अध्यात्म – ‘कोहम’ ते ‘अहं ब्रह्मास्मि!’

>> प्राची महेश देसाई

‘कोहम’पासून सुरू झालेला हा प्रवास ‘अहं’चा लेप लेवून  स्वतःभोवती एक वलय तयार करतो. हे वलय भेदणं कठीण आहेच, पण अशक्य मात्र नाही.

मी कोण? अर्थात कोहम? हा प्रत्येकाला पडलेला एक अनाकलनीय  प्रश्न. उत्तर  शोधू  गेलं तरी बहुतांशी अनुत्तरीत. मग हा शोध थांबलाय का? तर नाहीच नाही. रुढार्थाने माझ्यापुरतं ‘मी कोण’ याचा विचार करता या अखंड ब्रह्मांडातल्या अणुइतका एक सूक्ष्म, परंतु मन व भावना असणारा, अस्तित्व दिसणारा सजीव असं म्हणता येईल. स्वतच्या आत डोकावून पाहण्यास, आपल्या अस्तित्वाचा अर्थ शोधण्यास मदत करणारं हे तत्वज्ञान.

खोलवर व व्यापक विचार करता आईच्या उदरातून जन्माला आल्यावर आपलं काही एक अस्तित्व निर्माण होतं. जन्मासोबत आपल्याला एक नाव मिळतं आणि ते कायमस्वरूपी आपल्यासोबत राहतं. आपण लोहचुंबकाप्रमाणे आसपास असणाऱया लोकांबरोबर निरनिराळ्या संबोधनाच्या नात्यात गुंतत जातो. हे त्यावेळी त्या बालजिवाला कळतही नाही. त्या नावासोबत आपलं आयुष्य पुढे जात राहतं. काळ पुढे जातो तसे आपणही पुढे जात राहतो व जेव्हा सक्षम, समजदार होतो, तेव्हा आपल्या कामगिरीनुसार, वकुबानुसार  विशिष्ट पद, प्रतिष्ठा मिळून या ‘मी’ला नवीन ओळख प्राप्त होते. इथे मात्र जाणिवा जागृत  असल्याने या ‘मी’मध्ये ‘मीपणा’ मिसळू लागतो. मी असा, मी तसा, हे माझं, सर्व माझ्यामुळेच आहे हा अहंभाव  या  ‘मी’ला अधिक  गडद करतो.

हा ‘कोहम’ शोध म्हणजे स्वतच्या वास्तविक रूपाला ओळखायला लावणारं तत्त्वज्ञान. आत्मज्ञान आणि आध्यात्मिक उन्नती प्राप्त करण्याचा हा प्रवास भौतिक जगापासून दूर नेतो आपल्याला. भौतिक जगाच्या पलीकडे ओळखायला शिकणं हे काही एका रात्रीत घडून येणारं नाही. त्यासाठी स्वतला शास्त्रकाटय़ाच्या कसोटीतून उतरावे लागेल. आध्यात्मिक स्तरावर स्वतचा शोध घेताना आपल्या गाभ्याशी जे आत्मिक तत्व आहे त्याच्याशी अभिप्रेत होणारा हा प्रश्न. स्वतलाच  विचारलेला हा प्रश्न म्हणजे आपल्या तत्वाविषयी जागरूक होणं. जी व्यक्ती स्वतच्या तत्त्वांशी जागरूक होते तिचं जीवन अंतर्बाह्य बदलून जातं. आत्मिक तत्व दर्शवत सर्वार्थाने जीवनमुक्तीची अनुभूती देणारा हा प्रवास.

पाहा ‘कोहम’पासून सुरू झालेला हा प्रवास ‘अहं’चा लेप लेवून  स्वतःभोवती एक वलय तयार करतो. हे वलय भेदणं कठीण आहेच, पण अशक्य मात्र नाही. यासाठी ‘मीपणा’ वाढवणाऱया भौतिक सुखाच्या चक्रातून बाहेर पडावं लागतं. आपल्या जाणिवा-नेणिवांचा पुरेपूर वापर करून ‘मी’ सोडून ‘आम्हा’ किंवा ‘आपण’ हा विचार अंगीकारावा लागतो. तसं पाहता ‘मी’ हा सदा एकटाच दिसतो, तर ‘आम्ही’ म्हणताच आपल्या बरोबर कोणीतरी सहज जोडलं जातं ही भावना नक्कीच सुखदायी ठरते.

इथे माझ्या एका रचनेतल्या  चार ओळी

‘मी’ नव्हे ‘आपण’

हेच ‘माझं’ सांगणं

माणसाचं माणूसपण

हेच आहे ‘आपलेपण’

आता ‘आम्ही’, ‘आपण’ करत विस्तारलेलं आपलं जग अधिक  बळकट होतं. त्यामुळे ‘मी’ला लगडलेला ‘अहं’ गळून पडल्याने ‘मी’देखील उरत नाही व त्याबरोबर ‘मी कोण’ हा विचारही कदाचित  संपतो. तसंही या ‘आम्ही’मुळे आलेला अनुभव, झालेली उपरती याने आत्मसंयमाची भावना निर्माण होते. इथे द्वैत-अद्वैताचा आधार घेत ‘मी’ हा वैश्विक होतो आणि हीच मग ‘मी कोण’ या प्रश्नाची उकल ठरते.

तर असा हा ‘कोहम’पासून सुरू झालेला गहन, गंभीर स्वरूपाचा एकमार्गी प्रवास ‘अहं ब्रह्मास्मि’ या स्थितीला येऊन थांबतो.