मुद्दा – नाना शंकरशेठ यांचाही समावेश हवा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य सरकारच्या वतीने राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींची जयंती व राष्ट्रीय दिन साजरा करण्यात येतो. या थोर व्यक्तींच्या सुधारित यादीत जानेवारी 2021 पासून प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, ‘दर्पण’कार बाळशास्त्र्ााr जांभेकर, डॉ. पंजाबराव देशमुख यांची नावे समाविष्ट करण्यात आली असून राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या पुण्यतिथीनिमित्त मंत्रालयात व राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये अभिवादनाचे शासकीय कार्यक्रम केले जाणार आहेत. राष्ट्रपुरुषांच्या संख्येत भर पडली असून ही संख्या आता 41 वर गेली आहे. सुधारित यादी प्रसिद्ध करताना मात्र राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाला मुंबईचे आद्यशिल्पकार, रेल्वेचे जनक ‘जगन्नाथ तथा नाना शंकरशेठ’ यांनी मुंबई शहरासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाचा मुद्दामहून विसर पडल्याचा दिसतो.

नानांनी दूरदृष्टीने मुंबईच्या भविष्याचा विचार करून विविध अंगी विकास करीत असताना ब्रिटिश राजवटीत इंग्रजांना सकारात्मक विचार करण्यास भाग पाडून बोरीबंदर ते ठाणे अशी सर्वप्रथम रेल्वे 16 एप्रिल 1853 रोजी सुरू केली. तसेच मुंबईचा सर्वांगीण विकास करताना सामाजिक, शैक्षणिक आरोग्याविषयी समाजसुधारणा करताना मुंबईच्या जडणघडणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यानंतरच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि मुंबई महाराष्ट्र राज्याची राजधानी झाली. नानांनी सुरू केलेल्या रेल्वे सुविधेमुळे दळणवळण आणि औद्योगिक क्षेत्रातील विलक्षण कामगिरीमुळे मुंबईची ओळख संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळीच ओळख झाली. त्या काळात मुंबईच्या महत्त्वाच्या जडणघडणीत नानांचे अनमोल योगदान आहे. म्हणून त्यांना रेल्वेचे जनक आणि मुंबईचे आद्य शिल्पकार म्हटले जाते. सन 2007-12 या कार्यकाळात वांद्रे-खेरवाडी येथून प्रभाग क्रमांक- 90 मधून  मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकून तत्कालीन नगरसेवक ऍड. मनमोहन चोणकर यांनी महापालिकेच्या सभागृहात नानांच्या असलेल्या प्रतिमेस पुण्यतिथीदिनी महापौरांनी पुष्पहार अर्पण करावा असा ठराव 2011 साली मांडून मंजूर करून घेतला होता व त्यानंतर आजपर्यंत ती एकप्रकारे कायमची प्रथाच झाली आहे. ज्याप्रमाणे मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात  नानांच्या प्रतिमेस पुण्यतिथीदिनी पुष्पहार अर्पण करून नानांच्या प्रति आदरभाव व्यक्त केला जातो त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळ आवारात मुंबईच्या या शिल्पकाराचे (नानांचे) देखील तैलचित्र लावण्यात यावे व राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या कार्यकाळात पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्याची प्रथा सुरू करावी अशी तमाम नानाप्रेमी नागरिकांची अपेक्षा आहे. नानांनी मुंबईसाठी दिलेले योगदान इतर समाजसुधारकांप्रमाणेच अनमोल संस्मरणीय आहे. म्हणूनच नानांचेही नाव थोर समाजसुधारकांच्या यादीत समाविष्ट करण्यात येऊन यथोचित सन्मान करण्यात यावा.

  • जयराम देवजी