
>> अस्मिता येंडे
‘महाराष्ट्र’ हा शब्द जरी उच्चारला तरी त्याची ऐतिहासिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी डोळ्यांसमोर येते. डोंगरदऱया, कडेकपारी, समुद्रकिनारे, लेणी, मंदिरे, ऐतिहासिक वास्तू, गडकिल्ले, घाट, निखळ पाण्याचे प्रवाह, ऐतिहासिक काळाची साक्ष देणाऱया खुणा, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, देवस्थाने अशा विविधतेने साकारलेल्या महाराष्ट्राची प्रतिभा या निसर्गसौंदर्यामुळे आणि संस्कृतीमुळे अधिक उठून दिसते. नवीन पिढीलाही हे महाराष्ट्राचे वैभव माहीत व्हावे यासाठी लेखक, चित्रकार आणि भटकंतीचा मनमुराद आनंद लुटणारे रामदास खरे घेऊन आले आहेत नवेकोरे पुस्तक ‘स्मरण महाराष्ट्राचे…निमित्त भटकंतीचे.’
गेल्या 40 वर्षांत विविध कारणांमुळे त्यांनी महाराष्ट्रातील विविध स्थळांना भेटी दिल्या. त्या स्थळांची माहिती, स्थळांची भौगोलिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक माहिती, तेथील आख्यायिका, आजूबाजूच्या ठिकाणांची माहिती या माहितीपर पुस्तकात त्यांनी दिलेली आहे. एकूण 112 लेखांतून महत्त्वपूर्ण ठिकाणे त्यांनी या पुस्तकाद्वारे प्रकाशझोतात आणली आहेत.
लेखांची रचना आटोपशीर असून अगदी नेमक्या शब्दांत मुद्देसूद आणि मार्गदर्शनपर, वैशिष्टय़पूर्ण माहिती या पुस्तकाच्या माध्यमातून लेखकाने दिलेली आहे. पुस्तकात वास्तू, किल्ले, वास्तुशिल्प, कातळशिल्प, निसर्गरम्य ठिकाणे, मंदिरे, नदीची उगमस्थाने, घाट, तलाव, समुद्रकिनारे, राजवाडे, ऐतिहासिक वास्तू, साहित्यिक, सांस्कृतिक वारसा लाभलेल्या वास्तू इत्यादी माहिती देताना त्याविषयी रूढ असणाऱया दंतकथा, आख्यायिकाही लेखक सांगतात. पुस्तक वाचताना एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे यातील बरीचशी ठिकाणे आपल्याला माहीत नाहीत. त्या ठिकाणांचे अस्तित्व हळूहळू लुप्त होत चालल्याने कदाचित ही स्थळे लोकांना स्मरणात नाहीत. असा ऐतिहासिक वारसा न जपल्यामुळे, तिकडे दुर्लक्ष केल्यामुळे मंदिर, गडकिल्ल्यांची दुरवस्था झालेली आहे. अशाने हे वैभव पुढील पिढीला दाखविण्यासाठी उरेल का? ही खंत लेखकाने लेखातून व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र पर्यटनाच्या दृष्टिने किती व्यापक आणि वैभवशाली आहे याची परिपूर्ण प्रचीती रामदास खरे यांनी दिली आहे. एखाद्या वाटाडय़ाप्रमाणे तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करेल.
स्मरण महाराष्ट्राचे…निमित्त भटकंतीचे
लेखसंग्रह / लेखक ः रामदास खरे
प्रकाशक ः अनघा प्रकाशन मूल्य ः 360 रुपये