवळ एस.डी. बर्मन व सी. रामचंद्र दोघंच दिग्गज नाहीत? ते त्यांच्या संगीतामुळे बाद होतात की वैयक्तिक रोषामुळे?) सी. रामचंद्र माझ्यापाशी अकारण उसळून म्हणाले होते की, अनुराधा पौडवाल व प्रमिला दातार लताइतक्याच चांगल्या गातात. लताची गाण्याची पट्टी वरची आहे एवढंच. त्याच दमात ते पुढे म्हणाले होते, ‘कोणाचीही पोरगी गायला लागली की आईबापांना वाटतं, आपल्या घरी लता मंगेशकर जन्माला आलीय.’ माझ्या मनात आलं की, लताऐवजी त्यांनी अनुराधा पौडवाल किंवा प्रमिला दातार ही नावं का नाही घेतली? आखिर दिल की बात जबानपर आही गयी. आशा व लता यांच्या आवाजाचा, गायकीचा व गाण्यांचा सखोल अभ्यास करून एकानं त्यावर ग्रंथ लिहिला होता. आशा ही एनी डे लतापेक्षा श्रेष्ठ असल्याचा त्याचा निष्कर्ष ऐकून सी. रामचंद्रनी तो ग्रंथ भिरकावून दिला होता व ते त्या लेखकाच्या अंगावर ओरडले होते, ‘चालते व्हा. तुम्हाला काडीची अक्कल नाही.’ म्हणजे ते स्वतः काहीही मूर्खासारखं बोलतील; पण दुसऱया कोणी तसं बोललेलं खपवून घेतलं जाणार नाही.

लतानं अलीकडेच माझ्याकडे गुलाम हैदरची ‘मजबूर’ (साल 1948) मधली तिची ‘दिल मेरा तोडा’ व अन्य गाणी आणि सज्जादकडची तिची सगळी गाणी मागितली होती. खुद लता माँगे और मै ना दू?

‘ऐकली का?’ मी विचारलं.

‘ऐकली तर. मास्टर गुलाम हैदर खरोखरच संगीतात ‘मास्टर’ होते. त्यांनी मला ‘शहीद’मध्ये कामिनी कौशलच्या तोंडची गाणी दिली. पण ‘फिल्मीस्तान’च्या शशधर मुखर्जींनी माझा आवाज फार पातळ आहे म्हणून नाकारला. माझी गाणी मग ललिता देउळकर, सुरिंदर कौर व गीता रॉय (दत्त) यांच्याकडे गेली.  गंमत म्हणजे, त्याच वर्षी मी त्याच कामिनी कौशलसाठी ‘जिद्दी’मध्ये खेमचंद प्रकाश यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायले. त्यातली ‘जादू कर गये किसीके नैना’, ‘चंदा रे जा रे जा रे’ व ‘अब कौन सहारा है’ ही माझी ‘सोलो’ गाणी गाजली. त्यानंतर तथाकथित पातळ आवाज माझ्या मार्गात कधीच आडवा आला नाही.’ लता सांगत होती.

डॉक्टरांनी लताला जास्त बोलायला बंदी केली आहे. मीठ, औषधालाही खायला परवानगी नाही. पाणी अगदी कमी प्यायचं. औषधं, गोळय़ा व इंजेक्शन्स चालूच असतात. दिवसरात्र नर्सेसचा जागता पहारा आहे. डॉक्टरांच्या नियमित भेटी आहेत. लता या सगळय़ा शारीरिक छळाला लढाऊपणे व हसतमुखानं सामोरी जात्येय. फोनवर कधीही ती आजारपणाचं चऱहाट वळत नाही. नौशाद, सज्जाद, अनिल विश्वास, मदनमोहन, रोशन एवढे सुरिले विषय बोलायला असताना या सुरांच्या राणीनं दुखण्यासारख्या बेसूर विषयावर बोलून शेकडो हजारो सुश्राव्य गाणी गाणारी जीभ का विटाळावी? ती तिच्या खोलीबाहेर पडत नाहीच पण कोणी तिला भेटूही शकत नाही. अन् आता तुम्ही म्हणता की, तिनं फोनवरही जास्त बोलायचं नाही? अरे, याला काय अर्थ आहे? ती चवीनं खाणारी होती. (माझ्याकडे तिनं खिमा पॅटीस व कोलंबीची खिचडी कशी खाल्ली होती ही उगाळून उगाळून वीट आलेली कहाणी आता आवरती घेतो.) आता मीठच खायचं नाही तर चविष्ट चमचमीत काय खाणार? साधे पोहे व सांजाही नाही. आयुष्यभर बेचव गाण्यांनाही चविष्ट बनविणारीच्या वाटय़ाला हे भोग का यावेत? तिच्या अफाट लोकप्रियतेचा देवालाही हेवा वाटला असेल काय? तिचं गाणं ऐकून गंधर्वही जळला असेल का…?

