शैलगृहांच्या विश्वात – लयनकथा

>> डॉ. मंजिरी भालेराव

प्राचीन भारतीय शिल्पकला व स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे लेणी स्थापत्य. प्राचीन भारतात मौर्य व शुंग राजवटीत उदयास आलेल्या या स्थापत्यकलेतील स्थित्यंतराचा मागोवा घेणारे सदर.

शैलगृह म्हणजे डोंगरामध्ये असलेले घर. डोंगरातील नैसर्गिक गुहांचा वापर राहण्यासाठी करण्याची परंपरा भारतात प्रागैतिहासिक काळापासून दिसून येते. माणसाने राहण्यासाठी निवारा म्हणून डोंगरात असणाऱया गुहा तसेच शैलाश्रय यामध्ये बराच काळ वास्तव्य केले. काळाच्या ओघात इतिहासपूर्व काळात आणि ऐतिहासिक काळात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे अनेक प्रकारच्या, आकाराच्या इमारती बांधल्या गेल्या. बांधीव स्थापत्यामध्ये मानवाने बरीच तांत्रिक प्रगती केली. मातीची, लाकडाची, विटांची, दगडाची अशी अनेक प्रकारची घरे बांधली. कालांतराने भारतात श्रमण परंपरा निर्माण झाली आणि लोकप्रिय झाली. सुरुवातीला हे श्रमण झाडाखाली किंवा उद्यानात राहत असत. जैन आणि बौद्ध परंपरांमध्ये एका गावात त्यांना फक्त एक-दोन दिवसच राहायची परवानगी होती. सतत निरनिराळ्या गावात जाऊन तेथील लोकांना आपापल्या संप्रदायांची तत्त्वे सांगून धर्मप्रसार करणे हेच त्यांचे कर्तव्य होते. पावसाळ्यात म्हणजे वर्षावासात ते एकाच गावात किंवा गावाजवळील उद्यानात सलग तीन-चार महिने राहू शकत. झाडाखाली राहून भिक्षू भिजत असत. त्यामुळे त्यांना झोपडीवजा घरे बांधून देण्याचे पुण्यकर्म अनेक गृहस्थाश्रमी उपासक करत असत, पण पावसाळा संपल्यानंतर जेव्हा ती राहण्याची स्थळे वापरात नसत त्या वेळेस त्यांची अवस्था खूप खराब होत असे. ती मोडकळीला येत असत. दर पावसळ्यात त्यांची डागडुजी किंवा पुनर्बांधणी करायची वेळ येत असे. या प्रत्येक वेळेस गृहस्थाश्रमी उपासक आर्थिक मदत करत असत.

प्राचीन भारतात नेहमी समूहाने प्रवास होत असे. या समूहामध्ये अनेक प्रकारचे प्रवासी असत, ज्यांना एका गावाहून दुसऱया गावाला जायचे असे. रस्त्यात येऊ शकणाऱया संकटांमुळे नेहमी सगळे जण एकत्र प्रवास करायचे. अशा समूहाच्या प्रमुखाला सार्थवाह असे म्हटले जायचे. बऱयाचदा या समूहाबरोबर सशस्त्र सैनिकांची तुकडीही असे. ज्यायोगे जर यांच्यावर कोणी हल्ला केला तर त्यांचे संरक्षण होत असे. या प्रवासात अनेक धर्मांचे आणि संप्रदायांचे धर्मप्रसारासाठी बाहेर पडलेले भिक्षू, श्रमण, परिव्राजक हेही असायचे. सर्व जण प्रवासात त्यांच्या त्यांच्या तत्त्वांची माहिती बरोबरच्या प्रवाशांना देत असत. यामध्ये समाजातील श्रीमंत, पण जातीच्या उतरंडीवर तिसऱया क्रमांकावर असलेले व्यापारी किंवा चौथ्या क्रमांकावर असलेले अनेक कारागीर असत. जेव्हा ते या धर्माप्रचारकांची व्याख्याने ऐकत तेव्हा त्यांना या श्रमण परंपरेतील मानवतावादी तत्त्वांची ओळख होत असे. तेव्हा साहजिकच ते या नवीन विचारांकडे आकर्षित होत असत. अशा प्रकारे बौद्ध आणि जैन धर्माकडे खूप मोठय़ा प्रमाणावर व्यापारी वर्ग आणि कारागीर आकर्षित झाले. त्यांनी त्या धर्मांमध्ये प्रवेश केला. त्याचबरोबर गृहस्थाश्रमात राहून या नवीन धर्माला दाने देऊन त्यांनी मोठय़ा प्रमाणावर पुण्यही कमावले. या दानामध्ये मोठय़ा प्रमाणावर संघासाठी वर्षाकालीन निवासासाठी विहार किंवा संघाराम बांधणे याचाही समावेश होता. काळाच्या ओघात या वर्षाकालीन निवासामध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे वर्षभर भिक्षू निवास करू लागले.

