
>> सनत्कुमार कोल्हटकर
चावेझ यांच्या व्हेनेझुएलाच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांची कडवी राजकीय विरोधक असणाऱ्या मारिया कोरिना मचाडो या नोबेल पारितोषिक मिळविण्यात यशस्वी झालेल्या आहेत. नजीकच्या भविष्यात मारिया कोरिना मचाडो यांना व्हेनेझुएलाच्या सत्तेवर आणण्यासाठी अमेरिका जीव तोडून प्रयत्न करणार का हे बघावे लागेल. नोबेल पारितोषिक मिळाल्याने त्यांना जनतेची सहानुभूती मिळेल. अमेरिकेने गेल्या आठवडय़ातच व्हेनेझुएलाच्या सागरी क्षेत्रात अमेरिकेच्या नौसेनेची जहाजे पाठविली होती. अमेरिकन सैनिकही या बोटींवर तैनात आहेत. व्हेनेझुएलाचे नेते निकोलस मादुरो यांच्यावर अमेरिकेने 5 कोटी अमेरिकन डॉलरचे इनाम जाहीर केलेले आहे. त्यामुळे येत्या काळात व्हेनेझुएलामध्ये रक्तरंजित संघर्ष बघावयास मिळू शकतो.
दहा वर्षांपूर्वी क्रूड तेलाचे जागतिक भाव कोसळल्यानंतर ज्या देशांची आर्थिक अधोगती वेगाने सुरू झाली. त्यामध्ये व्हेनेझुएलाचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. व्हेनेझुएलाकडे तर क्रूड तेलाचे मोठे भांडारच आहे. व्हेनेझुएलाचे नेते तर त्यांच्याकडे सौदी अरेबियापेक्षा जास्त मोठे क्रूड तेलाचे भांडार आहे असे सांगतात. या क्रूड तेलाच्या व्यापारातून मिळणाऱ्या असीमित फायद्यावर व्हेनेझुएलाचे एकेकाळचे तेथील लोकप्रिय नेते चावेझ यांनी व्हेनेझुएलावर अनेक वर्षे राज्य केले. क्रूड तेलाच्या व्यापारातून मिळणारे फायदे त्यांनी तेथील सामान्य जनतेमध्ये चक्क वाटले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे अनेक वर्षांमध्ये व्हेनेझुएलाची जनता आळशी झाली होती.
2014 नंतरच्या काळात तेलाचे भाव कोसळलेल्या काळात व्हेनेझुएला, अझरबैजानसारखे देश तग धरू शकले नाहीत. या देशांची दिवाळखोरीकडे वेगाने वाटचाल सुरू झाली. सुरुवातीला या देशांनी त्यांच्याकडे असलेला राखीव अर्थसाठा वापरण्यास सुरुवात केली. परंतु या परिस्थितीमुळे अपरिहार्यपणे व्हेनेझुएलाच्या चलनाची (बोलिव्हिअर) जागतिक पत घसरण्यास वेगाने सुरुवात झाली. त्यानंतर व्हेनेझुएला हा मोठय़ा आर्थिक दिवाळखोरीकडे वेगाने प्रवास करत असल्याचे स्पष्ट झाले होते. क्रूड तेलाचे भाव जागतिक व्यापारामध्ये खाली आले तर व्हेनेझुएलाला त्याचा त्रास होत असे. चावेझ यांचे निधन झाले तसतसे व्हेनेझुएलाच्या अर्थव्यवस्थेला उतरती कळा लागली. व्हेनेझुएलाच्या चलनाचे प्रचंड प्रमाणात अवमूल्यन झाले. व्हेनेझुएलाची सामान्य जनता व्हेनेझुएला सोडून शेजारी देशांमध्ये आश्रयास गेली. अन्न पदार्थांचे न परवडणारे भाव आणि त्याची बाजारातील अनुपलब्धता यामुळे सामान्य व्हेनेझुएलाचे नागरिक हैराण झाले होते. सामान्य जनतेला दिलासा देण्याऐवजी तेथील राज्य कारभार हाकणारे निकोलस मादुरो यांनी लोकांना ‘उंदीर मारून खा’ असा विचित्र सल्ला दिला होता. व्हेनेझुएलाचा सरकारी कारभार कशा पद्धतीने चालतो याचे मोठे गूढ आहे.
व्हेनेझुएलामध्ये मधल्या काळात अमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्या मोठय़ा टोळ्या तयार झाल्या होत्या. या टोळ्यांमधीलच अनेक जण जो बायडेन यांच्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात अमेरिकेत बेकायदेशीपणे घुसण्यात यशस्वी झाले होते. पण नंतर अमेरिकेच्या अध्यक्षपदी आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात या टोळ्यांमधील अनेकांची अमेरिकेने लॅटिन अमेरिकेतील एल साल्वाडोरमधील तुरुंगात रवानगी केली होती.
