
>> डॉ. अनिल कुलकर्णी
जिने के लिये सोचा ही न था दर्द संभालने होंगे… आयुष्याच्या पूर्वार्धात ज्यांनी कष्ट केले, अभ्यास केला, शिस्त बाळगली त्यांच्या जीवनात यश पायघडय़ा घालतं. दु:खांचे, संघर्षाचे चटके बसलेल्यांनीही यशश्री खेचून आणलेली आहे. दु:ख हा या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येकालाच दुःखाला, संघर्षाला सामोरे जावंच लागतं.
जगात प्रत्येकाला रडतच यावं लागतं, आपल्या येण्याने कुणाला तरी आनंद होतो, कोणाला दुःख होतं. जाणीव व्हायला लागली की, दुःखाचा पारा आपोआप चढायला लागतो. आयुष्य म्हणजे जाणिवांचा व नेणिवांचा खेळ आहे. जाणिवा असणाऱयांना दुःखाचं बोट धरावंच लागतं. जाणिवा बोथट असणाऱयांना दुःख म्हणजे मनोरंजन वाटतं. कॅमेऱयाने दुःख टिपणे व व्हायरल करणे या श्रेय घेण्याच्या गोष्टी झाल्या आहेत.
दुःख सांभाळलं की, माणूस तावून सुलाखून तयार होतो. दुःख, संघर्ष, दारिद्रय़ नकोच असा एक तरुण वर्ग तयार होत आहे व व्यसनाधीन होत आहे. नको त्या वयात नको त्या गोष्टी काही मुले करत आहेत व नैराश्याच्या खाईत स्वतला लोटत आहेत. मोबाइलच्या कुशीत झोपणारी मुले निपिय होत आहेत.
लहानपण देगा देवा ही अनुभूती प्रत्येकाला एका टप्प्यावर आवश्यक वाटते. लहानपण जसजसं सरत जातं व आकलनाचा ग्राफ जसजसा वाढत जातो तसतशी दुःखाची जाणीव व्हायला लागते. जीवनात आनंद इंद्रधनुष्यासारखा मिळतोच, पण सोबत दुःखाला घ्यावंच लागतं. सूर्योदय आणि सूर्यास्त जसं आपलं अस्तित्व दाखवून देतात तसंच सुख आणि दुःख आपलं अस्तित्व जाणवून देतात.
काही मूल्यं अंगीकारायलाच हवीत, नाहीतर दर्दभरी दास्तान ठरलेली. काही पालक जेव्हा आपल्या पाल्याचा गृहपाठ, त्याला शिक्षा मिळू नये म्हणून करतात तेव्हा तात्पुरती वेळ निभावली जाते, पण पालक त्याला श्रम प्रतिष्ठा, संघर्ष यापासून दूर लोटतात. मुलांच्या समोर शिक्षणासाठी नदी पार करून शिकायला जाणारे लालबहादूर यायला हवेत, दिव्याच्या खाली अभ्यास करणारे आगरकर, माशेलकर यायला हवेत. उंबरठय़ाबाहेर राहूनही शिकणारे आंबेडकर यायला हवेत, स्वच्छतेसाठी गाडगेबाबा यायला हवेत. पूर्वी काही माणसे मूल्यांसाठी ओळखली जायची. आताची माणसे मुलांसाठी पालकांनी काय केले यावरून ओळखली जातात.
मुलांना शाळेत ने-आण करणे, त्यांचे गृहपाठ करणे, मुलांचे लाड करणे, महागडी खेळणी आणून देणे. मुलांचा शब्द खाली न पडू देणारे पालक त्यांना कोणत्याच संघर्षाला तोंड देण्यास तयार करत नाहीत. समाजात राहिल्याने, वावरल्याने समायोजन म्हणजे काय ते मुलांना कळतं.
काही कुटुंबांत मुलांना कोणतीच कामे करू दिली जात नाहीत. एकतर त्यांना जमत नाही म्हणून किंवा पालक स्वतच सर्व कामे करतात. त्यामुळे कुटुंबात श्रम प्रतिष्ठा रुजतच नाही. हे एक मूल्य आहे याचा विसर अनेकांना पडतो. काही मूल्यं कुटुंबात, काही शाळेत, काही समाजात रुजायलाच हवीत. आज मूल्यं पुस्तकात बंदिस्त झाली आहेत.
मुले पुस्तकही पाहत नाहीत व पुस्तकांच्या पलीकडेही पाहत नाहीत. पुस्तके पाहिली तरीही फक्त परीक्षेसाठीच पाहतात. वाचनच नाही. त्यामुळे अवांतर वाचनाचा प्रश्नच येत नाही. वळण, शिस्त या भागाला कुटुंबातूनच सुरुवात होते व शाळेत ते वृद्धिंगत होतं. आपल्या मुलांना सगळं जमायला हवं असा दृष्टिकोन पालकांचा असायला हवा. मुलांच्या अभ्यासाचं वेळापत्रक शाळा करते, पण मुलांच्या ध्यासाचं वेळापत्रक कुटुंबाला करायचं असतं. मुलांनी कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यायचा व कोणत्या गोष्टीचा अभ्यास करायचा याचं बीज कुटुंबातच रोवलं जायला हवं.
बाहेर खाण्याचे प्रस्थ वाढल्यामुळे मुलांना पौष्टिक व सकस आहार मिळत नाही. चुकीचा व पौष्टिक नसलेला आहार अनेक मुले खात आहेत. कशामध्ये प्रोटिन आहे, कशामध्ये कार्बोहायड्रेट, जीवनसत्त्वे यांची जाणीव लहानपणापासून झाली तर भविष्यात होणाऱया आरोग्याच्या समस्या उद्भवणार नाहीत. मुलांना शिकवणे याचबरोबर आरोग्याच्या सवयी लावणेही खूप आवश्यक आहे.
प्रत्येक मुलाला कॅलरी कॉन्शस बनवणेसुद्धा पालकांचे कर्तव्य आहे. अनेक मुलांची आज स्थूलपणा ही समस्या आहे. सेलिब्रेशनच्या कल्पनाच मुळात मुलांवर चुकून थोपविल्या जात आहेत. गोड खाणे, मनोरंजनासाठी अश्लील हावभावांची गाणी म्हणणे व त्यावर नृत्य करणे हे कुठेतरी थांबायला हवं. प्रत्येक आई कामाच्या धावपळीत आज श्यामची आई होऊ शकत नाही. कुटुंब, शाळा, समाज यांचीही काही जबाबदारी आहे.
संघर्षातच माणसे घडली आहेत हा इतिहास आहे. संघर्ष झेलला की, नंतरचा हर्ष आपला असतो. व्यक्तिमत्त्व हे तावून सुलाखूनच घडतं, नुसतं सुखावून घडत नाही.



























































