संस्कृती सोहळा – गोदातीरावरचे त्र्यंबकेश्वर

>> आशुतोष बापट

त्र्यंबकेश्वरचे स्थान मोठे रमणीय असे आहे. सर्व बाजूंनी सह्याद्रीने वेढलेल्या या क्षेत्री गोदावरीचे आगमन होते ते कुशावर्त या पवित्र कुंडात. “गंगाद्वारे कुशावर्तेबिल्वके नीलपर्वर्ते स्नात्वा कनखले तीर्थे पुनर्जन्म न विद्यते’’ असे याचे वर्णन केलेले आहे.  

प्रातःस्मरणीय सप्तसिंधूंमध्ये गोदावरी ही महाराष्ट्रातली एकमेव नदी. गंगेइतकीच पवित्र. गंगेसारखाच खूप मोठा भूप्रदेश सुजलाम् सुफलाम् करणारी गोदावरी. गंगेइतकीच धार्मिक समजली गेलेली आणि पुजली जाणारी गोदावरी. ‘दक्षिण गंगा’ या नावाने ओळखली जाणारी गोदावरी. पवित्र नदी समजली गेल्यामुळे गोदावरीकाठी अनेक तीर्थक्षेत्रे निर्माण झाली. महत्त्वाची जीवनदायिनी नदी असलेल्या गोदावरीसंबंधी अर्थातच विविध आख्यायिका, दंतकथा यासुद्धा दिसू लागल्या. खरं तर आख्यायिका, दंतकथा या हिंदुस्थानातील परंपरेचा एक अविभाज्य घटक म्हणायला हवा.

सह्याद्रीमधे त्र्यंबकेश्वरजवळच्या ब्रह्मगिरी पर्वतावर उगम पावणारी गोदावरी ही गौतमी कशी झाली याची सुद्धा एक छान कथा येते. ब्रह्मगिरीच्या परिसरात गौतम ऋषींचा आश्रम होता. एकदा दुष्काळ पडला असता जवळपासचे ऋषीमुनी गौतमांच्या आश्रयाला आले. कारण तिथे दुष्काळ नव्हता. फक्त गौतमांचीच शेती उत्तम पिकत होती. त्याचवेळी कैलास पर्वतावर पार्वतीच्या मनात गंगेविषयी विकल्प उत्पन्न झाला. गंगा गुप्तरूपाने शिवाच्या जटेत वास्तव्य करून आहे हे तिला रुचेना. तिने गणपतीसमवेत एक योजना आखली. त्यानुसार गणपती गणेशपंडित या नावाने गौतमांच्या आश्रमात येऊन राहू लागला. योजनेनुसार पार्वतीची एक दासी जया ही गायीचे रूप घेऊन गौतमांच्या शेतात फिरू लागली. गौतमाने तिला हाकलण्यासाठी तिच्यावर दर्भ फेकून मारला. तत्काळ त्या गायीने प्राण सोडले. गोहत्येचे पातक लागल्यामुळे गौतम ऋषी विषण्ण झाले. तेव्हा गणेशपंडिताच्या रूपात असलेल्या गणपतीने त्यांना सांगितले की, “शंकराच्या मस्तकावरील गंगा तू भूतलावर आणलीस तर तुझे पाप नष्ट होईल.’’ त्यानुसार गौतमाने तप करून शंकराला प्रसन्न करून घेतले आणि गंगेची मागणी केली. शंकराने ती मागणी मान्य करून आपल्या जटेतून गंगेला खाली ब्रह्मगिरीवर सोडले. गौतमाने आणली म्हणून लोक हिला गौतमी गंगा म्हणू लागले आणि गंगेचा प्रवाह अंगावरून गेल्यामुळे गाय (गो) जिवंत झाली म्हणून या नदीला गोदावरी असेही नाव मिळाले.

महाराष्ट्रात सह्याद्रीमधे ब्रह्मगिरीला उगम पावलेली गोदावरी जवळजवळ 1450 किलोमीटर इतका प्रवास करून आंध्र प्रदेशात असलेल्या राजमहेंद्री इथे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. या एवढय़ा प्रदीर्घ प्रवासात विविध प्रकारची संस्कृती हिच्या काठी नांदते आहे, रुजलेली आहे. दक्षिण हिंदुस्थानातली सर्वात महत्त्वाची असलेली गोदावरी उगमापाशी म्हणजे ब्रह्मगिरी पर्वतावर एका छोटय़ा कुंडातून वाहते. इथून डोंगराच्या पोटातून ही ब्रह्मगिरीच्या पूर्व भागात प्रकट होते. या ठिकाणी एक गायमुख बांधलेले असून वरच्या बाजूला देवीची म्हणजेच गोदावरीची मूर्ती स्थापली आहे. त्र्यंबकेश्वर आणि नाशिक ही दोन महत्त्वाची तीर्थक्षेत्रे गोदावरीच्या तीरावरच वसलेली आहेत. समुद्रमंथनातून अमृताची प्राप्ती झाल्यावर अमृताचे काही थेंब नाशिकला रामकुंड आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त इथे पडले म्हणून ही क्षेत्रे पवित्र झाली आणि दर 12 वर्षांनी इथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो, अशी याची कथा.

