लेख – मराठी भाषा दिवस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप देशपांडे

पंधराशे वर्षांची परंपरा आपल्या मराठी भाषेला आहे. जगभरातल्या मोठय़ा भाषिकांचे बोलणाऱयांचे समूह आहेत त्यात मराठीचा पंधरावा नंबर लागतो, तर नऊ कोटी माणसांची मातृभाषा मराठी आहे. अमेरिका, सिंगापूर, इंग्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, मॉरिशस आदी देशांतही मराठी बोलली जाते. अनेक ठिकाणी मराठी मंडल, महाराष्ट्र मंडळ आहेत. मराठी सण-वार उत्सव ते मोठय़ा उत्साहाने साजरे करत असतात. मराठी साहित्य संमेलने भरवत असतात. मराठी पुस्तकाची प्रदर्शने भरवतात. आपल्याकडून साहित्यिक, कलाकारांना बोलावले जाते. अनेक ठिकाणी गजानन महाराज, गणपती, दत्तात्रयाची मंदिरे आहेत. गणेशोत्सव, गजानन महाराजांचा प्रकट दिन, दत्त जयंती तसेच शिवजयंती उत्सव साजरे केले जातात. व्याख्याने आयोजित करतात. परदेशात राहून मराठी भाषा, सणवार त्यांना सोडावी असे वाटले नाही. आपण मात्र

लाभले आम्हांस भाग्य, बोलतो मराठी ! 

जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी !!

असे म्हणूनच धन्यता मानतो.

पण खरा प्रश्न हा आहे की, असं एक दिवसच फक्त मराठीविषयी प्रेम दाखवून काही साध्य होणार का? त्यासाठी आपण व्यक्तिशः काही योगदान देणार का? याचा विचार करणेही महत्त्वाचे आहे. मी स्वतः मराठी असून मराठीला किती न्याय देतोय हेही तपासणे गरजेचे आहे.

दैनंदिन वापरात अजूनही आपण इंग्रजीलाच प्राधान्य देतो. साधं उदाहरण घ्या. रोज आपण मोबाईलचा वापर करतो. किती जणांचा की बोर्ड मराठी आहे? किती जण मोबाईलवर, व्हॉट्सअॅपवर संवाद साधण्यासाठी मराठीचा वापर करतात. मेसेज पाठवतो तेही इंग्रजीतच. काय तर, मराठीत कठीण वाटतं म्हणे! फोनवर बोलताना सुरुवात हॅलो… हॅलो..ने. नमस्कार म्हणून फारच कमी लोक बोलतात. घरातून बाहेर पडणारे मुलं-मुली निघताना येतो ग आई येतो बाबा असे म्हणून बाहेर पडतात; पण रिक्षा-टॅक्सी करताना, त्याच्याशी बोलताना सरळ सरळ हिंदीचा वापर करतात, ती तोडकीमोडकी का असेना.

छोटय़ा छोटय़ा गोष्टीतून आपण खूप काही करू शकतो. मराठीत खूप मोठी साहित्य संपदा आहे. वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, पु. ल. देशपांडे, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वा. सावरकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ना. स. इनामदार, शिवाजी सावंत आदी अनेक साहित्यिकांचे साहित्य आहे. ते वाचा. अनेक साहित्यिकांच्या  कथा, कादंबऱ्या, काव्यसंपदा, ललितसाहित्य, चरित्रे-आत्मचरित्रे आहेत. ती वाचा. शिवचरित्र वाचा. दासबोध वाचा, तुकारामगाथा वाचा, अमृतानुभव, भावार्थदीपिका, योगवशिष्ठ वाचा. वर्षात हजारांच्या संख्येने पुस्तके, शेकडो दिवाळी अंक प्रसिद्ध होतात. यातले आपण किती वाचतो. वर्तमानपत्रं किती जण वाचता?  कुठल्या वाचनाला प्राधान्य देतो. वर्षभरात मराठीतलं काही वाचण्याचा संकल्प करा. किमान पाच-सात पुस्तके वाचा. वाचून जवळच्याला प्रवृत्त करा. काही चांगले ग्रंथ खरेदी करा. वाढदिवसाला, लग्नसमारंभात पुस्तकांची भेट द्या. इंग्रजी माध्यमातून मुलाच्या शिक्षण असेल तरी त्यांना मराठीपासून तोडू नका. त्यांना मराठीतील चांगली चांगली पुस्तके वाचायला द्या. त्याच्यामध्ये आवड निर्माण करा.

निरनिराळय़ा कार्यालयात कार्यालयीन कामकाज मराठीत व्हावे म्हणून शासनाने निर्णय घेतले आहेत. सक्तीचे केले आहे, पण त्यात प्रगती व्हायला हवी. संपूर्ण महाराष्ट्रात सर्वच ठिकाणच्या पाटय़ा मराठीतच हव्यात हा कायदा आता केला आहे. तो योग्यच आहे. ज्याला महाराष्ट्रात रहिवास करावयाचा आहे त्याला मराठी भाषा अवगत असायलाच हवी.