
>> डॉ. अनुपमा उजगरे
‘वानोळा’ म्हणजे आपल्या परसातल्या, शेतातल्या मळ्यातल्या पिकलेल्या फळाची वा धान्याची प्रेमाने दिलेली लहानशी भेट. असा वानोळा देणे आज अनेक कारणांनी दुर्मीळ झालेले असताना प्रा. नरेंद्र पाठक वाचकांसाठी ‘वानोळा’ घेऊन आलेले आहेत. या वानोळ्यात लेखक बालपणी अमळनेरला राहत असतानाच्या काही आठवणी आहेत, काही नंतरच्या काळातल्या समारंभातल्या आहेत, तर काही व्यक्तींच्या संदर्भातल्या आहेत.
गावाकडे बऱयाच वर्षांनी गेल्यानंतर जुन्या आठवणी जाग्या होणे साहजिक असते. त्या वाचकाला सांगणे म्हणजे एक प्रकारे त्या काळच्या कौटुंबिक आणि सामाजिक इतिहासाची नोंदच ललित शैलीत लेखक स्वतच्या नकळत करत जात असतो. जुन्याच्या जागी बदल होणेही अपरिहार्य असते. ते बदल लेखक नुसता टिपत नाही, तर त्याच्या मनात प्रश्नही उभे करतात. वानगीदाखल सांगायचे तर लेखकाच्या आठवणीतला मालकाच्या तोऱयातला पांडुरंग आता दुर्दैवाने नोकराच्या भूमिकेत दिसतो. मंदिराचे देवस्थान झालेले दिसते, पण ‘त्या स्थानात देव आहे का?’ असा प्रश्न त्याला पडतो. या बदलाच्या रेटय़ात शाळेचे विस्तीर्ण मैदान उद्या आलो तर कदाचित दिसणार नाही म्हणून त्याचे शाळकरी वयातले कोवळे मन तिथल्या मातीचा टिळा कपाळी लावून घेते. शाळेतली एकोप्याची वृत्ती, आपला मित्र मागे राहणार नाही म्हणून घेतली जाणारी काळजी, शिवाशिव असली तरी माणुसकी जपण्याचा संस्कार देणारी माणसे, अडीनडीला शेजारधर्म निभावणारे भिन्न धर्मीय शेजारी हे चाळ संस्कृतीचे किंवा वाडा संस्कृतीचे अनुभवलेले विश्व लेखकाला आठवते.
प्रेम आणि आदरापोटी आपल्या शेतातला वानोळा गुरुजींना देण्याचा ‘सोहळा’ साजरा करणारा भिलादादा, साने गुरुजींनी ‘सुंदर पत्रे’ जिला लिहिली ती त्यांची पुतणी म्हणजे त्यांच्याच स्वभाव प्रकृतीची प्रतिकृती असलेल्या वयोवृद्ध सुधाताई बोडो, ‘ऋणानुबंधाची भेट वाटावी’ अशी एक दिव्य अनुभूती ज्यांच्या हाताचा स्पर्श देऊन गेली ते बाळ कोल्हटकर आणि काटकसरीत नियोजनपूर्वक संसार करणारे, फक्त रक्ताचेच नव्हे तर गावकऱयांशीही असलेले नातेसंबंध जपणारे, आर्थिक बाजू नीटपणे सांभाळणारे एक अर्थशास्त्राr असलेले, ‘आपल्या कपाटात नसलेल्या ग्रंथांपैकी, पण कधीही वाचता येईल असा एक चरित्रग्रंथ आहेत’ असे वाटणारे आपले ‘दादा’, अशी मोजकीच व्यक्तिरेखाटने या पुस्तकात आहेत.
धर्म-कर्म कार्यात कधीच कुठली तडजोड न करणारे वडील ‘साग्रसंगीत पूजा कशासाठी?’ याचे स्पष्टीकरण देताना सांगतात, ‘देव आपल्याकडे पूजा, फुले, नैवेद्य काहीच मागत नसतो, आपणच त्याच्याकडे सतत काही ना काही मागत असतो. आपण पूजाअर्चा करतो त्याने आपल्याला समाधान लाभते. स्तोत्र पठणाने आपले उच्चार शुद्ध होतात. उपवासाने आरोग्य उत्तम राहते आणि देवपूजेने आत्मशुद्धी होते.’ हे दादांचे विचार बाह्य अवडंबरांना सकारात्मक रूप देणारे वाटतात. शंखध्वनी ऐकू येणे, खोदकामात शंख सापडणे, त्याची विधिवत प्रतिष्ठापना होणे हे पार पडल्यावर विश्वनाथ बुवा भविष्यातले धोके ओळखून भूगर्भातील हालचाली, नित्याच्या कोलाहलात ते न जाणवणे असे विज्ञानाधारित वळण घटनेला देऊ पाहतात. ‘निजरूप दाखवा हो’ या वानोळ्याचा शेवट एखाद्या गूढकथेत शोभावा असा लेखकाने केलेला आहे की तो घडला तसा लिहिलेला आहे, हे वाचक ठरवू शकत नाही. कारण हा आठवणींचा वानोळा आहे.
वडिलांची आदर्श तत्त्ववृत्ती लेखकाच्या रक्तात भिनल्यामुळे आजच्या पिया विद्यार्थ्याविषयी भेडसावणाऱया चिंतेवरचा ‘जे भरतात रिकाम्या जागा’ हा चिंतनात्मक लेख आणि बाळपणी झालेल्या अनेक चांगल्या संस्कारांपैकी आज जवळ जवळ लुप्त झालेला ‘पत्रसंस्कार’ हे दोन्ही लेख अत्यंत वाचनीय झालेले आहेत. ‘घाम’ आणि ‘साखरझोप’ या लेखांचे स्वरूप काहीसे विनोदी शैलीत कल्पनाविस्तार केल्यासारखे आहे. कोवळ्या वयातल्या भावना आणि मनोहर क्षणांविषयीचा ‘भेटीत तुष्टता मोठी…’ हा शेवटचा लेखही छान आहे.
कवितांची पेरणी करत सहजसोप्या शैलीतले लेखकाचे हे ललित लेखन थोडय़ा आठवणी, थोडी व्यक्तिचित्रे, थोडे चिंतनात्मक, थोडे हलकेफुलके असा वानोळा वाचकांना देऊन पुढच्या लेखनाची उत्सुकता वाढत आहे.
वानोळा
लेखक ः प्रा. नरेंद्र पाठक
प्रकाशन ः सृजनसंवाद प्रकाशन
पृष्ठे ः 96 किंमत ः 250 रु.