लेख- हिंदुस्थानातील ग्रंथालये आणि सद्यस्थिती

693

डॉ. प्रीतम भि. गेडाम ([email protected])

पुस्तके मानवाचे चांगले मित्र असतात. म्हणजे जे लोक नेहमी वाचन करतात ते कधीच जीवनात एकटे नसतात. एकेकाळी आपला देश नालंदा, तक्षशिलासारख्या शिक्षण केंद्र व ग्रंथालयाने समृद्ध होता व जगभरातील विद्यार्थी शिक्षणाकरिता इथे यायचे. आजचे ग्रंथालय हे फक्त ग्रंथालय नसून माहिती स्रोताचे मुख्य केंद्र आहे. सर्वात जास्त शिक्षण केंद्रे असलेला जगातील तिसरा देश हा हिंदुस्थान आहे. मात्र शिक्षणाचा मुख्य भाग असलेली ग्रंथालय किमान सोयीसुविधांपासूनही वंचित आहेत. लहान शहरांत व ग्रामीण भागात तर ग्रंथालय व्यवस्था खूप काळजीजनक आहे. 14 ते 20 नोव्हेंबर हा राष्ट्रीय ग्रंथालय सप्ताहम्हणून देशात साजरा केला जातो. त्यानिमित्त

आपल्या देशाच्या तुलनेने परदेशात ग्रंथालय व शिक्षण क्षेत्राने फार प्रगती केली आहे. ग्रंथालयात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. ग्रंथालयात ऐतिहासिक, दुर्मिळ, महागडे हस्तलिखित, अद्ययावत, सर्वच प्रकारचे साहित्य उपलब्ध असते. घर बसल्या किंवा जगात कोणत्याही जागेवर असले तरीसुद्धा वाचक ग्रंथालयीन मौल्यवान माहितीचा साठा वापरू शकतो. वाचकांना ग्रंथालयीन वेबसाइटचे लॉगइन आयडी, पासवर्ड व स्मार्ट कार्ड दिले जातात व ई-मेल किंवा सोशल मीडियाद्वारे ग्रंथालयीनसंबंधी माहिती वाचकांना अद्यावत ठेवण्यास नियमित रूपाने पुरविली जाते. वाचकांसाठी 24 तास ग्रंथालयीन सेवा उपलब्ध असतात, वाचक संशोधन केंद्र व तज्ञांना त्वरित संपर्क करू शकतात, वाचकांचा अडचणीवर ग्रंथालय विभाग त्वरित प्रतिसाद देतात, नवीन वाचकांना ग्रंथालयीन भरमसाट माहितीचा व तंत्रज्ञानाचा वापर कसा, कधी, कोणत्या प्रकारे करावे यासंबंधी माहिती नसते म्हणून वाचकांनासुद्धा ग्रंथालयातर्फे माहिती साक्षरतेचे प्रशिक्षण दिले जात असते. अशाप्रकारे आताचा ग्रंथालयाने माहिती केंद्राचे स्वरूप घेतले, पण त्या मानाने आपण प्रगती केली आहे का? आज आपल्याकडील ग्रंथालयाचे नाव घेता आपल्या डोळय़ांसमोर जे चित्र उद्भवते ते म्हणजे पारंपरिक सर्वसाधारण ग्रंथालय! पण असे का? कारण आपण कित्येक काळापासून असेच ग्रंथालय बघत चाललोय.

सर्वात जास्त शिक्षण केंद्रे असणारा जगात तिसरा क्रमांकाचा देश हिंदुस्थान आहे, पण त्या मानाने आपण गुणवत्तेत कुठे आहोत? आज परदेशात उच्च शिक्षणाकरिता सर्वात जास्त विद्यार्थी आपल्या देशातून जातात, त्यामागे मोठी रक्कमसुद्धा जात असते, असं का? शिक्षणाचा मुख्य भाग हा ग्रंथालय असूनसुद्धा देशातील 90 टक्के ग्रंथालये आताही आपल्या आधारभूत सोयीपासून दूर आहेत. मोठय़ा शहरांत ग्रंथालयांची परिस्थिती थोडी फार तरी बरी आहे, पण लहान शहरांत व ग्रामीण भागात तर ग्रंथालय व्यवस्था खूप काळजीजनक आहे.

शासनाने ग्रंथालयाच्या विकासाकरिता मोहीम राबवायला हवी. वाचनाची आवड मुलांना शाळेपासूनच लागायला हवी म्हणजे ग्रंथालयाची भूमिका तेव्हापासूनच चालू असते, पण आपल्या राज्यातील अधिकांश शाळांमध्ये साधी ग्रंथालयेदेखील नाहीत. ग्रंथालय विभाग असेल तर त्यात ग्रंथसाहित्य नाही, ग्रंथालय कर्मचारी नाही तर कुशल कर्मचारी किंवा आधुनिक तंत्रज्ञान कुठून असणार? कित्येक काळ लोटला, पण अनुदानित खासगी शाळेंवर ग्रंथालयीन कर्मचारीवर्गाचे पद भरत्या झाल्याच नाहीत. मौल्यवान ग्रंथालयीन साठा धूळ खात पडले आहे. तिथल्या लहान विद्यार्थ्यांना तर ग्रंथालय म्हणजे काय, हेसुद्धा माहिती नसते मग अशा वातावरणात आपण सुसंस्कृत, शिक्षित भावी पिढी कशी घडविणार? ग्रंथालयाचे महत्त्व सगळय़ांना पटायलाच हवे. विषयाचा तज्ञ कर्मचारी हाच आपल्या विभागाशी योग्य न्याय करू शकतो तेव्हा केंद्र शासनाच्या नवोदय, केंद्रिय विद्यालयाप्रमाणे दरवर्षी राज्य शासनाद्वारे ही अनुदानित खासगी संस्थेचा शाळेंवर ग्रंथालय कुशल कर्मचारीवर्गाची पद भरती करायला हवी.

