
>>दीपक काशीराम गुंडये
नामांकित कंपन्यांच्या दूध पिशव्यांतील दूध काढून उरलेल्या दुधात पाणी मिसळून भेसळयुक्त दूध विकणाऱया एका टोळीला नुकतेच रंगेहाथ पकडले गेले होते. अन्न आणि औषध प्रशासनाने या आणि याआधी केलेल्या कारवाईतून दुधात भेसळ करणाऱया टोळ्यांचा पर्दाफाश केला असला तरी दूधभेसळीला पूर्णपणे आवर घालणे शक्य झालेले नाही. भेसळ कमी होण्यापेक्षा वाढते आहे. मागच्या वर्षी तर बिहार तसेच उत्तर प्रदेशातील दुधाच्या तपासणीदरम्यान तेथील दुधात 100 टक्के भेसळ होत असल्याचे समोर आले होते. याच दूधभेसळीसंदर्भात एक धक्कादायक खुलासा नुकताच समोर आला आहे. देशभरातील तब्बल 68 टक्के दुधात भेसळ होत असल्याची माहिती समोर आली आहे. हा खुलासा खुद्द केंद्रीय पशुकल्याण मंडळाचे सदस्य मोहनसिंग अहुवालिया यांनी केला आहे. तर दुसरीकडे 2025 पर्यंत 87 टक्के हिंदुस्थानी भेसळयुक्त दुधाच्या सेवनामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला बळी पडतील असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. हे नक्कीच चिंताजनक आहे. तसे पाहायला गेले तर हिंदुस्थानात दुधाला पूर्णान्नाचा दर्जा दिला जात असला तरी प्रत्यक्षात दुधामध्ये मोठय़ा प्रमाणावर रासायनिक पदार्थांची भेसळ केली जात असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे हेच पूर्णान्न अनेक रोगांना आमंत्रण देणारे ठरू शकते. दुधातली भेसळ पाण्यापुरती मर्यादित होती तोपर्यंत आरोग्याच्या दृष्टीने तसा फार मोठा धोका नव्हता, मात्र त्याव्यतिरिक्तच्या रासायनिक पदार्थांच्या भेसळीमुळे आतडय़ाचे कॅन्सर, त्वचारोग होण्याची भीती बळावली आहे. याचेच भाकित जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे. या इशाऱयाची गंभीर दखल घेऊन दुधातील भेसळ रोखण्याच्या दृष्टीने कडक पावले उचलण्याची आवश्यकता आहे. चीनमध्ये दूधभेसळीच्या एका प्रकरणात चीन सरकारने अवघ्या सहा महिन्यांत न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून आरोपींना फासावर लटकवले होते. त्याच धर्तीवर आपल्याकडे दुधात भेसळ करणाऱयांना कडक शासन व्हायला हवे. साधारण पाच वर्षांपूर्वी दुधात भेसळ करणाऱयांना जन्मठेपची तरतूद असलेला कायदा संमत करा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्याचे पुढे काय झाले ते कळण्यास मार्ग नाही. त्या आदेशाप्रमाणे कायदा संमत होऊन दुधात भेसळ करणाऱयांना जरब बसल्यास दूधभेसळ रोखण्याची अपेक्षा बाळगता येइल.




























































