अलौकीक श्रीसंतदर्शन; मेहेरबाबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विवेक दिगंबर वैद्य <[email protected]>

हिंदुस्थानच्या आजवरच्या प्रगतीमध्ये पारशी जमातीचे ‘योगदान’ महत्त्वपूर्ण आहे. राजकारण, समाजकारण व अर्थकारण क्षेत्रांमध्ये पारशी बांधवांनी त्यांच्या बुद्धिचातुर्याचा व कर्तृत्वाचा ठसा हिरिरीने उमटविलेला आहे. तरीही, त्यांचा धर्म आणि धर्माचरण याबाबतीत मात्र ते बंदिस्त भूमिका स्वीकारताना दिसतात. ‘आपण बरे, आपले धर्मकारण बरे’ न्यायावर त्यांचा पंथ विश्वास ठेवताना दिसून येतो. त्यांच्या या तत्त्वाला छेद देण्यासाठीच जणू मेहेरबाबांनी 25 फेब्रुवारी 1894 रोजी जन्म घेतला.

मेहेरबाबा पुण्यास जन्मले. शालेय शिक्षणाचा ‘श्रीगणेशा’ त्यांनी पुण्यातील सेंट व्हिन्सेट हायस्कूलमध्ये गिरवला. पुण्याच्याच डेक्कन कॉलेजात महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मेहेरबाबांना खरे पाहता शाळकरी वयातच अध्यात्माची गोडी लागली. सोबतीने ते कविताही करू लागले, मात्र कॉलेजमध्ये वयाच्या एकोणिसाव्या वर्षी घडलेला एक प्रसंग मेहेरबाबांचे आयुष्य पुरते ढवळून काढता झाला. पुण्यातील कॅम्प भागात हजरत बाबाजान या सुफी संतश्रेष्ठाशी झालेली भेट मेहेरबाबांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. 103 वर्षे वयाच्या स्त्री संत बाबाजान यांनी एकेदिवशी मेहेर यांना बोलावून घेतले. मेहेर त्यांच्यापाशी जाताच बाबाजान यांनी मेहेर यांच्या कपाळाचे चुंबन घेतले.

बाबाजान यांनी मेहेरबाबांच्या भ्रूमध्यावरील आज्ञाचक्राचे चुंबन घेताक्षणीच ते उन्मनी अवस्थेस पोहोचले. या आत्मसाक्षात्कारामुळे भान हरपलेले मेहेरबाबा तीन दिवस समाधीवस्थेत पडून राहिले. पुढे मेहेरबाबांचे भौतिक जगातील असणे तिथेच संपुष्टात आले आणि ते भिरभिऱ्या अवस्थेत सर्वत्र फिरू लागले. यातच एकदा फिरत फिरत ते बेट केडगाव येथे श्रीनारायण महाराजांच्या सान्निध्याला गेले. तेथे काही दिवस राहून पुढे ते नागपूर येथील ताजुद्दीनबाबांकडे गेले आणि पुढे मेहेरबाबा शिर्डी येथे गेले. शिर्डी येथे नित्यनेमानुसार साईबाबा भक्तांसोबत लेंडीबागेतून येत असता त्यांचे दर्शन घेण्याच्या हेतूने मेहेरबाबा साईंसमोर गेले तोच साईबाबा त्यांच्याकडे पाहात एकाएकी ‘याह परवरदिगार’ असे म्हणाले. डिसेंबर 1915 ची ही गोष्ट. साईबाबांनी मेहेरबाबांना उपासनी महाराजांकडे जाण्याचे संकेत केले. बाबांच्या आज्ञेनुसार मेहेरबाबा साकुरी येथे उपासनीबाबांकडे गेले. त्यांना पाहताच अचानक उपासनीबाबांनी शेजारी पडलेला एक धोंडा उचलला आणि नेम धरून मेहेरबाबांच्या कपाळावर मारला. जेथे हजरत बाबाजान यांनी चुंबन घेतले होते त्याच ठिकाणी आज्ञाचक्रावर उपासनीबाबांनी मारलेला धोंडा लागला आणि त्यासरशी मेहेरबाबांना आत्मसाक्षात्कार घडला.

