वाटते एकटे तेव्हा…

58

>> दिलीप जोशी
[email protected]

प्रत्येक माणूस विचारवंत नसला तरी विचारशील असतोच. आपापल्या कुवतीनुसार, जीवनानुभवानुसार माणसं विचार करतात आणि आपल्या जवळच्या माणसांपाशी तो व्यक्तही करतात. मनातली गोष्ट इतरांकडे व्यक्त होण्याचा सोपा मार्ग म्हणजे अर्थातच बोलणे. जगातली प्रत्येक व्यक्ती मातृभाषेत बोलते. हजारो बोलीभाषा अब्जावधी माणसांचा संवाद क्षणोक्षणी घडवत असतात. घरात चाललेल्या कौटुंबिक गप्पा, पारावरच्या गावगप्पा किंवा सभा-संमेलनातील विचार, राजकीय नेत्यांची खलबतं हे सारं भाषेच्याच माध्यमातून चालते. आयुष्याच्या प्रवासात बालपणापासून आपल्याला भेटलेल्या, आपल्यापाशी चार शब्द बोललेल्या माणसांची मोजदाद करायची तर कठीण होईल. सार्वजनिक जीवनात असणाऱ्यांना तर रोजच शेकडो माणसं भेटत असतात. ऑरिस्टॉटल म्हणतो ते खरंच. माणूस समाजशील प्राणी आहे.

काही वन्य प्राण्यांप्रमाणे तो गुहेत एकटाच राहू शकत नाही. अर्थात प्राणीही कळपाने आणि पक्षी थव्याने वावरतातच म्हणा. पण माणसाची व्यक्त होण्याची भूक प्रचंड असते. बालपणापासून नित्यनवीन शिकत आपण हळूहळू आपलं व्यक्तिमत्त्व विकसित करतो आणि त्यानुसारच व्यक्त होतो.सतत माणसांत रमणारे, गप्पांचे फड रंगवणारे, हसून खेळून व्यक्त होणारे तुलनेने अधिक मजेत राहतात. ज्यांच्या वाटय़ाला असा मनमोकळेपणा परिस्थितीमुळे येत नाही त्यांचं दुःख तेच जाणे, परंतु काही वेळा माणसं समूहातही एकाकी असतात. आपल्या आसपास चाललेल्या पठडीतल्या गोष्टीत ती भाग घेतात. उपचार किंवा कर्तव्य म्हणून नित्यकर्म करीतच राहतात, पण मनाचा एक कोपरा कायम रिकामा असतो. एकप्रकारचं रितेपण तिथे भरून राहतं. ‘आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे’ असं लिहिणाऱ्या बालकवींची कविता किती निसर्गाशी एकरूप झालेली आणि प्रसन्न करणारी, पण त्याच बालकवींना ‘कोठूनि येते मला कळेना उदासीनता ही हृदयाला, काय बोचते काही कळेना हृदयाच्या अंतर्हृदयाला’ असं का बरं लिहावंसं वाटलं असेल? सांगता येत नाही. कदाचित कवी अनेक भावना काव्यातून व्यक्त करतो तसाच हाही एक आविष्कार.

काही वेळा मात्र माणसं विलक्षण एकाकी असतात. तशी ती असल्याचं अनेकदा समजतही नाही. माझ्या परिचयाचे एक गृहस्थ बऱ्याच वर्षांनी भेटले. मुलं परदेशात, यांचेही तिथे दौरे झालेले, आर्थिक स्थिती उत्तम. म्हटलं ‘काय मजेत ना?’ ते उत्तरले, ‘मजेतच म्हणायचं!’ म्हणायचं? म्हणजे मजेत नाही? पण विचारणार कसं. मग तेच सांगू लागले, ‘निवृत्तीनंतर मजेतच काळ जाणार असं मलाही वाटत होतं. तशी कोणती विवंचना नाहीच. अधेमधे मुलांकडे जाऊन येतो. तीही येतात, पण जो तो आपल्या विश्वात गुंतलेला. जंक्शनवर दोन गाड्य़ांची व्हावी तशी भेट होते. कधी कधी या साऱ्या पसाऱ्यात असूनही खूप एकटं वाटतं.’ मी ऐकलं आणि नंतर त्यावर बराच विचार केला. उतारवयात असं एखाद्याला वाटू शकतं, पण त्या गृहस्थाला वाचन किंवा एखाद्या संस्थेसाठी काम करणं अथवा आणखी काही विरंगुळा नव्हता का? ‘नाही हो. सगळं सरधोपट आयुष्य. नोकरी एके नोकरी. आता नव्याने कुठले छंद जोपासणार?’ अनेकांची अशी अवस्था होत असेल, पण निवृत्तीनंतर शास्त्रीय संगीत शिकलेली किंवा चक्क तरुणांबरोबर गिरीभ्रमणाला जाणारी मंडळीही मला ठाऊक आहेत. त्यांना एकटेपणाचा प्रश्न कधी पडलेला नाही. अर्थात हे ज्याच्या त्याच्या मानसिक धाटणीवर (माइंड सेट) अवलंबून आहे.

एकदा खगोलशास्त्राच्या अभ्यासक्रमात प्रेक्षकांना ‘आकाशदर्शन’ घडवण्याचं काम माझ्याकडे आलं. मंडळी होती परदेशी. त्यातही नॉर्वेसारख्या उत्तर ध्रुवीय देशातली. त्यामुळे त्यांना आपल्याकडून दिसणारं स्वच्छ, चमचमतं तारांगण मोहून टाकत होतं. मृग नक्षत्रातला काक्षी (बिटलग्युन) हा लालसर तारा दाखवताना मी म्हटलं की ताऱ्यांच्या जीवनक्रमात हा मृत्युपंथाला लागलेला तारा आहे… आणि ते ऐकताच एक सोळा-सतरा वर्षांची मुलगी डोळ्य़ांत पाणी आणून बोलली, ‘प्लीज असं म्हणू नका. आय लव्ह हिम!’ मी अवाक झालो. या ताऱ्याचं असं वर्णन मी अनेक वर्षे करीत होतो, पण अशी प्रतिक्रिया प्रथमच येत होती. मग तिच्या वडिलांनी मला सांगितलं की, ‘काही कारणाने तिला एकाकी वाटतं. आकाशदर्शनात ती आनंद मिळविते आणि ‘काक्षी’ ताऱ्यावर ‘प्रेम’ करते. नॉर्वेसारख्या देशात कुणाला एकाकी वाटलं तर तिथे लोकसंख्याच फार विरळ आहे. वस्तीतली माणसंही मोजकीच, पण ‘एकाकी’पण कुठेही येऊ शकतं. इंग्लंडमध्ये सुमारे ११ लाख लोकांनी आपण ‘लोन्ली’ (एकाकी)असल्याचं नोंदवलंय. अशांसाठी एका हॉटेलने ‘चॅटर ऍण्ड नॅटर टेबल’ अशी अभिनव योजना राबवलीय. तिथे कॉफी घेताना कुणी तरी तुमच्याशी गप्पा मारतं आणि एकाकीपणा हलकं करतं… आपल्याकडे परंपरेने हे काम गावातल्या झाडांचे पार करायचे. ‘कुठे निघालात? या बसा पाच मिनिटं’ म्हणत तासाभराच्या गप्पा मनं हलकीफुलकी करायच्या. गमावतो आहोत का आपण हे सारं?

आपली प्रतिक्रिया द्या