लेख – संक्रमण…!

1191

>> दिलीप जोशी 

यावर्षीची मकरसंक्रांत उद्या म्हणजे 15 जानेवारीला आहे. एरवी वर्षानुवर्षे ती 14 जानेवारीला असते असंच आपण मानतो आणि ते खरंही आहे. पृथ्वीची सूर्याभोवतीची वर्षभराची परिक्रमा तीनशे पासष्ट दिवसांत पूर्ण होते आणि त्यामुळे सूर्याचं विशिष्ट तारकासमूहांच्या पार्श्वभूमीवर दिसणारं चलन बारा राशींपैकी एका राशीत दिसतं. जानेवारीमध्ये तो 14 किंवा 15 तारखेला मकर राशीच्या पार्श्वभूमीवर दिसू लागतो. वास्तविक सूर्य स्थिरच आहे. पृथ्वीच्या स्वतःभोवती आणि सूर्याभोवतीच्या फिरण्यानेच ज्ञानेश्वर म्हणतात त्याप्रमाणे ‘जैसे सूर्याचे न चालताही चालणे’ भासते. आपले सारे सण चांद्रमासावर अवलंबून असले तरी संक्रांतीचा एकमेव सण आपण सौर पद्धतीने साजरा करतो.

कधीकाळी पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील मकर वृत्तावरून सूर्य उत्तरेकडे ‘जायला’ लागला की, सुरू होणाऱ्या उत्तरायणाशी हा सण निगडित असावा. तेव्हा सूर्याचा ‘मकर राशी प्रवेश’ आणि उत्तरायण एकाच वेळी होत असेल. मात्र पृथ्वी व सूर्य यांच्या कक्षांच्या छेदनबिंदूवर असलेल्या अवष्टंभ बिंदूचे चलन दर बहात्तर वर्षांनी एक अंश असे मागे जात उत्तरायणाची सध्याची तारीख 21 डिसेंबर झाली आहे. मात्र तेव्हा सूर्य धनु राशीच्या पार्श्वभूमीवर दिसतो. तो 14 किंवा 15 जानेवारीला मकर राशीच्या पार्श्वभूमीवर दिसू लागला की, आपण संक्रांतीचा सण साजरा करतो. परंपरा आणि प्रत्यक्ष विज्ञान यातील ही तफावत आहे. मात्र या संक्रमणानंतर दिवस ‘मोठा’ होतो व रात्र ‘लहान’ होते याचा अनुभव येतोच. ही प्रक्रिया 21 डिसेंबरलाच सुरू झाली असली तरी अवकाशस्थ घडामोडींकडे लक्ष वेधणारा सौर गण म्हणून मकर संक्रांतीकडे पाहावं. थंडीचे दिवस. तिळगूळ यावेळी आवडीने खाल्ला जातो. त्याचबरोबर ‘गोड बोला’ असा संदेश परस्परांना दिला जातो हे अधिक महत्त्वाचं.

अवकाशातील सूर्य संक्रमणाचं गणित विज्ञान सांगेलच, पण ‘गोड बोला’ या अपेक्षेतून मानवी मनाचं वैचारिक संक्रमण दिसतं. कालक्रमात माणसामाणसांत कारणपरत्वे कलह होतातच, परंतु ते विसरून पुन्हा एकोपा करण्यात मानवसमूहाचं कसं हित आहे हे संक्रांतीचा सण नकळत मनावर बिंबवतो. आमच्या लहानपणी कोणा मित्रांची भांडणं झाली तर संक्रांतीचा तिळगूळ परस्परांना देऊन ती सुटत. बालपणीचे रुसवे-फुगवे आणि भांडणं तशी औट घटकेचीच असतात. मैत्रीची वीणच घट्ट असते. अनेक वर्षांनी भेटलेल्या मित्र-मैत्रिणी बालपणीच्या आठवणीतील सोडणं-चिडवणं आठवून मनमुराद हसतात. औटघटकेचा दुरावा संपल्यावरचं गळय़ात पडून आनंदाचे अश्रू ढाळणं आठवतं.

मात्र भांडणं निकषाच्या पातळीवर गेली की, ती व्यक्ती, समाज आणि एकूणच पृथ्वीवरच्या माणसाच्या अस्तित्वालाच आव्हान देऊ लागतात. सहजीवन, सामूहिक वास्तव्य याशिवाय मानवी संस्कृती रुजलीच नसती. परंतु त्यात कालांतराने निर्माण होणारे मतभेद समंजस विचाराने आवरले नाहीत तर ते उत्तरोत्तर घेरतच जातात. जागतिक पातळीवरची अनेक युद्धे जगाने पाहिली आहेत. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातच दोन भयंकर महायुद्धांनी अवघ्या जगाला दाहक चटके कसे दिले त्याचा अनुभव गाठीशी असूनही ‘सुज्ञ’ माणसं बदलायला तयार नाहीत याचं आश्चर्य वाटतं.

मतभेद असणं हा वैचारिक प्रक्रियेचाच एक भाग आहे. ते अगदी दोन व्यक्तीत, जवळच्या माणसांमध्येही असायचेच, पण त्याचं रूपांतर विद्वेषात करणं होणं किंवा करणं कुणाच्या तरी तत्कालीन फायद्याचं ठरत असलं तरी अंतिमतः ते एकूण सौहार्दाच्या मानवी व्यवहारांना वेठीला धरतं. ‘सहजीवनासह मतभेद’ हे तत्त्व स्वीकारून जगणं ही संस्कृती. त्यात सहजीवन महत्त्वाचं. कारण माणूस नावाच्या प्राण्याला त्याशिवाय तरणोपाय नाही.

परंतु व्यक्ती, समूह यांचे ‘इगो’ अकारण फुगले किंवा फुगवले गेले तर ते कोणाचंच भलं करत नाहीत. कवी यशवंत यांनी म्हटल्याप्रमाणे ‘आप्तविस्तारात ज्यांच्या देशही सामाविती, गाऊ त्यांना आरती’ असा ‘आप्तविस्तार’ आपली मतं टिकवून, पण इतरांची समजून घेऊन होऊ शकतो. एखाद्याचं मत पटणारं नसलं तरी ते तसं का याचा विचार माणूसच करू शकतो. अर्थात ‘ते’ मतसुद्धा अंतिमतः मानवी कल्याणाकडे जाणारं असलं पाहिजे. मार्ग भिन्न असले तरी ध्येय उदात्त असायला हवं. याची सुरुवात व्यक्तीपासून होते. कोणताही वैचारिक अतिरेक मानवी समूहाच्या अस्तित्वाला परवडणारा नाही याची जाणीव ‘सुज्ञ’ माणसांना कधी होईल तो खरा संक्रमणाचा क्षण. तिळगुळातलं स्नेह आणि गोडीचं मिश्रण हेच सांगतं. वचने किं दरिद्रता? दोन शब्द गोड बोला, बरेच ताणतणाव कमी होतील. त्यासाठी परस्पर संवाद मात्र हवा.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या