लेख -निवृत्तीनंतरची खरी ओळख

1023

>> राजेंद्र साळवी

आज आपण लॉक डाऊनमुळे तसंच जागतिक आर्थिक मंदीमुळे अचानक नोकरी गेल्यावर निवृत्तीनंतरचं आयुष्य कसं असेल त्याचा अनुभव घेत आहोत. आपण निवृत्तीनंतरच्या पैशांची व्यवस्था करतो, पण निवृत्तीनंतर काय करणार? या प्रश्नाचं ठाम उत्तर बऱ्य़ाच लोकांकडे नाही. वेळेचा सदुपयोग कसा करणार त्याची मानसिक तयारीही नाही.

आपण नोकरी करत असताना एक चाकोरीबद्ध आयुष्य जगत असतो. या काळात आपण 12-14 तास घराच्या बाहेर असतो. निवृत्तीनंतर अचानक 12-14 तासांची पोकळी निर्माण होते व ती कशी भरून काढायची हा मोठा यक्षप्रश्न उभा राहतो. निवृत्तीनंतर सुरुवातीचे एक-दोन महिने घरी कौतुक होतं, पण नंतर नंतर घरचेही कंटाळतात. कारण घरी बसून काही काम नसल्यामुळे सारखी भूक लागते किंवा चहा प्यावासा वाटतो. तेव्हा घरचे म्हणतात, ऑफिसमध्ये जात होते ते बरं होतं. हा त्रास तरी नव्हता. सकाळी डबा भरून दिलं की झालं. घराच्या बाहेर पडलो तर सोसायटीमधील लोक सुरुवातीला वेळ देतात, पण जेव्हा त्यांना कळतं की आपण निवृत्त आहोत त्यावेळी तेही आपल्याला टाळायला लागतात.

या सगळ्यांमुळे आपल्याला नैराश्य येते. आपली कोणाला गरज नाही. सगळे आपापल्या कामात व्यस्त आहेत आणि मीच रिकामटेकडा आहे, माझ्याकडे काहीच काम नाही असे वेगवेगळे विचार डोक्यात थैमान घालत असतात. मग आमची अर्धी लाकडे स्मशानात गेली, मुलाचं लग्न झालं किंवा नातवाचं तोंड बघितले की मग मी मरायला मोकळा अशी वाक्यं बोलायला सुरुवात होते आणि हे वाक्य आपण अनेकदा बोलतो. थोडक्यात आपला बायोलॉजिकल अलार्म सेट करतो.

अगदी तसंच खरोखरच मुलांचं लग्न किंवा नातवाचं तोंड बघितल्यावर ती व्यक्ती या जगात नसतेही. तर आयुष्य जगण्यासाठी काही तरी ध्येय पाहिजे, वेळेचं तसंच मानसिकदृष्टय़ा निवृत्ती नियोजन करणं गरजेचं कसं आहे ते आता आपण पाहू.

जसं शिक्षण संपल्यावर आयुष्याची 35 वर्ष (निवृत्ती वय 60 वर्ष व नोकरीची सुरूवात 25 व्या वर्षी) आपण काय करणार आहोत त्याची तयारी 15 -20 वर्ष आधी सुरुवात करुन त्याप्रमाणे शिक्षण घेतो. तसंच निवृत्तीनंतर पुढची अनेक वर्ष आपण काय करणार आहोत, त्याची तयारी निवृत्त होण्याच्या 15-20 वर्ष आधी करायची असते. म्हणजेच साधारण वयाच्या 40 व्या वर्षी सुरुवात करायची असते.

आपल्याला नेमकं काय करायचं आहे ते नीट विचार करून ठरवा. कारण ते तुमच्या आवडीचं काम असणार आहे. कदाचित तुम्हाला गाण्याची, वाद्य वाजवायची, समाजसेवेची, लिहिण्याची, पेंटिंगची इत्यादींची आवड असेल. ते एकदा पक्क ठरलं की त्याबद्दलची इत्थंभूत माहिती मिळवा. समजा तुम्हाला तबला वाजवायला शिकायचं आहे. तर त्यासाठी रोज तुम्ही थोडा थोडा वेळ द्यायला सुरुवात करा. सुरुवातीला 20-30 मिनिटे व सुट्टीच्या दिवशी 2-3 तास. नंतर हळूहळू हा वेळ वाढवत जा. असं करत असताना 15-20 वर्षाच्या सरावामुळे तुम्ही तबला वाजवण्यात मास्टर झाल्यावर एक वेळ अशी येईल की तुम्ही पूर्ण वेळ तेच करायचा निर्णय घ्याल. कारण तेव्हा ते तुमच्या आवडीचं काम असणार आहे. निवृत्तीपूर्वीच तुम्ही नोकरी सोडून द्याल. कारण तुम्हाला पैसे व समाधान मिळत असेल.

या परिस्थितीत तुमच्या समोर 12-14 तासांचं काय करायचं हा प्रश्नच उरत नाही. उलट तुम्हाला वेळ कमी पडेल एवढे तुम्ही व्यस्त राहाल. तुम्ही कधी म्हातारे होणार नाही कारण वय किती झाले याकडे लक्ष द्यायला तुमच्याकडे तेवढा वेळच नसेल. मानसिकदृष्ट्या कायम तरुण व आनंदी राहाल, तर अजून कोणी निवृत्ती नियोजन केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर सुरू करा व उर्वरित आयुष्य आपल्या मनासारखं, धमाल, मस्तीत व आनंदात जगा.

आपली प्रतिक्रिया द्या