ठसा – जे. व्ही. संगम

1789

>> नवनाथ दांडेकर

क्रीडा क्षेत्रातील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व, कॅरम या देशी खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी जिवाचे रान करणारा क्रीडा संघटक नुकताच हरपला. ज्येष्ठ कॅरम संघटक जे. व्ही. संगम नावाची चालती फिरती प्रसिद्धीशाळाच परमेश्वराने आपल्यापासून हिरावून घेतली आहे. गेली 35 वर्षे कॅरम या खेळासाठी प्रचंड मेहनत घेत हिंदुस्थानी कॅरम क्षेत्राचे नाव सातासमुद्रापार नेण्यासाठी धडपडणारे जे. व्ही. संगम यांचे निधन झाल्याची वार्ता हा केवळ कॅरम क्षेत्रासाठीच नव्हे, तर आम्हा क्रीडा पत्रकारांसाठी मोठा धक्का होता. सर्वच भाषांतील पत्रकारांशी जेव्ही यांचे अगदी निकटचे नाते निर्माण झाले होते. कॅरमचा विषय आला की संगम यांचे नाव प्रत्येकाच्या तोंडी यायचेच. कारण आठवडाभरात जेव्हींचा फोन आला नाही की आम्हालाच चुकल्याचुकल्यासारखे व्हायचे. कॅरम या खेळाशी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत निकटचे नाते असणाऱया संगम यांची अशी अचानक एक्झिट हा कॅरम क्षेत्रासाठीचा मोठा धक्काच होता. वयाच्या 64व्या वर्षीच या निष्ठावंत क्रीडा संघटकाने नुकतीच जगातून एक्झिट घेतली आणि कॅरम क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झालीं.

कॅरम हा आपला श्वास असल्याचे मानणारे जेव्ही म्हणजे कॅरमच्या प्रसिद्धीचे चालते -बोलते कार्यालयच होते. त्यांच्या पश्चात 2 मुली आणि 2 मुलगे ,पत्नी, भाऊ असा मोठा परिवार आहे. कोरोना लॉकडाऊनमध्ये स्पर्धाच बंद असल्या तरी संगम यांचा आम्हा पत्रकारांशी या ना त्या कारणाने संपर्क ठरलेलाच असायचा. पत्रकारांच्या वैयक्तिक समस्यांपासून ते थेट सुखदुःखाच्या प्रसंगात संगम जातीने हजर असायचेच. कबड्डीला मोठी प्रसिद्धी मिळवून देणारे सुधीर खानोलकर आणि शशिकांत राऊत या क्रीडा संघटक जोडीप्रमाणेच कॅरमला प्रसिद्धी मिळावी. या खेळाला सातासमुद्रापारही लोकप्रियता मिळावी यासाठी झटणारी मुंबईकर जोडी म्हणजे जे. व्ही. संगम आणि आंतरराष्ट्रीय कॅरमपटू अरुण केदार. आज केदार यांच्या साथीला संगम यांच्यासारखा निष्ठावंत कॅरम संघटक नाहीये याचे शल्य कॅरमपटू आणि कॅरमशौकिनांच्या मनात सतत घर करून राहणार आहे. निरपेक्ष आणि निःस्वार्थ वृत्तीने कॅरम या खेळाचा विकास हेच लक्ष्य डोळय़ापुढे ठेवून जेव्हींनी वयाच्या 64 व्या वर्षापर्यंत परिश्रम घेतले. कोरोना महामारीच्या काळात आयोजित ऑनलाइन आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धा संपन्न झाली आणि काही दिवसांतच जेव्ही यांनी या जगाचा अचानक निरोप घेतला हा दैवदुर्विलासच म्हणायला हवा. पण आपल्या हयातीत कॅरमवर अपार प्रेम करणाऱया संगम यांनी सर्वभाषिक वृत्तपत्रांत कॅरमची प्रसिद्धी करून आपले क्रीडाप्रेमी जगाला दाखवले. जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धांत अगदी पंचपदापासून ते थेट प्रसिद्धीचे काम करणारे जेव्ही आज आपल्यात नाहीत याचे दुःख कॅरम क्षेत्राला आहे; पण या खेळाला त्यांनी अपार परिश्रम घेऊन मिळवून दिलेली प्रसिद्धी सर्वांच्याच हृदयात कोरलेली आहे.

दादरच्या कामगार परिसरात राहणारे जे. व्ही. संगम आणि त्यांचे पूर्ण संगम कुटुंबच सेवाभावी कार्यासाठी ओळखले जाते. जेव्हींचा छोटा भाऊ एकनाथ संगम राष्ट्रवादी काँग्रेसचा लोकप्रिय कार्यकर्ता. आई आणि वडिलांकडूनच जेव्ही आणि त्यांच्या भावंडांना समाजसेवेचा वारसा मिळाला. त्यामुळे दादर, प्रभादेवी भागात अडल्यानडल्या नागरिकांना मदतीचा हात देणारे संगम कुटुंब विभागात आदरणीय म्हणून ओळखले जाते. जे.व्ही. नेव्हल डॉकयार्डमधील आपली शासकीय नोकरी सांभाळून कॅरम खेळाच्या विकासासाठी आपला वेळ देत होते. निवृत्तीनंतर सुमारे 5 वर्षे तर त्यांनी पूर्णवेळ कॅरमच्या प्रसार आणि प्रचारासाठी स्वतःला झोकून दिले होते. लॉक डाऊनचे महिने वगळता संगम त्याआधी घरी कमी आणि कॅरमच्या स्पर्धांच्या ठिकाणी अधिक असे समीकरण ठरलेलेच असायचे. निःस्वार्थी क्रीडासंघटक आणि सेवाभावी कार्यकर्ता म्हणून आपला ठसा उमटवणारे कॅरमपटू ते आंतरराष्ट्रीय कॅरम पंच अशा पायऱया चढत असताना जेव्हींनी कधीही आपली विनम्रता आणि निरपेक्ष वृत्ती सोडली नाही. केवळ कॅरम क्षेत्रातच नव्हे तर कबड्डी, खो-खो आणि अन्य खेळांच्या संघटकांतही संगम यांचे नाव लोकप्रिय होते. त्यामुळेच मराठी क्रीडा पत्रकारांत जेव्हींचे नाव मोठय़ा आदराने घेतले जायचे. सेवाभावी वृत्तीने हिंदुस्थानी कॅरम खेळाला सोनियाचे क्षण दाखवण्यासाठी खारीचा वाटा उचलणाऱया जेव्हींसारख्या क्रीडासंघटकाच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना कॅरमपटू आणि कॅरमशौकिनांत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या