ठसा-अमृतलाल वेगड

<<डॉ. सच्चिदानंद शेवडे, drshevde@gmail.com>>

‘अमृतस्य नर्मदा’, ‘सौंदर्य की नदी नर्मदा’, ‘तीरे तीरे नर्मदा’ आणि ‘नर्मदा तुम कितनी सुंदर हो’ आदी पुस्तके लिहून नर्मदा मैयाची भक्ती करणारे ख्यातनाम चित्रकार, साहित्यिक आणि विलक्षण परिक्रमावासी असलेले अमृतलाल वेगड यांचे नुकतेच वृद्धापकाळाने जबलपूर मुक्कामी निधन झाले. हिंदी व गुजराती भाषेतील साहित्यकृतीबद्दल त्यांना ‘साहित्य अकादमी’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांच्या पुस्तकांचे मराठी, इंग्रजी, बंगाली व संस्कृत अनुवाद प्रसिद्ध आहेत. गेली अनेक वर्षे ते अस्थम्याने पीडित होते. तरीही नर्मदाविषयक काम करीत होते हे विशेष होय. ‘नर्मदापुत्र’ अशी त्यांची ओळख होती.

३ ऑक्टोबर १९२८ मध्ये जबलपूर येथे जन्मलेल्या वेगड यांनी वयाच्या पन्नासाव्या वर्षी नर्मदा परिक्रमेला प्रारंभ केला. १९७७ पासून सुरू झालेली परिक्रमा २००९ पर्यंत अखंडपणे सुरू राहिली. यात केवळ भक्तिभाव होता, पण त्यात काही वेगळेपणाही होता. चार सहस्र कि.मी. पदयात्रा करीत त्यांनी नर्मदेच्या काठी असलेल्या संस्कृती, लोकजीवन, इतिहास, वृक्ष-वनस्पती, पशुपक्षी आदी अनेक विविधतेचा परिचय लोकांना करून देण्याचे महत्कार्य केले.

प्रतिवर्षी काही काळ परिक्रमा करून ते परतत असत. त्यांनी दोनवेळा संपूर्ण परिक्रमा केली. या भटकंतीत ते सहस्रावधी लोकांना भेटले. त्यांचे जगणे जाणून घेतले. नंतर ते सर्व अनुभव शब्दबद्ध केले. हा उपक्रम त्यांनी तीन दशके राबवला. आज वेगडांची पुस्तके वाचून परिक्रमा अधिक डोळसपणे करता येते असे म्हटले तर वावगे ठरू नये इतके काम त्यांनी केले आहे. स्वतः उत्तम चित्रकार असल्यामुळे त्यांच्या पुस्तकातील अप्रतिम रेखाटने ही त्यांचीच असत. केवळ परिक्रमेवर आधारित असे ‘नर्मदा-एक परिक्रमा’ हे पुस्तक त्यांनी लिहिले.

पर्यावरण वाचवणे आणि त्याचे रक्षण करणे या कार्यात ते अग्रेसर असत. त्यांची सात पुस्तके गुजरातीत तर चार हिंदीत प्रकाशित झाली आहेत. शिवाय त्यांनी बालसाहित्य लिहिले आहे. काही वर्षांपूर्वी माखनलाल चतुर्वेदी पत्रकारिता संस्थानाने ‘डी. लिट’ देऊन त्यांचा सत्कार केला होता. ‘महापंडित राहुल सांकृत्यायन’ पुरस्कारासारख्या अनेकविध राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

नर्मदा मैयावरील त्यांची पुस्तके वाचताना आपलीसुद्धा मानसिक परिक्रमा होते. त्यांच्या सोबत आपण तो प्रदेश पाहतोय आणि त्याचा अनुभव घेतोय अशी सतत जाणीव होत राहते. हे त्यांच्या लेखणीचे यश म्हणायला हवे. वाचकांना सोबत घेऊन आपल्या अनुभवविश्वात डुंबायचा अनुभव देणे हे सोपे काम नव्हे. तथापि ते अमृतलाल वेगड यांना सहज जमले होते. त्यामुळे प्रकाशित पुस्तक संख्या कमी असूनही ते अत्यंत यशस्वी आणि सजग लेखक होते.

लेखकाच्या बाबतीत त्याने किती लिहिले यापेक्षा काय लिहिले याला अधिक महत्त्व असते. त्या पार्श्वभूमीवर वेगड यांनी आपला वेगळा ठसा उमटवला हे निश्चित. सहजपणे एका ठिकाणी ते लिहून जातात, ‘रोटी यह प्रकृती है, पुडी यह विकृती है और भाकर यह संस्कृती है…!’ अत्यंत साधी राहणी, विनम्र वृत्ती आणि एक लक्ष्य ठेवून त्या दिशेने मार्गक्रमण करणारा असा हा विलक्षण परिक्रमावासी ६ जुलैला सर्वांना सोडून मैयाच्या कुशीत कायमचा गेला. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा अंत्यविधी मैयाच्या किनारी करण्यात आला.