आज आपण ग्रंथालय म्हटले तर बहुतेक लोक असे मानतात की, ग्रंथालय फक्त ग्रंथ देव-घेव सेवेकरिताच असते. आणखी त्यात असतेच काय? पण सत्य याहून वेगळे आहे. आजचे ग्रंथालय हे ई-ग्रंथालयाच्या स्वरूपात बदलत आहे. ग्रंथालयाचा साहित्य सामग्रीमध्ये डिजिटल साहित्य, ई-पुस्तक, ई-पत्रिका, ऑडिओ-व्हिडीओ संग्रह, सीडी-डीव्हीडी, डाटा बेस, ऑनलाइन ग्रंथालयीन सहभागीता, ई-कॅटलॉग, ई-अनुक्रमणिका व इतर सामग्रीसुद्धा ऑनलाइन रूपात उपलब्ध असते. जे-गेट, एन-लिस्ट, डेलनेटसारखे अनेक सबक्रिब्शन शैक्षणिक संस्थेकरिता उपलब्ध आहेत जे विद्यार्थ्यांना जगभरातील वेगवेगळय़ा विषयांवर भरमसाट माहिती पुरवितात. ग्रंथालयीन पूर्ण कार्य हे आता ऑनलाइन झाले आहेत अशा काळात कर्मचारीवर्गसुद्धा कौशल्यपूर्ण तज्ञ व कुशल ग्रंथालयीन प्रबंधक असणे गरजेचे आहे. आधुनिक काळात मोठय़ा प्रमाणात माहितीचा साठा तयार होतो तेव्हा तो कमी वेळात योग्य वाचकांपर्यंत योग्यरीतीने पोहोचविणे ही जबाबदारीचे कार्य ग्रंथालयाद्वारे होत असते. ग्रंथालयीन कार्य एवढे सोपे नाही जेवढे ते दिसते. या यशस्वी ग्रंथालयीन कार्यप्रणालीमागे संपूर्ण टीम कार्यरत असते. ग्रंथालय बजट, कमेटी, पुस्तकपत्रिका मॅगझीन, संदर्भ ग्रंथ व इतर सामग्री निवड खरेदी प्रक्रिया, नोंदणी, वर्गीकरण, बारकोडिंग लेबलिंगपासून पुष्कळशा प्रक्रियेतून जावे लागते. अनेक प्रकारचे बिल्स, फाईल्स, रिपोर्ट, पत्रव्यवहार, रिकॉर्ड, रजिस्टर मेनटेन करावे लागतात, वेगवेगळय़ा क्षेत्रांतील वाचकवर्ग ग्रंथालयात आपली समस्या किंवा गरजेपोटी येत असतात. त्यात सर्वांना योग्य व निवडक माहिती योग्य वेळेत पुरविणे हेच ग्रंथालयाचे ध्येय असते.

आज आपण पुष्कळ ठिकाणी बघतो की, निधीच्या कमतरतेमुळे ग्रंथालयाच्या कर्मचारीवर्गाचे पगार होत नाहीत, ग्रंथालयात आवश्यक साधन-सामग्री नाही, वर्तमानपत्रे, पत्रिका नाही म्हणजे सर्वसाधारणपणे आधारभूत सोयीसुद्धा नाहीत आणि जे काही थोडेसे साहित्य आहे तेसुद्धा धूळ खात पडले आहे. कुठे ग्रंथालयाची इमारत जर्जर झाली आहे तर कुठे हे ग्रंथालय कचराघर झाले आहे. काही ठिकाणी तर ग्रंथालय चक्क स्टोअर हाऊसप्रमाणे वापरण्यात येते तर कुठे मोठमोठी ग्रंथालयेही तिथल्या चतुर्थ श्रेणीच्या कर्मचारीवर्गावर चालत आहेत. जर ग्रंथालयाला सुखरूप चालविण्याकरिता निधीच नसणार तर ग्रंथालयीन कार्यप्रणाली कशी चालणार?

ग्रंथालय विषय खूप व्यापक आहे. जगभरात या विषयात निरंतर विकास होतच चाललाय, पण डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी दर्शविलेल्या ग्रंथालयाच्या पाच नियमांची अंमलबजावणी प्रत्येक ग्रंथालयात पूर्णपणे होते का? खासगी संस्थेत निधीच्या कमतरतेचा प्रश्न असतोच, पण अनुदानित महाविद्यालयीन ग्रंथालय हे आपल्याकडे संशोधन केंद्राच्या स्वरूपात का विकसित होत नाही? प्रत्येक महाविद्यालयातील ग्रंथालय हे संशोधन केंद्र व्हायला हवे. ग्रंथालय कर्मचारी नेहमी ग्रंथालयाचा विकास व ग्रंथालयीन नियमांचे पालन करणारा असायला हवा, तेव्हाच तो आपल्या पदाशी न्याय करू शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या