विज्ञानरंजन – बर्फाचे तट!

>> विनायक

मध्यान्हीचा सूर्य कधीच माथ्यावर येत नाही, असा पृथ्वीचा भाग बराच मोठा आहे. त्यातही उत्तर आणि दक्षिण गोलार्धाच्या टोकाला म्हणजे पृथ्वीच्या अक्षाच्या दोन्ही बाजूंना सतत कडाक्याची थंडी सहन करावी लागते. आर्क्टिक आणि अंटार्क्टिक भागात अतिशीत वातावरणामुळे सतत हिमवृष्टी होते व वर्षानुवर्षे साचत गेलेल्या या भुरभुरत्या हिमाचं बर्फाच्या टणक ‘खडका’त रूपांतर होतं. त्याचे हिमप्रस्तर (ग्लेशिअर) तयार होतात. अशा भागातलं प्राणी जीवन फारच विरळ असतं तरीसुद्धा एस्किमोंसारखी माणसं तिथल्या हाडं गोठवणाऱया थंडीचा सामना करत टिकून राहतात. आपल्याकडे सध्याच्या थंडीच्या दिवसात पारा दहाच्या खाली जायला लागला की हुडहुडी भरते, पण या प्रदेशात अनेक ठिकाणी उणे तापमान किंवा तापमानाचा नीचांक गाठला जातो. उत्तर धुवीय प्रदेशात आता तशीच परिस्थिती आहे. मग त्यातून थंडीच्या लाटा तयार होतात त्या पार युरोपपर्यंत येतात.

त्यातच आपल्याकडचा हिमालय आणि युरोपातील आल्पस पर्वतरांगांवरही त्यांच्या प्रचंड उंचीमुळे बर्फ साठतो. ग्लेशिअर्स तयार होतात आणि थोडी उष्णता वाढली किंवा त्यांचा ‘पाया’ ढिसूळ झाला की घसरतात, त्यांच्या ‘हिमनद्या’ बनतात. एकेका हिमप्रस्तराची घसरण वस्त्या, गावे उद्ध्वस्त करू शकते. या काळात हिमालयात प्रवासाला जाणाऱया प्रवाशांनाही त्याचे फटके बसतात. अर्थात, पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात हे हिमप्रताप अधिक आढळतात. कारण या ग्रहावरची जास्तीत जास्त वस्ती याच भागात आहे. दक्षिण गोलार्धात सागरांचं साम्राज्य. प्रचंड वस्तीचे देश अगदी कमी. गोठवणाऱया थंडीचा कडाका सहन कराव्या लागणाऱया अनेक छोटय़ा देशांना गेल्या काही वर्षांत एक वेगळीच समस्या भेडसावतेय. तिथे थंडी जशी जास्त तसाच बदलत्या हवामानामुळे वाढता उन्हाळासुद्धा तीव्र. यापुढच्या काळात या ‘हवामान बदलाची’ प्रक्रिया अशीच विनाश वाटेने सुरू राहिली तर परिणाम एकच समुद्राची जलपातळी वाढणे. जगभरच्या समुद्र-सागरांना आपण सोयीनुसार नावे दिली असली तरी निसर्गाच्या हिशेबाने सर्व जलनिधी एकच. त्यामुळे कुठल्याही ध्रुव प्रदेशातला प्रचंड बर्फ वितळायला लागला तर अनेक देशांच्या किनारपट्टय़ांवरची महानगरे आणि गावखेडी खाऱ्या पाण्याखाली जातील. महाराष्ट्राला सातशे किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे आणि त्याकाठी मुंबईसारखी अनेक महानगरे, मध्यम शहरे नि गावे वसलेली आहेत. यापैकी काही गावांत शिरलेले सागरजल, नेमाने परतते तसे मागे गेलेच नसल्याची उदाहरणेही आहेत. यावरून सुचलं ते असं की, मग प्रतिवर्षी किती बर्फ पृथ्वीवर साचतो आणि किती वितळतो? त्याचं निश्चित प्रमाण (रेशो) सांगता येत नसलं तरी वार्षिक नैसर्गिक बर्फ निर्मिती आणि बर्फ वितळण्याची प्रक्रिया यातली विषमता वाढली आहे. याचा अर्थ जितका बर्फ किंवा बर्फाचे तट पृथ्वीवर दरवर्षी तयार होतात, त्या तुलनेत वितळणाऱया बर्फाचं प्रमाण अधिक आहे.