रूपगर्विता ‘व्हीनस’ मधुबाला लताच्या आवाजात ‘आयेगा आनेवाला (‘महल’), ‘बेइमान तोरे नैनवा’ (‘तराना’), ‘ऐ चाँद प्यार मेरा’ (‘खजाना’), ‘खयालों मे तुम हो’ (‘सैंया’), ‘ओ जिंदगानी के मालिक’ (‘नाजनीन’), ‘न शिकवा है कोई’ (‘अमर’), ‘वो तो चले गये ऐ दिल’ (‘संगदिल’) व ‘बेकसपे करम कीजिए’ (‘मुगल-ए-आझम’) ही अमर गाणी गात रसिकांच्या हृदयसिंहासनावर अलगद जाऊन बसली. पण मधुबाला व तिचा हा आवाज यांच्यात काही बेबनाव झाला. गैरसमज दूर करण्यासाठी मधुबालाचा पिता अताउल्ला खान यानं लताला घरी पाचारण केलं. लता गेली. तिला बसवून तिच्यासमोरच मधुबाला ओ. पी. नय्यरशी फोनवर लंब्याचौडय़ा  गप्पा मारीत होती. लता मनात म्हणाली, तू ओ.पी.शी बोल नाहीतर आणखी कोणाशी बोल, पण मला कशाला बोलवून ठेवलंय? मधुबाला फोनवर बोलताना वेगवेगळय़ा अँगलनं लताकडे तिरपे कटाक्ष टाकत होती. लताचं माथं भडकलं. ती मनाशी चरफडली – ‘मला कसला थोबडा दाखवतेस?’

लता उठली आणि निघून आली. आधीचे गैरसमज दूर झालेच नाहीत; उलट नवीन निर्माण झाले. बाकी मधुबालाच्या लोभस मुखकमलाला ‘थोबडा’ म्हणणे लतालाच शक्य होतं.

लता नवीन आली होती तेव्हा ती अनिल विश्वास व दिलीपकुमार एकदा मुंबईच्या लोकल गाडीतून (थर्ड क्लासने, बरं का!) चालले होते. लता मराठी असल्याचं कळल्यावर दिलीपकुमार म्हणाला, ‘यांच्या उर्दू उच्चारांना दाल-चावलकी बू आती है.’

लताला सॉलिड फणकारा आला. तिनं उर्दू भाषेच्या अभ्यासासाठी व शब्दोच्चारांसाठी खास एका मौलवीची शिकवणी  ठेवली. त्यामुळे कोणी संगीतकार (नौशाद?) तिच्या अस्खलीत उर्दू शब्दोच्चारांचं श्रेय घ्यायला लागला तर ते लताला रुचत नसे. दिलीपकुमार तर अल्बर्ट हॉलमधल्या जलशाला तिला पेश करायला लंडनला गेला होता. यथावकाश त्यांचे बहीण-भावाचे नाते विणले गेले. अखेरच्या आजारात ती दिलीपकुमारला भेटायला गेली तेव्हा तो माणसं ओळखत नव्हता. अन्न झिडकारत होता, पण लतानं स्वहस्ते भरवलं तेव्हा तो निमूटपणे जेवला.

‘दीदी, लता मंगेशकर झाल्यानंतरही तुमच्या वाटय़ाला कधी अपमान आलाय का हो?’ मी कधीतरी एकदम ‘टँजंट’ देऊन विचारलं.

‘झालाय की.’ ती नेहमीच्या प्रसन्नपणे उत्तरली, ‘रुना लैला नुकतीच आली होती. एका कार्यक्रमात ती माझ्या पाया पडली. तेव्हा एक संगीतकार म्हणाला, ‘देखो, सूरज इन्सान के पाँव छू रहा है’.

‘काय सांगताय काय?’ मी अवाक् होऊन विचारलं.

