
>> दिलीप प्रभाकर गडकरी
आषाढाचा पहिला दिवस कविकुलगुरू कालिदास यांचा स्मृतिदिन म्हणून सर्वत्र पाळला जातो. हा दिवस संस्कृत दिन म्हणूनही साजरा केला जातो. उद्यापासून (30 जून) आषाढ मासारंभ सुरू होत आहे. श्रेष्ठ महाकवी कालिदास इ.स. चौथ्या शतकाच्या उत्तरार्धात आणि पाचव्या शतकाच्या आरंभीच्या कालखंडात होऊन गेल्याचे मानले जाते. त्यांच्या साहित्यातून उज्जैन शहराविषयी उत्कट प्रेम व्यक्त केले असल्यामुळे त्यांचे वास्तव्य उज्जैन येथे असावे असे मानतात. काही पंडित त्याला कश्मीरचा निवासी मानतात.
कालिदासाच्या जीवनाबद्दल बऱ्याच दंतकथा प्रचलित आहेत. कालिदास हा सुरूप, सुदृढ आणि बुद्धिमान मुलगा होता. त्याचे आई – वडील लहानपणी निवर्तल्यामुळे त्याचे पालनपोषण एका गवळ्याने केले. जवळच्या नगरीतील एका राजकन्येचे लग्न तेथील प्रधानाने कपट करून कालिदासाशी लावून दिले. पुढे त्या राजकन्येने आपल्या मूर्ख पतीची निर्भर्त्सना करून त्याला कालीदेवीची उपासना करण्यासाठी पाठवले. कालीदेवीची उपासना केल्यामुळे त्याला ‘कालिदास’ हे नाव मिळाले. कालीदेवीच्या भक्तीमुळे त्याला कवित्व व विद्वत्व याची प्राप्ती झाली. ‘रघुवंश’ व ‘कुमारसंभव’ ही महाकाव्ये, ‘ऋतुसंहार’ व ‘मेघदूत’ ही खंडकाव्ये आणि ‘मालविकाग्निमित्र’, ‘विक्रमोर्वशील’ व ‘अभिज्ञान शाकुंतल’ ही नाटके कालिदासाने लिहिली. कालिदासाच्या या कलाकृती अत्यंत प्रसिद्ध असून त्याचे हे ग्रंथ संस्कृत साहित्याची भूषणे आहेत.
हिंदुस्थानी टीकाकारांनी ‘रघुवंश’ हे कालिदासाचे सर्वोत्कृष्ट काव्य मानले, तर ‘शाकुंतल’ हे सर्वश्रेष्ठ नाटक मानले आहे. निसर्गचित्रण हे कालिदासाचे महत्त्वाचे वैशिष्टय़ होय. त्याची निसर्गवर्णने सूक्ष्म सौंदर्यदृष्टीची द्योतक आहेत. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत इ. प्राचीन साहित्य, ‘षड्दर्शने’ इतर विविध शास्त्रे ,संगीत, नृत्य, चित्र इ. ललित कला यांचे उल्लेख त्यांच्या साहित्यातून आढळतात. राज्य शासन, व्याकरण यांची कालिदासाला सूक्ष्म माहिती होती. विद्वानांच्या मते कालिदास विनोदी, विनयसंपन्न, निरलस आणी वत्सल असावा. महाकवी कालिदास यांस जागतिक कीर्ती लाभली. त्याच्या वाङ्मयातला निसर्ग ही तर चिरंतन शोभायात्रा आहे. सहा ऋतूंचे सहा सोहळे कसे अनुभवावेत हे कालिदास सांगतो. कालिदासाच्या चरित्रावरून लक्षात येतं की, तो एक भटक्या कवी होता. त्याने प्रवासातून निसर्गाशी अद्वैत साधलं असावं. कालिदासाच्या काव्यात तत्त्वज्ञानाचा खजिना आहे. म्हणूनच त्याचे वाङ्मय दीड हजार वर्षांनंतरही आवडीने वाचतात. दीड हजार वर्षांपूर्वी जरी कालिदास आपल्यातून निघून गेला असला तरी वाङ्मयरूपाने अजरामर झाला आहे.



























































