रंगरंगोटी : ज्येष्ठांची शाबासकी मोलाची

449

>> जगदीश शेळके

मोठय़ा कलावंतांचा चेहरा जेव्हा आपल्या ताब्यात येतो तेव्हा जबाबदारी वाढलेली असते

रंगभूषा हा एक मुखवटा आहे. नाटक-चित्रपटांत त्याची आवश्यकता असते. पण त्याच्या आतला चेहरा हा निखळ पारदर्शी असायला हवा. तेथे आतलं-बाहेरचं असं काही असू नये. कलाकार मंडळी व्यक्तिरेखा आणि स्वतःचं असं दोन्ही आयुष्यं जगत असतात. आरशासमोर बसताना तो एक सामान्य मनुष्य असतो. पण त्याला साकारायच्या व्यक्तिरेखेप्रमाणे त्याची रंगभूषा  आम्ही करतो तेव्हा तो ‘नट’ होतो. यासाठी कलाकाराची रंगभूषा करताना ती का करायची  याचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

शाळेत असल्यापासूनच मला चित्रकलेची आवड होती. त्यामुळे चित्रकलेच्या सर्व परीक्षा आणि स्पर्धांमधून मला अनेक बक्षिसेही मिळाली आहेत. इयत्ता सतवीमध्ये असताना श्रीहरी पवळे या माझ्या कलाशिक्षकांच्या  परिचयाने विष्णूदास भावे नाटय़गृहातील नाटकाच्या बोर्डाची रंगरंगोटी  करण्याची संधी मिळाली. याच काळात एवढी छान चित्रं काढतोस मग आमचा मेकअप का नाही जमणार अशी विचारणा होऊ लागली आणि यामुळेच माझा चित्रकलेकडून रंगभूषेकडे प्रवास सुरू झाला.

रंगभूषाकार म्हणून वाटचाल करत असतानाच रंगांचे जादूगार रंगमहर्षी कृष्णा बोरकर यांच्याशी माझा संपर्क आला. त्यांनी रणांगण, ती फुलराणी, शतजन्म शोधिताना, गरुडझेप, रिमोट कंट्रोल अशी रंगभूषेची मोठी जबाबदारी असलेल्या नाटकांसाठी विश्वासाने मला पुढे केलं.

आतापर्यंत बालनाटय़ांतून  प्राणी, पक्षी आणि व्यावसायिक, प्रायोगिक नाटकांतून शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, जोतिबा फुले, गांधीजी, लोकमान्य टिळक अशा अनेक पात्रांची रंगभूषा केली आहे. यासाठी प्रत्येक व्यक्तिरेखेच्या जन्मापासून ते आतापर्यंतची उपलब्ध असलेली छायाचित्रे पाहणे. चेहऱयातील बदलणे अभ्यासणे आणि माझ्या कुवतीप्रमाणे परिपूर्ण रंगभूषा करण्याचा माझा प्रयत्न असतो. हे करत असताना आपल्या कामाचं जे कौतुक होतं, शाबासकी मिळते तीच माझ्या कामाची पावती.

इथे एक अनुभव सांगावासा वाटतो, मी ‘श्रीमान योगी’ नावाच्या ऐतिहासिक नाटकासाठी रंगभूषा करत होतो. आशालता वाबगावकर, उपेंद्र दाते, प्रमोद पवार अशी मातब्बर कलाकार मंडळींची रंगभूषा करायची होती. त्यांच्यापेक्षा मी अगदीच लहान होतो. या नाटकाच्या रंगभूषेसाठी दोन टेबलं मांडावी लागत. एक मेकअप रूममध्ये आणि दुसरा विंगेत. नाटक चालू होण्याआधी मेकअप रूममध्ये काम चालायचं आणि नंतर जे बदल असतात ते विंगेत व्हायचे. कुणाला मिशी, कुणाला दाढी-मिशी, विग, टक्कल, टिळे लावणे, पुसणे अशी धावपळ सुरू असायची. ही धावपळ आशाताईंच्या लक्षात आली. त्या रोज प्रत्येक नाटकावेळी माझं कौतुक करायच्या की,  एवढय़ाशा वयात तू सगळं लक्षात कसं ठेवतो. ही आपुलकीने दिलेली कौतुकाची थाप प्रामाणिकपणे काम करण्याचा उत्साह वाढवत होती.

आतापर्यंतच्या प्रवासात मी हेच शिकलो की, ज्यांचं अन्न खातो त्यांना आणि जे रस्ता दाखवतात त्यांना कधीही दुखवू नका. आयुष्यात खूप मोठे व्हाल. आतापर्यंतच्या प्रवासात मी हेच लक्षात ठेवून माझं काम प्रामाणिकपणे करतो आहे. फरक एवढाच ; आधी कागद रंगवायचो आता चेहरे रंगवत आहे. म्हणून नव्या रंगभूषाकारांना हातचं काहीही राखून न ठेवता आजपर्यंत माझ्या कुवतीप्रमाणे जेवढं मला कळलं आहे. ते त्यांना सांगतो, शिकवतो.

आजही नाटय़-चित्रपट क्षेत्रात रंगभूषाकाराला ‘दादा’ अशी हाक मारली जाते. प्रसिद्धीच्या दृष्टीने कितीही मोठा कलाकार असला तरी रंगभूषेसाठी आमच्या समोर खुर्चीत बसतो तेव्हा तो आम्हाला  नमस्कार करून आपला चेहरा आमच्या ताब्यात देतो. म्हणून मला रंगभूषा ही अभिनयापेक्षा रोमांचकारी आणि आव्हानात्मक वाटते. यासाठीच  या पडद्याच्या मागच्या कलेतही मी आनंदी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या