‘हो, मी इन्सान. मी इन्सान होतेच म्हणा, पण ती सूरज कशी हे आजपर्यंत मला कळू शकलेले नाही.’

‘कोण होता तो संगीतकार?’ न राहवून मी विचारलं.

‘जाऊ दे. नावात काय आहे? एवढंच सांगते, तो रुना लैलापायी खुळावला होता.’ लता विषय संपवत म्हणाली.

‘शारदापायी शंकर खुळावला होता तसा?’

‘नो कॉमेंटस्.’ लता म्हणाली. तिचं एकदम बरोबर होतं. ही जीभ देवानं तिला गाण्यासाठी दिली होती. तिच्यावर शारदाफारदा नावं लतानं का आणावीत?

‘गीता दत्त माझी चांगली मैत्रीण होती. आमच्यात कसलेही हेवेदावे नव्हते. जुन्या पिढीतली गायिका जोहराबाई अंबालावाली मी तिची मुलगी असल्यागत माझे लाड करायची.’ लता म्हणाली.

‘तुमच्याआधी शमशादचा जमाना होता. तिच्याशी कसे संबंध होते?’

‘जेवढय़ास तेवढे.’

‘असं का?’

‘अहो, का म्हणून का विचारता? तिची होऊ शकली असती अशी बरीचशी गाणी माझ्याकडे आल्यावर तिला राग येणं स्वाभाविक नाही का?’ सर्वोच्चपदी असलेल्या लताचं सहृदय लॉजिक बोललं.

अनिल विश्वास माटुंग्याला असलेल्या त्याच्या फ्लॅटवर धोतर नेसून उघडय़ानं बसून भल्यामोठय़ा कढईत काहीतरी खास बंगाली पदार्थ बनवतोय व लता शेजारी बसून कुतूहलानं बघत्येय, असा एक दुर्मिळ फोटो माझ्या संग्रही आहे. मी त्याचा लतापाशी उल्लेख केल्यावर ती उत्स्फूर्तपणे म्हणाली, ‘फार मोठा संगीतकार!’ लतानं अनिलदाकडे एकूण 110 गाणी गायल्येयत.

फार वर्षांपूर्वी स्वतःला पत्रकार म्हणवून घेणाऱया एका संगीतकाराच्या चमच्यानं लताला फोन केला. त्यांच्यात पुढीलप्रमाणे संवाद झडला –

‘हॅलो।़।़ बोला. मी लता.’

‘तुमची काही प्रेमपत्रे आमच्या हाती लागलीत, काय करू?’

‘कशाचं?’

‘त्या प्रेमपत्रांचं.’

‘छापा. अगदी खुशाल छापा. मी कोणाला कधी प्रेमपत्र लिहिलेलंच नाही तर तुमच्याकडे ती येतीलच कुठून? कोणी तरी माझ्या अक्षरात खोटी पत्रं तयार केलीत. त्यांच्यावर माझी खोटी सही केल्येय. तुम्ही छापा. मग मी तुम्हाला कोर्टात खेचून तुमचं काय करते ते बघाच.’

त्यानंतर उरलेल्या आयुष्यात त्या माणसानं पुन्हा लताशी संपर्क साधला नाही.

पूर्वी लताशी भेटी कमी व अंतरानं व्हायच्या. आता फोनवर दोनचार दिवसांनी तरी बोलतोच. हपापल्यासारखं तिचं बोलणं ऐकतो व कानात ठसवून घेतो. कोण राहिलंय आता त्या काळचं? ना संगीतकार, ना गाणारे. लताकडे आठवणींचा महासागर आहे आणि मुख्य म्हणजे, त्या सगळय़ा आठवणी आजही तिच्या मनात ताज्या आहेत. मी त्या जागवण्याचा व काढून घेण्याचा माझ्याकडून प्रयत्न करतो. तिचं वय व ढासळलेली तब्येत लक्षात घेऊन मी विचारीत असतो. ती सांगते ते सगळंच मला हवं असतं.