उपासनीबाबांसोबतच्या तब्बल सात वर्षांच्या वास्तव्यात मेहेरबाबांनी अध्यात्ममार्गातील खाचखळगे जाणून घेतले. अनेक गूढ रहस्यांची उकल करून घेतली. अनेक पैलूंची प्रचीती घेऊन पाहिली. साक्षात्कार घडला. पुढे एके दिवशी उपासनीबाबांनी मेहेरबाबांना आशीर्वाद देत सांगितले, ‘मेहेरबान, तू अवतार आहेस.’ पुढे, मेहेरबाबा हे अध्यात्माच्या भट्टीतून तावून सुलाखून निघालेले बावन्नकशी सोने पुढील प्रवासाला निघाले. साकोरीहून प्रस्थान केल्यानंतर मेहेरबाबांनी प्रथम पुणे, मुंबई आणि त्यानंतर नगरमधील मेहेराबाद येथे आश्रम स्थापन केला शिवाय मेहेरबाबांनी शाळा, रुग्णालय आणि दोन आश्रमही स्थापन केले.

मेहेरबाबांचे विचार सुस्पष्ट व ठाम होते. ‘मी सच्चिदानंद आहे. युगायुगांतून अवतरणारा, श्रेष्ठातील श्रेष्ठ असा मी सनातन पुरुष आहे,’ असे ते निक्षून सांगत असत. त्याचप्रमाणे मेहेरबाबांनीही ‘धर्मासाठी ईश्वर महत्त्वाचा. सृष्टीचा पालन पोषणकर्ता तो जगन्नियंता आहे असे सर्व धर्म मानतात. मीही तेच मानतो कारण मीच जगत्पिता आहे,’ असे प्रतिपादन केले.

1922 साली साकुरीहून पुण्यास आल्यावर मेहेरबाबांनी विविध ठिकाणी आश्रम, शाळा, रुग्णालयांची स्थापना केली. समाजोपयोगी वास्तूंचे निर्माण केल्यानंतर जवळपास चार वर्षांनी, 10 जुलै 1925 रोजी मेहेरबाबांनी मौनव्रत पालनास सुरुवात केली. वयाच्या चव्वेचाळिसाव्या वर्षी मौनव्रत घेणारे मेहेरबाबा पुढे नित्य एकांतात राहिले. अधूनमधून नियमितपणे ते उपवास करीत असत. मौनकाळात त्यांचे सांगणे ते वर्णमालेच्या अक्षरांतून दाखवीत किंवा कधी फळ्यावर लिहून दाखवित असत. पुढील काळात मात्र ते केवळ खुणेच्या साहाय्याने व चेहऱ्यावरील हावभावांतून त्यांचे विचार मांडू लागले.

God speaks, Listen Humanity आणि Life at its best या तीन ग्रंथांतून त्यांनी अध्यात्मविषयक विचार मांडले. अध्यात्मातील विज्ञान अतिशय रोखठोकपणे या ग्रंथांतून उलगडून सांगण्यात आले आहे. जातीपातींमध्ये धर्म व राष्ट्र यांच्याविषयी प्रेमभाव निर्माण व्हावा हे स्वप्न पाहणाऱ्या मेहेरबाबांनी ‘अरण’गावी उभारलेल्या ‘मेहेराबाद’ वसाहतीमध्ये कुष्ठरोगी, उपेक्षित व रोगग्रस्त बांधवांसाठी सेवाकार्य सुरू केले. कुष्ठरोगी, भिकाऱ्यांना आंघोळ घालणे, स्वत-च्या स्वच्छतेविषयी जागरूक करून त्यांच्यात वैचारिक परिवर्तन घडवून आणणे हा या वसाहतीचा दिनक्रम होता.

‘मेहेराश्रमा’मध्ये विविध जातिधर्माची निराधार मुले होती. त्यांचे जेवणखाण, शिक्षण, आत्मिक व आध्यात्मिक उन्नतीसाठी मेहेरबाबा दिवसरात्र झटत असत. हा अभिनव प्रयोग अल्पावधीत लोकप्रिय झाला.  राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी त्यांच्या शेकडो अनुयायांना मेहेरबाबांचे दर्शन घडविले आणि ते म्हणाले, ‘हा खरा कर्ममार्गी संत आहे. देव शोधायचाच असेल तर या मेहेरबाबात शोधा.’ दरम्यान, मेहेरबाबा या समाजसुधारणावादी संताच्या प्रेमात राष्ट्रपिता महात्मा गांधीदेखील होते. 31 जानेवारी 1969 या दिवशी लौकीकार्थाने जगाचा निरोप घेणाऱ्या या अनोख्या संतश्रेष्ठाच्या कबरीवरही Mastery in servitude (सेवेमध्येच स्वामित्व) असे शब्द कोरलेले आहेत. मेहेरबाबांनी दिलेला हा ‘सेवाकार्याचा संदेश’ प्रत्येकाने स्वत-च्या जीवनात आचरणात आग्रहपूर्वक आणला पाहिजे.