त्र्यंबकेश्वरचे स्थान मोठे रमणीय असे आहे. सर्व बाजूंनी सह्याद्रीने वेढलेल्या या क्षेत्री गोदावरीचे आगमन होते ते कुशावर्त या पवित्र कुंडात. “गंगाद्वारे कुशावर्तेबिल्वके नीलपर्वर्ते स्नात्वा कनखले तीर्थे पुनर्जन्म न विद्यते’’ असे याचे वर्णन केलेले आहे. त्र्यंबकेश्वरच्या मध्यभागी असलेले हे कुशावर्त तीर्थ. सध्या जे आपल्याला दिसते ते सरदार होळकरांचे फडणीस पारनेरकर यांनी बांधलेले आहे. कुशावर्त कुंड आणि त्यावर असलेले शिल्पकाम आवर्जून बघण्यासारखे आहे. पेशवेकालीन स्थापत्याचा हा उत्तम नमुना आहे. तसेच इथले शिवस्थान हे सुद्धा 12 ज्योतिर्लिंगांमधील एक असल्यामुळे त्र्यंबकेश्वर हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र समजले जाते.

ब्रह्मगिरीवरून येणाऱया गोदावरीच्या तीरावर वसलेले हे स्थान दक्षिण हिंदुस्थानातील प्रमुख धार्मिक ठिकाण मानले गेले आहे. देवगिरीच्या यादव राजसत्तेच्या अधिपत्याखाली हा प्रदेश असल्यामुळे इ.स. 1290 मध्ये रामचंद्र यादव या राजाने इथे भव्य शिवमंदिर बांधल्याचे सांगतात. तसेच कुशावर्तापासून अहिल्यागोदा संगमापर्यंत दगडी घाट बांधलेला होता. पुढे शहाजीराजांनी या मंदिराची डागडुजी केली. औरंगजेबाचे परचक्र आले. त्यात मंदिराची बरीच पडझड झाली. पुढे पेशवाईत श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी या जागी नवीन मंदिर उभारणीचा संकल्प केला. तत्कालीन स्थपती यशवंतराव हर्षे यांनी या मंदिराचा आराखडा तयार केला. जवळजवळ 800 कारागीरांनी 31 वर्षे खपून हे मंदिर सन 1785 साली सवाई माधवराव पेशव्यांच्या कारकीर्दीत पूर्णत्वाला गेले. आजही त्र्यंबकेश्वर ठिकाणी विविध साधूंचे आखाडे वसलेले आहेत. कुंभमेळा, ज्योतार्ंलग याचसोबत या ठिकाणी श्राद्धादी कार्ये होत असल्यामुळे भाविकांच्या दृष्टीने हे मोठे तीर्थक्षेत्र होते. सिंहस्थ पर्वणीत म्हणजेच सिंह राशीत गुरू आला असता गोदावरीत केलेले स्नान हे पुण्यप्रद असते असे आपल्या पूर्वजांनी विविध पुराणांतून वर्णिले आहे.भाविकांसोबत डोंगर भटक्यांसाठीसुद्धा हे तितकेच महत्त्वाचे ठिकाण होय. ब्रह्मगिरी पर्वत ज्या सह्याद्रीच्या रांगेवर वसलेला आहे त्याला त्र्यंबकरांग असे म्हटले जाते. गोदावरीचा उगम असलेला ब्रह्मगिरी, सरळ खडकात खोदलेल्या पायऱयांचा किल्ले हरिहर ऊर्फ हर्षगड, फणी डोंगर, उतवड आणि भास्करगड हे एका बाजूला, तर दुसरीकडे हरगड आणि अंजनेरी अशा एकाहून एक सुंदर आणि देखण्या गिरिदुर्गांमुळे हा प्रदेश डोंगर भटक्यांसाठीसुद्धा तेवढाच समृद्ध आहे.

[email protected]

(लेखक प्राचीन इतिहास व संस्कृतीचे अभ्यासक आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या