‘संगम’मधलं ‘मैं का करू राम, मुझे बुढ्ढा मिल गया’ गाण्यास तिनं सपशेल नकार दिला होता. ‘चीप वाटतं’ तिनं राज कपूरला तोंडावर सांगितलं. राज कपूर दिवसभर तिच्या नाकदुऱया काढत बसला होता. परोपरीनं तो तिची समजूत काढत होता, ‘गाणं चीप’ वाटू नये म्हणूनच तर तुझ्याकडे आलोय. तू गायल्यावर आपसूक गाण्याला ‘डिग्निटी’ येईल. शिवाय ते नायिका वैजयंती माला पडद्यावर म्हणणार आहे. प्ली।़।़ज…’

अखेर कंटाळून लता तयार झाली. तिनं ‘मैं का करू राम’ कसं म्हटलंय ते आपण सगळेच जाणतो. लता नाही म्हणत असतानाही राज कपूर दुसऱया कोणाकडे गेला नाही हे महत्त्वाचं.

‘लता गाती है, बाकी सब रोती है’ असं स्फोटक विधान जाहीरपणे करून सज्जाद हुसेननं एकेकाळी खळबळ उडवून दिली होती. लता काय व कशी गाते ते सप्रमाण दाखवून देणारी अजोड गाणी सज्जादनं आपल्या स्वल्प कारकीर्दीत लताला दिली. ‘जाते हो तो जाओ’ व ‘भूल जा ऐ दिल’ (‘खेल’), ‘खयालो में तुम हो’, ‘काली काली रात रे’, ‘तुम्हे दिल दिया’, ‘वो रात दिन’ (सर्व ‘सैंय्या’), ‘वो तो चले गये ऐ दिल’ (‘संग दिल’), ‘तेरा दर्द दिलमें बस लिया’ (‘रूखसाना’), ‘ये कैसी अजब दास्तां’ (‘रुस्तम सोहराब’).

अन् मदनमोहनची ‘अनपढ’मधली लताची ‘है इसीमें प्यार की आबरू’ व ‘आपकी नजरोंने समझा’ ही गाणी ऐकून भारावलेला नौशाद म्हणाला होता, ‘एवढी दोन गाणी माझ्या नावावर करा व त्या बदल्यात माझं संपूर्ण संगीत घेऊन टाका.’

ही गाणी नौशाद मदनमोहनच्या दोन रचनांवरून ओवाळून टाकतो? काय विनय व काय दाद!

संपूर्ण कारकीर्दीत लताला एकही गाणं न देणाऱया ओ. पी. नय्यरला मी माझ्या घरी दीड तास सलग लता ऐकवली होती. (ऐकण्यासारखं व ऐकवण्यासारखं माझ्याकडे दुसरं काही नव्हतंच.) ताठ कण्याचा तो पंजाबी संगीतकार निःस्तब्धपणे ऐकत होता. ‘टूटे हुए अरमानों की इक दुनिया बसाये’ (‘लाहोर’ – श्यामसुंदर) सुरू झालं आणि ओ. पी. ताडकन उभं राहून कानाच्या पाळय़ा पकडून पाणावलेल्या डोळय़ांनी उत्स्फूर्तपणे म्हणाला, ‘हॅटस् ऑफ टू हर. साली ऐसी आवाज सौ साल में नहीं होगी.’

मी दिल थाम के ऐकत होतो. हे तुझं मत आहे तर तिला गाणी का नाही दिलीस हे त्याला विचारायची ही वेळ नव्हती.

तिकडे बेखबर लता पुढे गातच होती – ‘मेरे लिये तो गमे इंतजार छोड गये…’

लतानं एकदा मला विचारले होते, ‘तुम्ही ओ.पी.वाले का?’

‘हो.’ मी मान्य करीत म्हणालो, ‘अन् ओ. पी. मला लतावाला म्हणतो. वर विचारतो की, क्या कहती है वो पेडर रोड की दो महारानीयां?’ लता हसत सुटली.

अलीकडे फोनवर बोलताना तिचा आवाज फ्रेश वाटला. तसा मी म्हणालो, ‘दीदी, आवाजावरून तुमची प्रकृती चांगली वाटत्येय.’

‘आवाजाला काय धाड भरल्येय?’ ती उत्तरली.

माझ्या मनात आलं की, 92 व्या वर्षी हे केवळ लताच बोलू जाणे. आवाजाला काय धाड भरल्येय.

माझ्या मुलीच्या लग्नाला आल्याबद्दल मी तिचे औपचारिक आभार मानले तेव्हा ती म्हणाली, ‘आभार कसले मानताय? तुमची मुलगी लहानपणापासून मला तिची ‘फ्रेंड’ म्हणत आलीय. मग फ्रेंडच्या लग्नाला जायला नको?’