हे हिमप्रस्तरांच्या निर्मितीचा वेग वितळण्याच्या वेगापेक्षा जास्त असला तर प्रश्नच नाही, पण ग्रीनलॅन्ड, आइसलॅन्ड या उत्तर गोलार्धातील भागातला आणि दक्षिणेकडच्या अंटार्क्टिकाचा सुमारे 1.2 ट्रिलियन टन बर्फ वितळल्याचं 2023 मध्ये नोंदलं गेलं. गेल्या 20 वर्षांत उत्तर धुवीय बर्फ वितळण्याचं प्रमाण इतकं वाढलंय की, 2019 मध्ये 586 गिगाटन ‘आइसशीट्स’चं पाण्याच्या प्रवाहात रूपांतर झालं. दुसऱया टोकाच्या अंटार्क्टिकाची तीच अवस्था असून प्रतिवर्षी सुमारे 147 अब्ज मेट्रिक टन बर्फ वितळत आहे. या प्रक्रियेत वाढत्या उष्णतेमुळे आइसबर्ग किंवा हिमप्रस्तरांना मोठय़ा भेगा पडतात. त्यानंतर एकेक हिमखंड तुटून वेगळा होतो आणि समुद्राच्या पाण्यावर मुक्तपणे तरंगायला लागतो. त्या ‘प्रवासा’त तो जसजसा विषुववृत्तीय भागांकडे (दोन्ही धुव प्रदेशांतून) सरकतो तसतशी समुद्राच्या पाण्यात प्रचंड भर टाकतो. या आइसबर्ग फुटीला ‘काल्व्हिंग’ असं म्हणतात. याला कारणीभूत ठरतं ते तप्त हवामान आणि मुळातच अस्तित्वात असलेले उष्ण सागरी प्रवाह. यामुळे उद्या जर समुद्र ‘किनारा’ ओलांडून भूप्रदेशावर आक्रमण करू लागला, तर नवल वाटायला नको. याउलट ‘क्लायमेट चेंज’मुळे काही ठिकाणी बर्फ पडण्याचं प्रमाण वाढलेलं दिसतं खरं, परंतु बर्फाच्या निर्मितीपेक्षा त्याचं वितळणं फारच मोठय़ा स्वरूपात असल्याने हे नफ्या-तोटय़ाचं गणित तोटय़ाकडेच जातं. याचं एक उदाहरण म्हणजे सन 2000 पासून पृथ्वीवरच्या ग्लेशिअर वितळण्याच्या 19 विभागांतून प्रतिवर्षी 3 लाख ऑम्लिपिक पद्धतीचे ‘स्वीमिंग पूल’ रिकामे केले तर जेवढं पाणी निघेल तेवढं पाणी या बर्फ वितळण्यामुळे समुद्रात मिसळतंय.

संकट उंबरठय़ाशी येत नाही तोवर जग जागं होत नाही याचा प्रत्यय आजही येतोय. हवामान ‘इतिहासा’पासून आपण काही बोध घेत आहोत असं दिसत नाही. त्यामुळे धुवीय प्रदेशातले बर्फाचे थर कोसळू लागले की, ते जलरूपाने कधी ना कधी सर्वच देशांच्या किनाऱयाला धडक देऊ लागतील. त्यातून श्रीमंत, प्रगत म्हणवणाऱया देशांचीही सुटका नाही. कारण त्यांची ‘श्रीमंती’ निसर्गाच्या खिजगणतीतही नसते.