लेख – नागासाकीचा हाहाकार!

391

>> दिलीप जोशी

‘कोरोना’चं संकट पूर्णपणे टळलेलं नसतानाच चिनी ड्रगनला सीमेवर अशांतता निर्माण करण्याची खुमखुमी आली. विस्तारवादी आणि युद्धखोर प्रवृत्ती दाखवून चीनने साऱया जगाचा रोष ओढवून घेतला. थंड डोक्याने भयंकर कारवाया करण्याचा चीनचा उद्योग जुनाच आहे. 1962 मध्ये हिंदुस्थानने त्याचा अनुभव घेतला असल्याने आता ड्रगनशी मसलती करताना सावध राहावंच लागणार. त्यातच चीनजवळच्या समुद्रात अमेरिकन नौदलाचा ताफा आल्याने चिनी राज्यकर्त्यांचं पित्त खवळलंय. जवळच्या छोटय़ा देशाना भीती दाखवणं किंवा अंकित करण्याचं त्याचं राजकारण जगाला मान्य नाही. पण चीनच्या तालावर नाचणाऱया नेपाळ सरकारने उगाचच पोकळ गर्जना करायला सुरुवात केलीय.

आरोग्य संकटात जागतिक अर्थव्यवस्था रसातळाला जात असताना पुन्हा युद्धसदृश परिस्थितीचं संकट जगाला परवडणारं नाही. परंतु चीनसारख्या बेभरवशाच्या शेजाऱयाबरोबर राहायचं तर तयारीतच असावं लागतं.

वास्तविक विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात संपूर्ण जगाने दोन महायुद्धांचा विदारक अनुभव घेतलाय. त्यामध्ये दुसऱया महायुद्धात एका बाजूला अमेरिका, इंग्लंड, रशिया ही दोस्त राष्ट्रे तर दुसऱया बाजूला जर्मनी, इटली आणि जपान होते. शेवटी 6 आणि 9 ऑगस्ट 1945 या दोन दिवशी जपानवर जगातले पहिले दोन अणुबॉम्ब टाकून ते युद्ध संपवलं. परंतु त्याचा दाहक चटका जग आजही विसरलेलं नाही.

गेल्या वर्षी याच स्तंभातून आपण हिरोशिमाच्या हाहाकाराची माहिती घेतली होती. या वेळी जपानच्याच नागासाकी शहरावर 9 ऑगस्ट 1945 रोजी कोणती आपत्ती ओढवली ते जाणून घेऊया. नागासाकीचा ‘अणु’दिनसुद्धा हिरोशिमासारखाच यातनामय होता. एका बॉम्बच्या आघाताने सारं शहर क्षणात उद्ध्वस्त केलं. हजारो निरपराध लोक, त्यांना काही कळायच्या आतच मारले गेले. त्यानंतर अणुबॉम्बच्या रेडिएशनने पुढचा बराच काळ त्रासदायक ठरवला. तोपर्यंत जगालाच काय, हा बॉम्ब टाकणाऱया अमेरिकेलाही त्यामुळे नेमकं काय होतं याची कल्पना नव्हती. अन्यथा तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष टमन यांनी वेळ आली तर आणखी बॉम्ब टाकण्याच्या गर्जना केल्या नसत्या. अर्थात त्यानंतर आजपर्यंत हे संहारक अस्त्र्ा वापरण्याचा आततायीपणा कोणीच केला नाही. रशिया, अमेरिकेत शीतयुद्ध सुरू असताना परस्परांना धमक्या देण्याचे उद्योग चालायचे, पण शेवटी काहीतरी तोडगा निघायचा. अगदी अलीकडे अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम यांच्यात बरीच शाब्दिक धमकावणीची आतषबाजी झाली. पण अखेरीस सिंगापूरमध्ये भेट घेऊन त्यांनी समेट केला.

तरीही जगातल्या सर्व देशांकडे मिळून पृथ्वीचा अनेकदा नाश करू शकतील अशी संहारक ‘वॉर हेडस्’ आहेत. त्याची स्पर्धा थांबत नाही. शत्रूराष्ट्रापेक्षा सामर्थ्यवान असणं गरजेचं ठरतं. परिणामी जग कायम एका धोक्याच्या गडद छायेखाली वावरत असतं. त्यातच प्रदूषणाचा प्रादुर्भाव आणि कोरोनासारख्या जीवन स्तब्ध करणाऱया साथी. माणसाच्या जगाने इतर ऐंशी लाख प्रजातींना आपल्या ‘प्रगती’ने वेठीला धरल्यासारखं वाटावं असा सगळा प्रकार.

हे आठवण्याचं कारण जपानमध्ये 9 ऑगस्ट 1945 रोजी पडलेला जगातला दुसरा अणुबॉम्ब. त्या दिवशी सकाळी 11 वाजून दोन मिनिटांनी ‘फॅट मॅन’ नावाचा संहारक बॉम्ब अमेरिकेच्या 6 तारखेला हिरोशिमावर टाकलेल्या ‘लिटल् बॉय’ नावाच्या बॉम्बपेक्षाही भयंकर होता. पण नागासाकीच्या उंचसखल रचनेमुळे दरीत पडलेल्या बॉम्बने तुलनेने कमी हानी केली. तरीही त्या दिवशी शहराचे व्यवहार सुरू होत असताना मेजर चार्लस् स्वीनी यांचं बोईंग-29 नागासाकीवर घिरटय़ा घालू लागलं. त्या वेळी तिथलं वातावरण ढगाळ असल्याने त्यांचा सकाळचा 10 वाचून 50 मिनिटांचा ‘कुमुहूर्त’ चुकला. शेवटी 1800 फुटांवरून त्याने ‘फॅट मॅन’ खाली सोडला. 53 सेकंदात त्याने नागासाकीचा घास घेतला. त्या दिवशी शहरात जपानी जनतेप्रमाणेच दहा हजार कोरियन, सहाशे चिनी कामगार, नऊ हजार जपानी सैनिक आणि दोस्त राष्ट्रांचे पकडलेले 400 कैदीही होते. आधी बॉम्बचं लक्ष्य कोकुरा होतं. ते जमलं नाही तर नागासाकी आणि तसंच झालं. काही क्षणात 35 हजार माणसं मृत्युमुखी पडली.

त्यानंतर जपानने शरणागती पत्करली. दुसरं महायुद्ध संपलं. भयंकर नरसंहाराचं दुःख सोसत जपान पुन्हा फिनिक्स पक्ष्यासारखा अक्षरशः राखेतून उभा राहिला. या दोन अणुबॉम्बच्या हल्ल्यांवर आधारित चित्रपट आले. ‘प्रोफेसी’सारख्या माहितीपटातून जगाला त्याची दाहकता समजली. पण माणसांचं जग शहाणं झालंय का?

आपली प्रतिक्रिया द्या