लताला (आणि आशालाही) पाहून माझी लेक भर मंचावर सर्वांच्या साक्षीनं ढसढसा रडली. लतानं तिला तिच्या गाण्यांचा आल्बम भेट म्हणून दिला.

‘नो प्रेझेंटस् आहे’, ‘माझी मुलगी कसंबसं बोलली.

‘मला चालतं.’ आल्बम तिच्या हातात देत लता हळुवारपणे म्हणाली. काय चुकीचं बोलली होती ती?

संगीतकार कल्याणजी ‘फिल्मफेअर’ या चित्रपटाविषयक नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला होता, ‘लता काही अमरपट्टा घेऊन आलेली नाही. आज ना उद्या कोणी ना कोणी तिची जागा घ्यायला येणारच.’

मुलाखत प्रसिद्ध झाल्यावर आपल्या विधानाची दाहकता त्याला स्वतःलाच जाणवली. तो लताकडे सारवासारव करण्यासाठी धावला.

‘वो क्या है ना, लताजी…’ कल्याणजीनं चाचरत सुरुवात केली, ‘आप तो जानती है, ये प्रेसवाले कैसे होते है. कुछ भी छाप देते है. मेरे कहने का ये मतलब नहीं था.’

कल्याणजीला थांबवत लता शांतपणे म्हणाली, ‘लेकिन आपने गलत क्या कहा, कल्याणजीभाई? मी अमरपट्टा घेऊन आलेली नाही हे तर त्रिकालाबाधित सत्य आहे. आज ना उद्या कोणी न कोणी माझी जागा घ्यायला येणारच, यातही काही खोटं नाही. प्रश्न एवढाच आहे की, माझी जागा घेणारी दुसरी लता घडवायला किंवा बघायला तुम्ही असणार आहात का?’

कल्याणजी मागल्या पायात शेपटी घालून तिथून पळाला. त्यानंतर लताच्या घराच्या समोरच्या फुटपाथवर थर्ड मॅनच्या दिशेनं राहणारा कल्याणजी माझ्यासमोर चकार शब्द न काढता नुसतेच उसासे सोडत बसला होता, पण त्याचा बोलका चेहरा ओरडून सांगत होता, ‘काही बोलायचं नाही रे बाबा, काही बोलायचं नाही. एकदम चूप.’

‘दीदी, तुमची सॉलिड दहशत आहे हो’ हे  ‘कल्याणजी प्रकरण’ झाल्यानंतर मी लताला म्हणालो, ‘कल्याणजीची तर बोलतीच बंद झाल्येय. नशीब मी संगीतकार नाही.’

‘पण आता गायक होणार आहात ना?’ लतानं मिश्किलपणे विचारले.

‘त्यांनाही दहशत आहे का?’ घाबरल्याचा अभिनय करीत मी म्हणालो.

लता ‘मैं रंगीला प्यार का राही’मध्ये हसल्येय, तशी हसली. ‘हसऱया लताचा दहशतवादी धाक’ हे लेखाचं संभाव्य शीर्षक माझ्या डोळय़ांपुढे तरळून गेलं. नंतर मी विचार केला की एकटय़ा, असहाय, बिनाआधार मराठमोळय़ा मुलीचा हातात तलवार घेतल्याशिवाय या उलटय़ा काळजाच्या चित्रपटसृष्टीत निभाव लागणं शक्य नव्हतं. त्यांनी तिला विकून खाल्लं असतं, पण ‘दाल-चावल’वाली मटण बिर्याणीवाल्यांना पुरून उरली. तिच्या सख्ख्या काकांनी तिच्याशी बोलणं टाकलं होतं. का, तर ती सिनेमात गाते म्हणून. ‘मला कुटुंब पोसायचं होतं. त्यातून धाकटा भाऊ आजारी.’ लता मला सांगत होती, ‘गाऊन पैसे मिळवणे मानाचं नव्हतं?’

लताच्या प्रेमळपणाचा, आपुलकीचा व अकृत्रिम स्नेहाचा मी अनेकदा अनुभव घेतलाय. माझ्या ‘यादों की बारात’ या पुस्तकाला तिनं हात राखून न ठेवता रसभरीत प्रस्तावना लिहिल्येय. मी ती भारावून जाऊन तिच्यासमोरच वाचत असताना दारात उभी राहून ती म्हणाली, ‘आवडली का? आपलं पुस्तक जायला पाहिजे.’