गेली कित्येक वर्षे अमेरिका हाच क्रूड तेलाचा जगामधील सर्वात मोठा ग्राहक देश होता. अमेरिकेच्या चलनाला म्हणजेच अमेरिकन डॉलरला आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये उतरती कळा लागली आहे. अशा काळात अमेरिकेची त्याच्या जवळच असणाऱ्या व्हेनेझुएलाच्या क्रूड तेलाच्या साठय़ावर नजर गेली नसती तर नवलच. त्यामुळेच गेली काही वर्षे अमेरिका व्हेनेझुएलाच्या सत्तेवर अमेरिकेला अनुकूल असणाऱ्या व्यक्तीला आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.
व्हेनेझुएलाचे एकेकाळचे विरोधी पक्षनेते जुआन ग्वाडो यांना व्हेनेझुएलाचे हंगामी अध्यक्ष म्हणून मान्यता मिळाली होती. 2019 मध्ये अमेरिकेच्या पाठिंब्यावरच ग्वाडो या नेत्याने व्हेनेझुएलाची सत्ता बळकावण्याचा प्रयत्न केला होता, पण व्हेनेझुएलाच्या लष्कराने ग्वाडो यांचा प्रयत्न हाणून पाडला होता. त्यानंतर निकोलस मादुरो हेच पुन्हा व्हेनेझुएलाच्या अध्यक्षपदी स्थानापन्न झाले आणि अजूनही ते अध्यक्षपदी आहेत. निकोलस मादुरो यांचे पूर्वसुरी चावेझ हे अमेरिकेच्या प्रचंड विरोधात होते. तसेच सध्याचे निकोलस मादुरो हेदेखील अमेरिकेच्या विरोधात आहेत.
चावेझ यांच्या व्हेनेझुएलाच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांची कडवी राजकीय विरोधक असणाऱ्या मारिया कोरिना मचाडो या नोबेल पारितोषिक मिळविण्यात यशस्वी झालेल्या आहेत. नोबेल पारितोषिक जाहीर करताना नोबेल समितीने मारिया कोरिना मचाडो यांच्याबद्दल वापरलेले शब्द लक्षवेधी आहेत. समिती म्हणते, लोकशाही हक्कांच्या रक्षणासाठी तसेच हुकूमशाहीतून लोकशाहीकडे वाटचालीसाठी मारिया घेत असलेल्या प्रयत्नांची दखल म्हणून हा पुरस्कार त्यांना देण्यात येत आहे. मारिया कोरिना मचाडो यांची पार्श्वभूमीही त्यांच्या व्हेनेझुएलातील पुढील वाटचालींकरिता पोषक आहे. त्यांनी औद्योगिक अभियांत्रिकीची पदवी मिळवलेली आहे. तसेच अर्थशास्त्रातील पदवीही मिळवलेली आहे.
नजीकच्या भविष्यात मारिया कोरिना मचाडो यांना व्हेनेझुएलाच्या सत्तेवर आणण्यासाठी अमेरिका जीव तोडून प्रयत्न करणार का हे बघावे लागेल. नोबेल पारितोषिक मिळाल्याने त्यांना जनतेची सहानुभूती मिळेल. नॉर्वेमधून नोबेल पुरस्काराची घोषणा झाल्यामुळे व्हेनेझुएलाने नॉर्वेतील राजदूतावास बंद केला आहे. त्यामुळे येत्या काळात अचानकपणे व्हेनेझुएलामध्ये तेथील सत्ताधीशांविरोधात असंतोषाचे वणवे भडकताना दिसल्यास नवल नाही. या अशा असंतोषाला निकोलस मादुरो कसे समर्थपणे तोंड देतात हे पाहणे औत्सुक्यपूर्ण असणार आहे. निकोलस मादुरो यांना चीन व रशियाची मदत कोणत्या प्रकारे होऊ शकते का, हेदेखील पाहावे लागेल. जगामध्ये जेवढी काही प्रसिद्ध पारितोषिके आहेत त्या पारितोषिकांचा पुरेपूर राजकीय वापर होत असावा, असे मानण्यास जागा आहे. तंत्रज्ञान, मग ते जैव तंत्रज्ञान असो की इतर, यामध्येच खऱ्या तज्ञ व्यक्तींना पारितोषिकाची संधी मिळू शकते, पण सामाजिक बदल, समाजसेवा वगैरे नावाखाली दिले जाणारे जागतिक पुरस्कार बहुधा हेतू ठेवूनच दिले जातात, असे मानण्यास जागा आहे. कोणी याबद्दल उघडपणे बोलत नाही एवढेच.
अमेरिकेने गेल्या आठवडय़ातच व्हेनेझुएलाच्या सागरी क्षेत्रात अमेरिकेच्या नौसेनेची जहाजे पाठविली होती. अमेरिकन सैनिकही या बोटींवर तैनात आहेत. व्हेनेझुएलाचे नेते निकोलस मादुरो यांच्यावर अमेरिकेने 5 कोटी अमेरिकन डॉलरचे इनाम जाहीर केलेले आहे. त्यामुळे येत्या काळात व्हेनेझुएलामध्ये रक्तरंजित संघर्ष बघावयास मिळू शकतो.


























































