परीक्षण- फुले दाम्पत्याच्या दत्तकपुत्रावर प्रकाशझोत

>> श्रीकांत आंब्रे

महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचे अभ्यासक व संशोधक राजाराम सूर्यवंशी यांनी फुले दाम्पत्याचे दत्तकपुत्र डॉ. यशवंतराव जोतीराव फुले यांचे चरित्र लिहून एक अनाथ बालक ते समाजक्रांतिकारक असा प्रवास करणाऱया उच्चविद्याविभूषित कर्तव्यदक्ष सुपुत्राची संघर्षगाथा प्रभावीपणे साकार केली आहे. महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे महत्त्व आणि त्याची महती जगाला ठाऊक आहे, पण त्या पार्श्वभूमीवर झाकोळल्या गेलेल्या डॉ. यशवंतराव जोतीराव फुले यांच्या कर्तृत्वाविषयी फारशी माहिती आजही कुणाला नाही, हे खरे आहे. आपले सारे आयुष्य समाजाच्या भल्यासाठी वेचणाऱया या दाम्पत्याच्या जीवनाचा शेवट मात्र दु:खदायक घटनांनी भरलेला होता आणि त्याला अमानवी जाती बहिष्कार हे एक प्रमुख कारण होते. त्या दोघांबरोबरच मुळात अनाथ असलेल्या त्यांच्या दत्तकपुत्राच्या वाटय़ाला काय भोग आले आणि त्याला तोंड देत संघर्ष करताना त्याच्या पत्नीची, मुलांची नातवंडांची-पतवंडांचीही कशी परखड झाली याचे वेदनादायी चित्रण डा. यशवंतराव जोतीराव फुले यांच्या चरित्रातून पाहायला मिळते.

वाट चुकलेल्या विधवांच्या आत्महत्या व नवजात, निष्पाप अर्भकांचे बळी रोखण्यासाठी जोतीराव आणि सावित्रीबाई फुले यांनी 28 जानेवारी 1863 रोजी आपल्या राहत्या घरी बालहत्या प्रतिबंधक गृह व प्रसूतिगृहाची स्थापना केली. भारतातील हा पहिला प्रयोग होता. याच प्रसूतिगृहात काशीबाई या ब्राह्मण बालविधवेने गोंडस बालकाला जन्म दिला व या बालकाचा स्वत:चा पुत्र म्हणून सांभाळ करा, असे सांगत सावित्रीबाईंच्या ओटीत ते मूल टाकून ती निघून गेली. याच पुत्राचा सांभाळ त्याला दत्तक घेऊन फुले दाम्पत्याने केला. त्यामुळे सारा माळी समाज व भाऊबंद फुले दाम्पत्याच्या विरोधात गेले. फुले दाम्पत्याने ‘यशवंत’ असे या मुलाचे नामकरण केले. याच यशवंतने महात्मा फुले यांच्या समाजकार्याची प्रेरणा घेऊन ते कार्य आपल्या परीने पुढे नेण्याचा प्रयत्न केला. चांगले शिक्षण घेतले. डाक्टर झाला व महात्मा फुले यांच्या निधनानंतर आई सावित्रीबाईंच्या खांद्याला खांदा देऊन समाजसेवेसाठी सिद्ध झाला. त्याच्या कर्तृत्वाची, समाजाकडून झालेल्या अवहेलनेची, पितृ आणि मातृछत्र हरपल्यानंतर त्याच्या एकाकी झुंजीची आणि त्याच्या अज्ञात अखेरीची ही कहाणी सुन्न करणारी आहे. राजाराम सूर्यवंशी यांनी अनेक पुरावे मिळवून लिहिलेले डा. यशवंतरावांचे चरित्र त्याच्या कर्तृत्वाबरोबरच समाजात त्यांच्या व फुले दाम्पत्यांच्या ससेहोलपटीची, महात्मा फुले यांना शारीरिक विकलांगतेमुळे आलेल्या हतबलतेची आणि जोतीरावांच्या निधनानंतर या मायलेकरांवर माळी जातिबांधवांनी टाकलेल्या बहिष्काराची ही कहाणी मन हेलावणारी आहे. हे चरित्र लिहिण्यासाठी राजाराम सूर्यवंशी यांनी घेतलेले परिश्रम जाणवतात. डा. यशवंत यांच्या जन्मापासून ते परागंदा होईपर्यंत त्यांची मिळेल ती माहिती छायाचित्रांसह मिळवली व हे चरित्र सिद्ध केले.

महात्मा जोतीरावांच्या निधनानंतर सावित्रीबाईंवर कोसळलेली दारिद्रय़ाची कुऱहाड,  त्यांच्या असहाय्य स्थितीची कल्पना देते. समाजबांधव करत असलेली निर्भर्त्सना, वेळोवेळी केला जाणारा अपमान यामुळे खचलेल्या सावित्रीबाईंचे जीवन प्लेगच्या साथीने संपविले. त्यानंतर यशवंताच्या कुटुंबावरही दारुण परिस्थिती कोसळली. त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी त्या परिस्थितीला सामोरे जात कशी झुंज दिली याचे हृद्य आणि प्रभावी चित्रण राजाराम सूर्यवंशी यांनी केले आहे.

अगदी साध्या सोप्या, प्रवाही भाषेत त्यांनी हे चरित्र लिहिले आहे. त्यावरून फुले कुटुंबांच्या बऱयाच अनोख्या बाबींवरही प्रकाश पडेल. एखाद्या कादंबरीइतकेच हे चरित्र उत्कंठामय आहे. डा. यशवंतराव यांच्या जीवनातील महत्त्वाचे टप्पे त्यांनी साधार वर्णिले आहेत. एकीकडे हितसंबंधी राजकारणी व समाजकारण्यांकडून महात्मा फुले, सावित्रीबाईंचा दिखाऊ उदो उदो होत असला तरी त्याच वेळी महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचे विचारकार्य व त्यांच्या वारसांकडे दुर्लक्ष केले जात आहे, ही वस्तुस्थिती असल्याचे चरित्रकार राजाराम सूर्यवंशी यांचे म्हणणे आहे. महात्मा फुले व सावित्रीबाई यांच्या सत्कर्माची फळे एकीकडे संपूर्ण देश चाखत असताना त्यांचे वंशज नेमके त्यापासून वंचित का राहावेत व प्रायश्चित्त फक्त त्यांच्या वाटय़ाला का यावे अशी विचारणा ते करतात. संदर्भासाठी त्यांनी फुले घराण्याच्या वंशावळीसह यशवंतराव फुले यांच्या मुलीकडील होले घराण्याची वंशावळ तसेच सावित्रीबाईंचे माहेर असलेल्या नायगाव येथील ‘नेवसे-पाटील’ घराण्याची वंशावळही अभ्यासकांच्या सोयीसाठी दिली आहे.

डा. यशवंत फुले यांच्या जीवनचरित्रावर राजाराम सूर्यवंशी यांनी टाकलेला प्रकाशझोत उद्बोधक असून त्यामुळे आजपर्यंत समाजाला माहीत नसलेल्या अनेक गोष्टींची उकल होऊ शकेल.

डॉ. यशवंतराव जोतीराव फुले यांचे चरित्र

लेखक : राजाराम सूर्यवंशी

प्रकाशक : नागनालंदा प्रकाशन, जि. सांगली

 पृष्ठे : 222, मूल्य रु. 270/-