मी बघतच राहिलो. आपलं पुस्तक? माझ्या प्रकाशकानं ते पुस्तक कधी आपलं मानलं नव्हतं आणि इथे ही सुरांची राणी कोण कुठल्या शिरीष कणेकरच्या लेखनाविष्कारात इतकी गुंतली होती. माणुसकीचा हा झरा अख्ंाड वाहत असतो. मानलेला भाऊ संगीतकार महंमद शफीच्या घरी लता आतल्या खोलीत बसलेली असताना बाहेर सुमन कल्याणपूर येऊन शफीला भेटून गेली. नंतर लता शफीला म्हणाली, ‘हिला का नाही गाणं देत? चांगली गाते.’ (शफीनं माझ्याजवळ या घटनेला दुजोरा दिला होता.)

लताला भयंकर आवडणाऱया खोबऱयाच्या वडय़ा एके दिवशी मी तिच्याकडे घेऊन गेलो. ती हरखून गेली. (खोबऱयानं घसा खवखवतो या भानगडी नाहीत.) तिनं डबा उघडला व आत कुंकवाची पुडी पाहून ती चमकली.

‘वहिनींनी केल्यात?’ तिनं दबकत विचारले.

‘अर्थातच.’ मी म्हणालो, ‘बाजारातून तुम्ही आणू शकत नाही का?’ तिनं खुशीत मान डोलावली व डब्यातल्या तीन वडय़ा माझ्यासमोर खाल्ल्या व मग गडय़ाला डबा आत नेऊन ठेवायला सांगितलं. तिला वडय़ा खाताना बघण्यात मला किती आनंद आहे हे तिनं जाणलं होतं. मनकवडी. लताचा स्वभाव अनेकांपेक्षा मला जास्त कळलाय असं वाटून घ्यायला मला आवडतं. तिच्या गाण्यावर कधी कसली बंधने नव्हती, पण आज तिच्या खाण्यावर खूप निर्बंध आलेत. त्यात खोबऱयाची वडीही असावी.

आज तिच्या 92व्या वाढदिवसाला मी तिला काय देऊ? मी दरिद्री व दळभद्री काय देणार? तीच आम्हाला कायम भरभरून देत आल्येय. आमची ओंजळ अपुरी पडते आहे. किती घेशील दो कराने अशी आमची अवस्था आहे. मागे कोजागरीला तिची गाणी ऐकण्याचा कार्यक्रम आहे असं सांगितल्यावर ती म्हणाली होती, ‘मजा आहे तुमची.’ आजही रात्रंदिवस तिची गाणी लावून आम्ही आनंद लुटणार आहोत. तिच्या तब्येतीसाठी प्रार्थना करणार आहोत आणि देवाला सांगणार आहोत, आमची आयुष्ये तिच्या खाती जमा कर. नाही तरी मरणाची वाट पाहत जगण्यापलीकडे आम्ही करतो तरी काय…?

लता पंचावन्न वर्षांची झाली तेव्हा मी लिहिलं होतं – ‘परमेश्वराच्या अस्तित्वाचा साक्षात्कार घडवणारा स्वर असा दिवसांच्या, महिन्यांच्या आणि वर्षांच्या हिशेबात मोजायचा असतो? उद्या आईची माया किलोत मोजाल. पतिव्रतेची किंमत तिच्या गळय़ातील काळय़ा पोतीच्या दामावरून कराल. काळजातलं दुःख सेंटिमीटरमध्ये मोजाल. अश्रूंचे मोल लिटरच्या भावात कराल…

लता आज गात नाही हे आम्हाला मान्य नाही. तिचं वय झालंय, अनेक आजारांनी तिला घेरलंय, संगीताच्या नावाखाली घातल्या जात असलेल्या धुडगुसाशी तिची नाळ जुळत नाही, असली कारणे आमच्या तोंडावर मारू नका. आम्हाला ती गायला पाहिजे, बस्स! सूर्य उगवला नाही असं कधी झालंय का? जोवर आम्ही जिवंत आहोत तोवर देवी सरस्वतीचा हा दैवी स्वर प्रतिदिन नव्यानं आमच्या कानी पडायला हवा. हे मागणं फार आहे का हो?

आपली प्रतिक्रिया द्या