व्यापारी मार्गांवर आणि व्यापारी केंद्रांच्या जवळ ही निवासस्थाने असल्यामुळे वेळप्रसंगी काही प्रवाशांना विविध प्रकारची मदत हे भिक्षू करत असावेत असा कयास आहे. त्या मदतीच्या बदल्यात हे प्रवासी भिक्षू संघाला निरनिराळ्या गोष्टींसाठी दान देत असत. खुद्द गौतम बुद्धांच्याच हयातीत अशा प्रकारचे विहार, संघाराम बांधायला सुरुवात झाली होती. त्याच्या निर्वाणानंतर त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ तसेच महत्त्वाच्या बौद्ध भिक्षूंच्या अस्थींवर स्तूप उभारले गेले. जेव्हा हे स्तूप   एखाद्या इमारतीत असत तेव्हा त्या इमारतींना चैत्यगृह म्हणत. अशी चैत्यगृहे आणि विहार भारतभर बांधले गेले. दगड, विटा, माती आणि लाकूड यांच्या सहाय्याने या इमारती बांधल्या जायच्या, पण भारताच्या काही भागांमध्ये उपलब्ध असलेला खडक पाहून आणि परिसरातील नैसर्गिक गुहांकडे पाहून कधीतरी कृत्रिमरीत्या गुहा तयार करण्याचा विचार मानवाच्या मनात आला असावा आणि हा प्रयोग यशस्वीही झाला असावा. साधारणपणे इ.स. पूर्व 9वे ते 8 वे शतक या काळात महापाषाणयुगीन लोकांनी असे काही प्रयोग केल्याचे पुरावे आपल्याला महाराष्ट्र आणि इतर काही राज्यांत आढळतात.

कदाचित या यशस्वी प्रयोगानंतर अशा प्रकारची मानवनिर्मित गुंफा तयार करण्याची पद्धत अतिशय लोकप्रिय झाली असावी. भारतातील निश्चितपणे काल ठरवता येईल अशा सर्वात प्राचीन गुहा सम्राट अशोकाच्या काळातील म्हणजे इ.स. पूर्व तिसऱया शतकातील आहेत असे जरी आपण समजत असलो तरी ज्यांचा निश्चितपणे काळ ठरवता येत नाही अशा अनेक गुहा याच्याही पूर्वीच्या असू शकतात हे आपण मान्य केले पाहिजे.

सुरुवातीला जरी अवघड वाटले तरी एकदा का हा प्रस्तर निवास तयार झाला की, त्यामध्ये कोणतीही दुरुस्ती, डागडुजी करायची गरज पडणार नाही याची शाश्वती होती. त्यामुळे भारतातील सर्वधर्मीय भक्तांनी त्यांच्या त्यांच्या धर्म अनुयायांच्या सोयीसाठी शेकडो गुंफा तयार केल्या. त्यामध्ये ते निवास करत असत म्हणून त्यांना ‘लयन’ (राहण्यासाठीचे स्थान) किंवा ‘लेणे’ असे म्हटले गेले. डोंगरात कोरले असल्याने त्याला ‘शैलगृह’ म्हणजे ‘दगडातील घर’ असेही संबोधले गेले. या प्रस्तरातील निवासांमध्ये ज्याने दान दिले असायचे त्याचा ते दान नोंदवलेला कोरीव लेख तयार केला जायचा. अशा प्रकारचे अनेक लेख आपल्याला या शैलगृहांमध्ये दिसतात. त्यामध्ये ‘सेलघर’ (शैलगृह), ‘कुभा’ (गुंफा), ‘लयन’ असे ‘दगडात कोरलेले घर’ अशा आशयाचे शब्द येतात, तर काही लेखांमध्ये ‘चेतीयघर’ (चैत्यगृह), ‘संघाराम’ (संघासाठी केलेली निवासस्थाने), ‘पोढी’ (पाण्याचे टाके), ‘कोढी’ (कोनाडा) इ. असे अनेक शब्द येतात.

‘शैलगृहाच्या विश्वात’ या आजपासून सुरू होणाऱया लेखमालेत आपण भारतातील प्रमुख शैलगृहांची तोंड ओळख करून घेणार आहोत. तसेच ही शैलगृहे कुठे आहेत, ती कोणी तयार केली, कोणासाठी तयार केली, कधी तयार केली, त्यामध्ये असणारी शिल्पं आणि चित्रं काय सांगतात, या वास्तू आणि शिल्पांच्या निर्मितीमागच्या नेमक्या प्रेरणा काय होत्या, त्यांचे उपयोजन कसे झाले असावे या आणि अशा अनेक मुद्दय़ांची पुढील काही लेखांमध्ये चर्चा करणार आहोत.

(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या अध्ययन केंद्राच्या विभागप्रमुख आहेत.)

[email protected]